नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून नोकरी करणाऱ्या भारतीयांपैकी (२५-३५ वयोगटातील) ९१ टक्के लोक त्यांच्या आर्थिक बाबी स्वत:च हाताळतात. आर्थिकदृष्ट्या जागरूक असल्याने ते संपत्ती निर्माण करण्याच्या आणि आर्थिक नियोजनाच्या वाटेवर बचत करण्यापासून ते गुंतवणूक करण्यापर्यंत पावले उचलत असतात. पण आपण करत असलेल्या बचतीतून आणि गुंतवणूकीतून योग्य तो फायदा मिळण्यासाठी काही चुका त्यांनी टाळणं महत्त्वाचं आहे, पाहूयात कोणती काळजी घ्यायला हवी.

योग्य वेळी जोखीम न घेणे

तुम्ही जेवढे तरुण असाल, तेवढीच जास्त जोखीम तुम्ही घेऊ शकता. दीर्घकाळासाठी गुंतवणूक करताना उच्च जोखीम-उच्च परतावा इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करणं चांगलं. म्युच्युअल फंड्‌स एसआयपीज्‌च्या माध्यमातून इक्विटीशी एक्सपोजर हा तुमच्या बचतीवर फार ताण न आणता लहान वयातच संपत्ती निर्माण करण्याच्या सर्वोत्तम मार्गांपैकी एक मार्ग आहे. वय तुमच्या बाजूने असल्याने तुम्ही तेजीचा सामना करणाऱ्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करू शकता. बाजारातील तात्कालिक चढ-उतारांचा सामना करू शकता आणि दीर्घकाळात उच्च परतावा प्राप्त करू शकता. पण तुम्ही जर जोखीम घेणं टाळलं, तर तुमचा दीर्घकालीन परतावा कमी असू शकतो आणि तो तेजीचा सामना करण्यासाठी पुरेसा नसतो. यामुळे तुमच्या आयुष्यात नंतर आर्थिक ताण येऊ शकतो.

उद्देशहीन गुंतवणूक करणे

आर्थिक उद्देश महत्त्वाचे असतात, कारण त्यामुळे तुम्हाला गुंतवणूक करायला, बचत करायला आणि तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगासाठी आणि सोनेरी वर्षांसाठी गुंतवणूक करायला प्रेरणा मिळते. तुम्ही जर उद्दीष्टांशिवाय गुंतवणूक केली, तर तुम्ही गुंतवणुकीसाठी चुकीची निवड करू शकता आणि रोखीत रूपांतर करताना तुम्हाला त्रास होऊ शकतो किंवा पैशाची गरज असेल तेव्हा तुमच्यावर ताण येऊ शकतो. उदाहरणार्थ, एकाने त्याच्या गुंतवणुकीपैकी ८० टक्के गुंतवणूक एनपीएसमध्ये केली आणि उर्वरित २० टक्के बँकेच्या मुदतठेवीत, इक्विटी म्युच्युअल फंड एसआयपी आणि डेट फंडमध्ये केली. चार वर्षांनंतर त्याने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याच्या गुंतवणुकीपैकी बहुतेक गुंतवणूक एनपीएसमध्ये लॉक-ईन झालेली असल्याने, त्याला पैसे कमी पडू लागले आणि तो मालमत्ता खरेदी करू शकला नाही. म्हणून पैशाची गरज असेल तेव्हा त्रास होऊ नये म्हणून आणि गुंतवणुकीवर चांगला परतावा प्राप्त करण्यासाठी आपापल्या आर्थिक गरजांनुसार गुंतवणूक करणे महत्त्वाचे असते.

उत्पन्न वाढेल त्यानुसार गुंतवणूक न वाढवणे

पगारवाढ आणि बोनस यांचा वापर चंगळवादावर न करता गुंतवणूक वाढवण्यासाठी केला पाहिजे. तुम्ही जर एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेली असेल, तर तुम्ही चांगला परतावा मिळविण्यासाठी तुमचा एसआयपी वाढवण्यामध्ये तुमच्या पगारवाढीचा उपयोग करू शकता. पगारवाढीतून वाढलेल्या तुमच्या उत्पन्नाचा विचार तुम्ही कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि क्रेडिट कार्डचे हाफ्ते भरण्यासाठी करायला हवा. वाढत्या वयाबरोबर आणि उत्पन्नासोबत तुम्ही तुमची गुंतवणूक जसजशी वाढवत न्याल, तसतसे तुम्ही तुमच्या आयुष्यातील उद्दिष्टं पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण कराल.

तुमच्या गुंतवणुकीत विविधता न आणणे

तुमच्या गुंतवणुकीच्या पर्यायांपासून सर्वोत्तम परिणाम प्राप्त करण्यासाठी वैविध्य अत्यंत महत्त्वाचे असते. तुम्ही तुमची सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका. तुम्ही जर असं केलं आणि गुंतवणुकीची ती योजना जर फसली, तर तुमच्या पैशासाठी मोठी जोखीम निर्माण होऊ शकते. त्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा परतावा, जोखमा आणि रोकडसुलभता देणाऱ्या वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये गुंतवणूक केली पाहिजे. तुमच्या आर्थिक उद्देशांसाठी सर्वोत्तम इन्स्ट्रुमेंटची निवड करण्यासाठी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन न करणे

मिलेनिअल्स बऱ्याचदा त्यांच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचं पुनरावलोकन करीत नाहीत आणि बदलतं उत्पन्न, जोखीम घ्यायची तयारी आणि आर्थिक स्थितीनुसार आवश्यक ते बदल करत नाहीत. उदाहरणार्थ, एका गुंतवणूकदाराने त्याची गुंतवणूक वयाच्या २२व्या वर्षी सुरू केली, ज्यात ८० टक्के हिस्सा इक्विटीसाठी दिला आणि २० टक्के डेट इन्स्ट्रुमेंट्‌समध्ये. गुंतवणूकदाराला इक्विटी गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळाला आणि त्यामुळे त्याच्या गुंतवणूक पोर्टफोलिओचे प्रमाण ९० टक्के इक्विटी आणि १० टक्के डेट असं झालं, पण गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार ते इक्विटी आणि डेटमध्ये ८०:२० असे असायला हवे होते. म्हणून, गुंतवणूकदाराने इक्विटीचा हिस्सा डेटकडे वळवला पाहिजे व तो ८०:२० च्या पातळीवर पुनर्संतुलित केला पाहिजे. त्याचप्रमाणे, एकदा गुंतवणूकदाराचं वय वाढलं आणि तो निवृत्तीच्या जवळ पोहोचला, की गुंतवणूकदाराच्या जोखीम घेण्याच्या गरजांनुरूप गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचं पुनर्संतुलन करणं आवश्यक असतं. हे सगळे करत असताना, तेजीचा विचार डोक्यात असणे आवश्यक आहे. मिलेनिअल्स कधीकधी नव्या जगतातील गुंतवणूक उत्पादनांकडे झुकू शकतो, पण त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ बांधताना पारंपरिक गुंतवणूक उत्पादनांकडे दुर्लक्ष करू नये. भविष्यातील खर्च भागवण्यासाठी पैसे उसने घेण्यापेक्षा आधीच पैसे गुंतवणं महत्त्वाचं असतं.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार