Natural Botox: वयानुसार आपल्या त्वचेत आणि शरीरात अनेक नैसर्गिक बदल होऊ लागतात. केस पांढरे होणे, त्वचेवर सुरकुत्या दिसणे आणि त्वचा निस्तेज होणे ही वृद्धत्वाची सामान्य लक्षणे आहेत. हे बदल हळूहळू घडणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र आजकाल अनेक लोकांमध्ये लहान वयातच त्वचेचा रंग आणि पोत बदलू लागते. तज्ज्ञांच्या मते, त्वचा निस्तेज होणे आणि सुरकुत्या पडण्यामागेएक प्रमुख कारण म्हणजे शरीरात कोलेजनची कमतरता. साधारणपणे वयाच्या चाळीशीनंतर कोलेजनचे नैसर्गिक उत्पादन कमी होऊ लागते, मात्र चुकीची जीवनशैली, खराब आहार, ताणतणाव आणि सूर्यप्रकाशामुळे ही कमतरता ४० वर्षांपूर्वीच काही लोकांमध्ये दिसून येऊ लागते.

जर तुम्हाला तुमची त्वचा दीर्घकाळ घट्ट, चमकदार आणि तरूण राहावी असे वाटत असेल तर फक्त त्वचेची काळजी घेणाऱ्या उत्पादनांवरच नव्हे तर योग्य आहार आणि पोषणावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात करा. तुम्हाला माहीत आहे का की त्वचा आतून पोषण मिळाल्यावरच बाहेरून सुंदर आणि निरोगी दिसते? वयानुसार कोलेजन कमी होऊ लागते का? महागड्या सौंदर्य उत्पादनांऐवजी तुमच्या आहारात कोलेजनयुक्त या पाच फळांचा समावेश करा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या तरूण आणि चमकदार दिसेल.

भारतीय योगगुरू, लेखिका, संशोधक डॉ. हंसा योगेंद्र यांनी दि इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीप्रमाणे, कोलेजन हे एक आवश्यक प्रोटीन आहे जे त्वचा, केस, नखे आणि हाडांची ताकद आणि रचना राखण्यात महत्त्वाती भूमिका बजावते. ते त्वचा मजबूत ठेवण्यास, लवचिकता राखण्यास आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास मदत करते.

तज्ज्ञ सांगतात की, शरीरातील कोलेजनची पातळी साधारणपणे २५ ते ३० वर्षांच्या वयानंतर कमी होते. ३०व्या वयानंतर नैसर्गिक कोलेजन उत्पादन कमी होऊ लागते आणि वयानुसार दरवर्षी ते सुमारे १ टक्क्यांनी कमी होऊ शकते. म्हणऊनच कालांतराने त्वचा निस्तेज होऊ लागते आणि सुरकुत्या दिसू लागतात. काही फळे त्वचेचा रंग दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. तर मग जाणून घेऊया कोणती फळे नैसर्गिकरित्या कोलेजन तयार करण्यास मदत करू शकतात…

व्हिटॅमिन सी युक्त फळे

व्हिटॅमिन सी (एस्कॉर्बिक अॅसिड) हे कोलेजन उत्पादनासाठी सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. जर्नल ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्रीमधील संशोधनानुसार, शरीरात हायड्रॉक्सिलेशन प्रक्रियेसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. ही प्रक्रिया प्रो-कोलेजन रेणूंना एकत्र जोडते आणि त्यांना स्थिर कोलेजन स्ट्रक्चरमध्ये रूपांतरित करते. व्हिटॅमिन सीशिवाय शरीर कोलेजन तयार करू शकत नाही. किवीमध्ये व्हिटॅमिन सी तसंच ऑक्टेनिडाइन एन्झाइम्स असते. ते प्रोटीन शोषण्यास मदत करते.नियमितपणे संत्री खाल्ल्याने त्वचा मजबूत, चमकदार आणि लवचिक बनते. ते आधीच्या कोलेजनचे विघटन देखील रोखते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. किवीमध्ये संत्र्‍यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. ते कोलेजन उत्पादनास गती देते. जे लोक नियमितपणे किवी खातात त्यांची त्वचा अधिक हायड्रेटेड, उजळ आणि कमी निस्तेज असते.

पपईचा फायदा

पपई हे एक असे फळ आहे जे जवळपास वर्षभर उपलब्ध असते. पपईमध्ये असलेले पापेन एन्झाइम् आणि व्हिटॅमिन ए त्वचेच्या पेशींची उलाढाल वाढवते. संशोधनानुसार, जेव्हा जुन्या मृत पेशी काढून टाकल्या जातात तेव्हा त्वचेच्या खालच्या थरांमध्ये कोलेजन उत्पादक फायब्रोब्लास्ट अधिक सक्रिय होतात. यामुळे सूर्यामुळे होणारे नुकसान दुरूस्त होण्यास मदत होते. पपई त्वचेसाठी नैसर्गिक उपचारक म्हणून काम करते. ते गुळगुळीत, ताजी आणि निरोगी बनवते. पपई प्रदूषण आणि उन्हामुळे होणाऱ्या कोलेजन नुकसानापासून देखील संरक्षण करते, त्यामुळे त्वचा लवकर वयस्कर होत नाही.

स्ट्रॉबेरीचे फायदे

जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, स्ट्रॉबेरीमध्ये असलेले एलाजिक अॅसिड कोलेजनला नष्ट होण्यापासून वाचवते. सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेतील एमएमपी नावाचे एन्झाइम्स वाढते, जे कोलेजनचे विघटन करते. एलाजिक अॅसिड या एन्झाइमला रोखण्यास मदत करते. स्ट्रॉबेरीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सूर्यकिरणांमुळे आणि प्रदूषणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून कोलेजनचे संरक्षण करतात. नियमित सेवनाने निरोगी दिसणारी त्वचा मिळते. डोळे आणि ओठांभोवतीच्या बारीक रेषा हळूहळू कमी होतात.

डाळिंब खाण्याचे फायदे

डाळिंबाच्या बियांमध्ये प्युनिकलॅजिन्स आणि अँथोसायनिन्स असतात. संशओधनानुसार, डाळिंब कोलेजन तयार करणाऱ्या फायब्रोब्लास्ट पेशींचे आयुष्य वाढवते. ते केवळ नवीन कोलेजन तयार करत नाही तर त्वचेची लवचिकता देखील राखते. डाळिंब शरीरातील आधीच्या कोलेजनचे संरक्षण करते, शिवाय नवीन कोलेजन तयार करण्यास देखील मदत करते. दररोज डाळिंबाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे त्वचेला अधिक ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळतात. एक वाटी डाळिंबाचे सेवन केल्याने त्वचेचा रंग सुधारतो, नैसर्गिक चमक येते आणि वृद्धत्व कमी होते. डाळिंब त्वचेला आतून दुरूस्त करते.