Tips to Pack a Safe and Healthy Lunch : शाळा, ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी अनेक जण घरून किंवा बाहेरून पॅक केलेल्या जेवणावर अवलंबून असतात. हीच बाब लक्षात घेऊन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (FSSAI) एका अलीकडील शिफारशीने पोषणाच्या अनेकदा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या एका गोष्टीवर प्रकाश टाकला आहे. तुम्ही डब्यात काय आणता हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तुम्ही डबा कसा भरता हेही खूप महत्त्वाचं असतं. एफएसएसएआयने अलीकडेच तुमचे जेवण आरोग्यदायी आणि स्वच्छ बनवण्यासाठी ‘सोप्या’ टिप्सची यादी दिली आहे. एक्स (ट्विटर)वरील एका पोस्टमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, आपण जेवण बनवण्यासाठी खूप मेहनत घेतो; पण ते डब्यात (lunch box मध्ये) कसं भरतो याकडे आपण अनेकदा फारसं लक्ष देत नाही. त्यामुळे जेवण हुशारीने पॅक करा अन् सुरक्षित खा.
खाली दिलेल्या ४ सोप्या टिप्सचे पालन करा आणि तुमचं प्रत्येक जेवण अधिक आरोग्यदायी आणि स्वच्छ बनवा…
- जेवणाचे डबे वापरण्यापूर्वी ते धुऊन, स्वच्छ करून कोरडे करा.
- अन्नासाठी सुरक्षित स्टील, काच किंवा ‘फूड-ग्रेड’ प्लास्टिक यांसारख्या डब्यांचा वापर करा.
- अन्न सांडू नये किंवा गळू नये यासाठी डब्यांची झाकणे घट्ट बसणारी असावीत.
- अन्न खराब होऊ नये म्हणून ते डब्यात भरण्यापूर्वी थंड होऊ द्या.
‘या’ टिप्सबाबत खात्री करण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने सल्लागार व आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नमूद केले की, अन्नावाटे होणारे आजार, पचनाच्या समस्या आणि पोषक तत्त्वांचा ऱ्हास रोखण्यासाठी अन्नसुरक्षा महत्त्वाची भूमिका बजावतात. “एफएसएसएआयचा एक मुख्य मेसेज असा आहे की, तुमचे अन्न स्वच्छ आणि ‘फूड-ग्रेड’ (अन्नासाठी सुरक्षित) डब्यांमध्ये पॅक केले जावे. तसेच ते हाताळताना योग्य ती स्वच्छता राखली जावी. जेवण पौष्टिक आणि संतुलित असलं तरी ते योग्य पद्धतीनं साठवलं किंवा डब्यात गेलं नाही, तर ते दूषित होऊन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं
याचबरोबर तज्ज्ञांनी केलेली आणखी एक महत्त्वाची शिफारस म्हणजे अत्यंत गरम पदार्थ घट्ट बंद डब्यांमध्ये त्वरित भरणे टाळावे. अन्न डब्यात भरण्यापूर्वी ते थोडे थंड होऊ दिल्यास त्यातील ओलावा (वाफ) साचण्याचे प्रमाण कमी होऊ शकते; अन्यथा हा ओलावा जीवाणूंच्या वाढीस चालना देऊन अन्नाचा दर्जा खराब करू शकतो.
पौष्टिकतेच्या दृष्टिकोनातून, डब्यात प्रथिने, फायबर व कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स यांचा संतुलित समावेश असणे आदर्श आहे. अन्नसुरक्षा आवश्यक असली तरीही दिवसभर ऊर्जेची पातळी, एकाग्रता आणि पोट भरल्याची भावना टिकवून ठेवण्यासाठी जेवणाची रचना तितकीच महत्त्वाची आहे.
त्याचबरोबर हायड्रेशन (शरीरातील पाण्याचे योग्य प्रमाण राखणे) हा आणखी एक असा पैलू आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. विशेषतः उष्ण हवामानात, सुरक्षित पिण्याचे पाणी बरोबर ठेवणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखणे याऔमुळे पचन, बौद्धिक कार्यक्षमता आणि एकूणच आरोग्यास मदत होते.
या शिफारशींमधून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. सकस आहाराची सुरुवात फक्त जेवताना होत नाही, तर अन्नाची सुरक्षित हाताळणी, योग्य साठवणूक आणि काळजीपूर्वक डबा पॅक करण्यापासूनच होते.
