5 Smart Tips For Storing Okra (Bhindi) : बाजारातून दररोज ताजी भाजी आणणे प्रत्येकाला शक्य होतेच असे नाही. त्यामुळे अनेक जण आठवडाभर पुरेल एवढी भाजी एकाच वेळी खरेदी करून फ्रिजमध्ये ठेवतात. मात्र, सर्वच भाज्या जास्त दिवस ताज्या राहत नाहीत. त्या योग्य पद्धतीने साठवून न ठेवल्यास लवकर सुकतात किंवा खराब होतात. विशेषतः भेंडी लवकर सुकते, बुळबुळीत होते किंवा सडू लागते. अनेकदा फ्रिजमध्ये ठेवूनही भेंडी काळी पडते आणि तिची चवही बदलते. त्यामुळे भेंडी जास्त दिवस ताजी आणि चांगल्या स्थितीत राहावी यासाठी तिची साठवणूक नेमकी कशी करावी, असा प्रश्न अनेकांना पडतो.
भेंडी ही अशी भाजी आहे, जी योग्य प्रकारे साठवली नाही तर लवकर दमट होऊन खराब होऊ शकते. पण, काही सोप्या किचन हॅक्स आणि घरगुती उपायांनी तुम्ही भेंडी जास्त काळ ताजी ठेवू शकता. योग्य तापमान, योग्य भांडे आणि ओलाव्यापासून संरक्षण यांसारख्या सोप्या उपायांमुळे तुमच्या भाज्या लवकर खराब होण्यापासून वाचू शकतात. इतकेच नाही तर काही टिप्सचे पालन केल्याने भेंडीची चव आणि पोषणमूल्ये देखील टिकून राहतात.
जर तुम्हालाही भेंडी वारंवार खराब होण्याची चिंता वाटत असेल, तर पुढील सोप्या साठवणुकीच्या टिप्स अत्यंत उपयुक्त ठरतील.
भेंडी जास्त काळ ताजी ठेवण्याचे ५ सोपे मार्ग…
१. भेंडी लगेच साठवू नका
भेंडीतील ओलाव्यामुळे ती लवकर खराब होते. भेंडी खरेदी केल्यानंतर न धुता साठवा. पण, वापरण्यापूर्वी पाण्याने धुवायला विसरू नका.
२. पेपर टॉवेल वापरा
भेंडी साठवताना पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा. यामुळे अतिरिक्त ओलावा शोषला जातो, ज्यामुळे ती जास्त काळ ताजी राहते.
३. हवाबंद डबा वापरा
घट्ट बंद डब्यामुळे ओलावा वाढू शकतो. त्यामुळे ती थोड्या उघड्या डब्यात किंवा कापडी पिशवीत साठवणे उत्तम. यामुळे हवा खेळती राहते आणि भाजी खराब होण्यापासून वाचते.
४. फ्रिजमध्ये योग्य ठिकाणी साठवा
भेंडी फ्रिजमधील भाजी ठेवण्याच्या कप्प्यात साठवून ठेवा. मात्र, ती खूप थंड ठिकाणी ठेवू नका. जास्त थंडीमुळे भेंडी काळी पडू शकते. योग्य तापमानात ठेवल्यास भेंडीचा ताजेपणा अधिक काळ टिकण्यास मदत होते.
५. ताबडतोब फेकून द्या.
जर भेंडी खराब होऊ लागली तर ती ताबडतोब फ्रिजमधून काढून टाका. एक खराब भेंडी इतर भाज्या खराब करू शकते. त्यामुळे भाज्या नियमितपणे तपासा.
भेंडी जास्त काळ ताजी कशी ठेवावी?
भेंडी न धुता पेपर टॉवेलमध्ये गुंडाळा आणि फ्रिजमधील भाजीच्या कप्प्यात ठेवा. ती हवाबंद डब्यात ठेवणे टाळा आणि ओलाव्यापासून दूर ठेवा. यामुळे ती अनेक दिवस ताजी राहण्यास मदत होऊ शकते.
