5 best vegetables to control cholesterol: शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची (LDL) वाढलेली पातळी ही एक गंभीर जागतिक आरोग्य समस्या बनली आहे, ज्यामुळे थेट हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या विकारांचा धोका वाढतो. वैद्यकीय तज्ज्ञ आणि अलीकडील आरोग्य संशोधनानुसार, रोजच्या आहारात विशिष्ट विद्राव्य फायबर आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध भाज्यांचा समावेश केल्यास धमन्यांमधील चरबीचे साठे नैसर्गिकरीत्या नियंत्रित करता येतात. उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी केवळ औषधांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही; आहारात सुधारणा करणेदेखील आवश्यक आहे. काही भाज्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि फायदेशीर वनस्पती संयुगे भरपूर प्रमाणात असतात. ही पोषक तत्त्वे शरीरातील चरबीचे संतुलन राखण्यास, रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, कमी कॅलरी आणि उच्च फायबर असलेल्या भाज्यांचे सेवन केल्याने केवळ वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होत नाही, तर आहार आणि पचनक्रियादेखील सुधारते. या भाज्यांचे सेवन केल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अस्वास्थ्यकर पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. म्हणूनच या भाज्या हृदयाचे आरोग्य आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात. चला, या भाज्या आणि त्यामागील वैज्ञानिक संशोधनाबद्दल जाणून घेऊया.

कंटोला : तंतुमय पदार्थांनी (फायबरने) समृद्ध, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते

कंटोला ही पोषक तत्त्वे आणि फायबरने समृद्ध भाजी असल्याचे मानली जाते. त्यातील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ही कमी उष्मांक आणि कमी चरबी असलेली भाजी वजन नियंत्रणासाठीही चांगली मानली जाते. जर्नल ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि फायटोकेमिकल रिसर्चनुसार, कंटोला या भाजीमध्ये फ्लेवोनॉइड्स आणि अविद्राव्य फायबर मोठ्या प्रमाणात असतात. संशोधनानुसार, त्यातील अँटीऑक्सिडंट घटक रक्तवाहिन्यांमधील चरबीचे ऑक्सिडेशन रोखतात. जेव्हा कोलेस्ट्रॉलचे ऑक्सिडेशन होत नाही, तेव्हा धमन्यांमध्ये अडथळा (प्लाक) तयार होण्याचा धोका कमी होतो, ज्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत राहते

भेंडी : हृदय आणि पचनक्रिया या दोन्हींसाठी फायदेशीर

भेंडीमध्ये चांगल्या प्रमाणात विद्राव्य फायबर असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहण्यासही मदत होते, ज्यामुळे अति खाणे टाळता येते. भेंडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स संपूर्ण आरोग्यासाठीदेखील उपयुक्त आहे. ‘फायटोथेरपी रिसर्च’ आणि ‘ग्लोबल जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ यांनी केलेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये असे आढळून आले आहे की, भेंडी कापल्यावर बाहेर येणाऱ्या चिकट पदार्थामध्ये ‘पेक्टिन’ नावाचे विद्राव्य फायबर असते. प्रयोगशाळेतील संशोधनाने हे सिद्ध केले आहे की, पचनक्रियेदरम्यान पेक्टिन अन्नातील पित्त आम्ल व खराब कोलेस्ट्रॉलला बांधून ठेवते आणि रक्तात शोषले जाण्यापूर्वीच ते शौचावाटे शरीरातून बाहेर टाकले जाते.

परवळ : एक हलकी आणि पौष्टिक भाजी

परवळ ही कमी उष्मांक आणि तंतुमय घटकाने समृद्ध असलेली भाजी आहे. त्याचा नियमित आहारात समावेश केल्यास पचनसंस्थेला फायदा होऊ शकतो. त्यातील पोषक तत्त्वे शरीराला ऊर्जा देतात आणि वजन नियंत्रणातही मदत करतात. संतुलित आहारात याचा समावेश केल्यास हृदयाच्या आरोग्यास मदत होऊ शकते. ‘जर्नल ऑफ एथनोफार्माकोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या, उंदीर आणि मानवांवर केलेल्या एका अभ्यासानुसार, परवळाच्या अर्काने शरीरातील एलडीएल (वाईट कोलेस्ट्रॉल) व ट्रायग्लिसराइड्सची पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली आणि एचडीएल (चांगले कोलेस्ट्रॉल) वाढले. त्यात असलेल्या तंतुमय घटकामुळे रक्तवाहिन्या अरुंद होण्यास प्रतिबंध होतो.

दुधी भोपळा : शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत

दुधी भोपळ्यामध्ये पाणी आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे शरीरातील पाण्याचे प्रमाण (हायड्रेशन) टिकवून ठेवण्यास मदत करते. ही एक हलकी आणि सहज पचणारी भाजी आहे. उन्हाळ्यात याचे सेवन शरीराला थंडावा देण्यासाठी आणि वजन संतुलित राखण्यासाठी फायदेशीर मानले जाते. जर्नल ऑफ हर्बल मेडिसिन आणि आयसीएमआर (ICMR) यांच्या संशोधनानुसार, जेव्हा रुग्णांना ९० दिवसांपर्यंत दररोज सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस देण्यात आला, तेव्हा त्यांच्या लिपिड प्रोफाइलमध्ये सुधारणा दिसून आली. दुधी भोपळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, झिंक आणि विद्राव्य फायबर धमन्यांची सूज कमी करतात आणि नैसर्गिकरीत्या रक्तदाब नियंत्रित करून हृदयविकाराचा धोका टाळतात.

कारले: कडू चव, अनेक आरोग्यदायी फायदे

कारल्यामध्ये फायटोकेमिकल्स, अँटिऑक्सिडंट्स व तंतुमयता हे घटक भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत मिळते आणि निरोगी आहाराचा एक भाग असू शकते. तज्ज्ञांच्या मते, संतुलित प्रमाणात कारल्याचे सेवन करणे संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते आणि त्यातून पोषक तत्त्वांचा चांगला पुरवठा होतो. ‘अमेरिकन जर्नल ऑफ चायनीज मेडिसिन’ आणि ‘बायोमेड रिसर्च इंटरनॅशनल’नुसार, कारले केवळ साखर नियंत्रित करीत नाही, तर त्यात असलेले फायटोकेमिकल्स यकृतालाही सक्रिय करतात. यकृत हे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल तयार करण्याचे आणि ते शरीराबाहेर टाकण्याचे मुख्य केंद्र आहे. संशोधनानुसार, कारल्यातील घटक यकृताला शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल लवकर काढून टाकण्यास मदत करतात.