फळांचा राजा असलेल्या आंब्याचा हंगाम सुरू होताच, प्रत्येक घरात त्याची मागणी वाढते. चव, सुगंध आणि गोडव्याने परिपूर्ण असलेला आंबा हे असे फळ आहे, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. उन्हाळ्यात केवळ तो चवीचा आनंदच देत नाही तर तो शरीराला ऊर्जाही देतो, यामुळे आंबा हे लोकांच्या आवडीचे फळं आहे. आंबा हे व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए ने समृद्ध असलेले फळ आहे, जे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते आणि संसर्ग टाळण्यास मदत करते. आंब्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास आणि हृदय निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरतात. आंब्यामध्ये असलेले एन्झाइम्स अन्न पचनास मदत करतात आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम देऊ शकतात.
युनानी औषध तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांच्या मते, आंबा आरोग्यासाठी उपयुक्त आहे, परंतु काही पदार्थांसह तो खाल्ल्याने फायद्यांऐवजी शरीराचे नुकसान होऊ शकते. आयुर्वेदानुसार, आंबा खाताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अनेकदा चवीच्या नादात आपण आंब्याबरोबर असे काही पदार्थ खातो, ज्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, काही खाद्यपदार्थ आंब्यासह मिसळून खाल्ल्यास त्याचा शरीरावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे त्वचेची अॅलर्जी, आम्लपित्त आणि पोटाच्या इतर समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे कोणत्या पदार्थांसह आंबा खाणं टाळलं पाहिजे जाणून घेऊ…
आंबट फळांसह आंबा खाऊ नये
आयुर्वेदानुसार, वेगवेगळी फळे एकत्र खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. प्रत्येक फळाला पचायला वेगवेगळा वेळ लागतो, त्यामुळे ती एकत्र खाल्ल्याने गॅस, आम्लपित्त आणि अपचन होऊ शकते. विशेषतः संत्री, लिंबू, केळे यांसारख्या फळांसह आंबा खाणे टाळावे. ही फळे आंब्यासह खाणे हा एक विरुद्ध आहार मानला जातो.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह खाणे टाळा
आयुर्वेदानुसार, दूध किंवा दही, आईस्क्रीम आणि मिल्कशेक यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसह आंबा खाणे आरोग्यासाठी योग्य नाही; यामुळे पचनक्रिया कमजोर होऊन गॅस, अपचन किंवा शरीरात विषारी द्रव्ये तयार होऊ शकतात. आधुनिक विज्ञान यावर स्पष्टपणे सहमत नसले तरी ज्यांना पोटासंबंधित त्रास आहे त्यांनी सावधगिरी बाळगावी.
आंबट आणि मसालेदार पदार्थांसह आंबा खाऊ नये
आंबे खाण्यापूर्वी किंवा खाल्ल्यानंतर लगेच आंबट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटातील पित्त वाढू शकते; यामुळे आम्लपित्त, छातीत जळजळ, गॅस आणि कधीकधी त्वचेची अॅलर्जी किंवा मुरुमेदेखील होऊ शकतात. जर तुम्ही आंबे खात असाल तर आंबट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा.
आंबा खाल्ल्यानंतर पाणी, चहा किंवा कॉफी पिऊ नका.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी, चहा किंवा कॉफी प्यायल्याने पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे गॅस, पोटदुखी किंवा उलट्या होण्यासारख्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात, म्हणून या दोन्ही गोष्टी खाताना त्यात अंतर ठेवा.
कारले खाल्ल्यानंतर आंबा खाऊ नये
जर तुम्ही कारले खाल्ले असेल तर त्यानंतर लगेच आंबा खाणे टाळा. या दोन्हीच्या संयोगामुळे पोटदुखी, मळमळ किंवा उलट्या होऊ शकतात.
