Avoid These Foods for a Healthy Liver : यकृत हा शरीरातील सर्वांत महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. यकृत जर व्यवस्थित काम करत असेल, तर शरीर निरोगी राहते. आजकाल अनेक जण फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहेत, याचा थेट संबंध चुकीच्या खाण्याच्या सवयींशी आहे. यकृत निरोगी आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी आरोग्यदायी पदार्थांचे सेवन केले पाहिजे. बहुतेक लोक मोठ्या प्रमाणात मद्यपान करतात, जे यकृतासाठी सर्वांत धोकादायक मानले जाते. मद्यामध्ये असे काही घटक असतात, जे यकृतातील बी १२ जीवनसत्त्व हळूहळू कमी करतात. त्यामुळे यकृताचे कार्य बिघडते. केवळ मद्यपानच नाही, तर खाण्या-पिण्याच्या इतर सवयींमुळेही यकृताचे नुकसान होते. या सवयी कोणत्या ते जाणून घेऊ…
यकृताचे कार्य काय?
शरीरातील विषारी हानिकारक द्रव्ये बाहेर टाकण्याचे काम यकृत करते. पचनासाठी पित्त तयार करणे, अन्नातून ऊर्जा आणि आवश्यक जीवनसत्त्वे (ए, डी, के व बी१२) साठवते. त्याचे घटक विषाणू आणि संसर्गांशी लढण्यास मदत करून, शरीराचे संरक्षण करतात.
मद्यपानामुळे होणारे नुकसान
अति मद्यपानामुळे यकृताद्वारे तयार होणारे पित्ताचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे अन्न पचनास अडचण येते. मद्यपानामुळे फॅटी लिव्हर, सिरोसिस आणि कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. अति मद्यपानामुळे यकृताला इजा होऊ शकते.
यकृतासाठी धोकादायक खाद्यपदार्थ
१) पॅकेट किंवा स्नॅक फूड्स
आजकाल पॅकेज केलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ रोजच्या आहारात एक अविभाज्य भाग आहे; पण ते आरोग्यासाठी वाईट असतात. त्यामध्ये साखर, मीठ, चरबी हे पदार्थ यकृतासाठी हानिकारक असतात,
२) जास्त साखर असलेले पदार्थ
जास्त साखर असलेले पदार्थ खाणे यकृतासाठी धोकादायक ठरू शकते. अतिरिक्त साखरेमुळे यकृतामध्ये चरबी जमा होते, ज्यामुळे पचनक्रियेचे कार्य बिघडते. त्यामुळे सूज येणे, फायब्रोसिस आणि सिरोसिस होऊ शकतो.
३) औषधी वनस्पती आणि पूरक आहार
बहुतेक लोक शरीर सुदृढ करण्यासाठी पूरक आहार घेतात. परंतु, जर या आहाराचे योग्य ती माहिती न घेताच सेवन केले गेले, तर त्याचे फायदे होणार नाहीत; उलट मग असे चुकीचे आहारसेवन यकृतासाठी हानिकारक ठरू शकते उच्च प्रमाणातील प्रथिनयुक्त पूरक आहार यकृतावर ताण निर्माण करतो. त्यामुळे पचनक्रियेत बिघाड होतो. आयुर्वेदिक औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय आणि शुद्ध स्वरूपात न घेतल्यास यकृताचे कार्य बिघडते. तसेच मसालेदार पदार्थ यकृतासाठी हानिकारक असतात.
४) तळलेले किंवा जंक फूड
चाऊमीन, पिझ्झा, बर्गर, मोमोज, फ्रेंच फ्राईज हे अनेकांचे रोजचे खाणे आहे. पण, हे तळलेले पदार्थ यकृतासाठी हानिकारक असू शकतात. जास्त प्रमाणात तेल किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने यकृताच्या पचनक्रियेवर परिणाम होतो.
५) वेदनाशामक औषधे
कोणत्याही वेदनेसाठी वेदनाशामक औषधे घेणे शरीर आणि यकृतासाठी घातक ठरू शकते. वेदनाशामक औषधांमध्ये असे घटक असतात, जे तत्काळ आराम देतात; परंतु ते यकृतासाठी हानिकारक असतात. वेदनाशामक आणि इतर तत्सम औषधांचा यकृत आणि मूत्रपिंडावर थेट विपरीत परिणाम होतो.
