Leftover Food Poisoning Prevention : फ्रिज आणि मायक्रोवेव्हमुळे आपले जीवन अत्यंत सोपे झाले आहे. एखाद्या वेळेस रात्री जास्त जेवण झाले तर अशावेळी ते आपण फ्रिजमध्ये ठेवतो आणि दुसऱ्या दिवशी गरम करून खातो. परंतु, जर तुम्ही वारंवार उरलेले अन्न (लेफ्टओव्हर्स) पुन्हा गरम करून खात असाल तर काळजी घ्या, कारण काहीवेळा छोट्याश्या चुकीमुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो, (Food Poisoning) हे टाळण्यासाठी काही सुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

बेंगळुरू येथील ‘अस्टर सीएमआय हॉस्पिटल’च्या क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स विभागाच्या प्रमुख एडविना राज यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले की, उरलेले अन्नपदार्थ योग्य प्रकारे न साठवल्यास किंवा ते चुकीच्या पद्धतीने पुन्हा गरम केल्यास त्यात हानिकारक जीवाणूंची (Bacteria) वाढ होऊ शकते, ज्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो.

अन्नपदार्थ सुरक्षित साठवण्यासाठी फॉलो करा ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम:

१. दोन तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवा:

शिजवलेले अन्न शिजल्यानंतर दोन तासांच्या आत फ्रिजमध्ये ठेवले पाहिजे. शिजवलेले अन्न जास्त वेळ खोलीच्या तापमानाला (Room Temperature) उघडे ठेवल्यास त्यात जीवाणू वेगाने वाढतात. उष्ण हवामानात तर अन्न आणखी लवकर फ्रिजमध्ये ठेवले पाहिजे.

२. एअरटाईट कंटेनरचा वापर:

उरलेले अन्न नेहमी स्वच्छ आणि हवाबंद (Airtight) डब्यांत ठेवावे, यामुळे अन्नाचा ताजेपणा टिकून राहतो आणि फ्रिजमधील इतर पदार्थांमुळे होणारे दूषितीकरण (Contamination) टळते. तसेच, यामुळे अन्न लवकर थंड होण्यास मदत होते.

३. २ ते ३ दिवसांत वापर करा:

फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न दोन ते तीन दिवसांत संपवावे. अन्न जास्त काळ ठेवल्यास ते दिसायला आणि वासाला सामान्य वाटत असले तरीही त्यात जीवाणू वाढण्याचा धोका वाढतो.

४. अन्न नीट गरम करा

अन्न खाण्यापूर्वी ते पूर्णपणे आणि चांगल्या प्रकारे गरम केले पाहिजे. अन्नाच्या मधोमध भागासह संपूर्ण अन्न वाफाळलेले (वाफा निघेपर्यंत) गरम झाले पाहिजे. अन्न व्यवस्थित किंवा अर्धवट गरम केल्यास त्यातील जीवाणू जिवंत राहू शकतात, ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका वाढतो.

५. फक्त आवश्यक तेवढेच अन्न गरम करा:

तुम्हाला जेवढे अन्न खायचे आहे, फक्त तितकाच भाग वेगळा काढून गरम करा. तेच अन्न वारंवार थंड करणे आणि पुन्हा पुन्हा गरम केल्याने बॅक्टेरिया वाढू शकतात आणि अन्नाचा दर्जाही घसरतो.

या’ गोष्टी पूर्णपणे टाळा:

एडविना राज यांनी काही गोष्टी कटाक्षाने टाळण्याचा सल्ला दिला आहे: उरलेले अन्न रात्रभर स्वयंपाकघरातील ओट्यावर (Kitchen Counter) तसेच सोडू नका, कारण यामुळे जीवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते. अन्नाचा वास, चव, रंग किंवा पोत (Texture) बदललेला वाटल्यास ते खाणे टाळा, कारण ही अन्न खराब झाल्याची लक्षणे असू शकतात. तसेच, नवीन बनवलेले ताजे अन्न आणि शिळे अन्न कधीही एकाच डब्यात एकत्र करू नका. याशिवाय, फ्रिजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सामान (Overload) भरू नका, कारण अन्न सुरक्षित आणि ताजे ठेवण्यासाठी फ्रिजमध्ये योग्य हवा खेळती राहणे आणि कूलिंग होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.