Japanese Weight Loss Secrets : वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर पोटाभोवती चरबी जमा होणे ही एक अतिशय सामान्य समस्या आहे. ही वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक जण जेवण कमी करतात, रोज चालतात आणि व्यायामही करतात; तरीही त्यांच्या शरीरात काही खास फरक दिसून येत नाही. जर तुमच्या बाबतीतही असेच घडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. सलीम झैदी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी वजन कमी करण्यासाठी जपानी लोकांचे ५ सीक्रेट्स सांगितले आहेत. डॉ. सलीम झैदी यांच्या मते, जर तुम्ही रोज सकाळी ५ गोष्टी फॉलो केल्या, तर अवघ्या एका महिन्यात तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागतील. चला तर मग जाणून घेऊयात या सोप्या सवयींबद्दल:
१. सकाळी उठल्या उठल्या मोबाईल पाहू नका आजकाल बहुतांश लोकांची सकाळ मोबाईल पाहूनच होते. लोक सकाळी उठतात आणि लगेच फोन वापरू लागतात. यावर बोलताना डॉ. सलीम झैदी म्हणतात की, सकाळी डोळे उघडताच मेसेज, सोशल मीडिया, बातम्या किंवा ऑफिसचे काम पाहिल्याने मेंदूवरचा ताण वाढू शकतो. यामुळे तुम्ही दिवसभर स्ट्रेसमध्ये (मानसिक ताणात) राहता. वाढता स्ट्रेस हे लठ्ठपणा वाढण्याचे एक मुख्य कारण आहे. म्हणूनच सकाळी उठल्यानंतर काही वेळ फोनपासून दूर राहा. त्याऐवजी थोडा वेळ शांत ठिकाणी बसा आणि कोणतीही घाई न करता दिवसाची सुरुवात करा. यामुळे तुमचे मन ताजेतवाने राहील आणि दिवसभर हलके वाटेल.
२. सकाळी सर्वात आधी पाणी प्या सकाळी उठल्या उठल्या चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी आधी एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. रात्रभर झोपल्यानंतर शरीराला पाण्याची गरज असते. अशा वेळी जर तुम्ही चहा किंवा कॉफी प्यािला, तर शरीरात ‘कोर्टिसोल’ हा स्ट्रेस हार्मोन वाढू शकतो, ज्यामुळे हळूहळू वजन वाढू लागते. पाणी पिल्यानंतर काही वेळाने तुम्ही चहा किंवा कॉफी घेऊ शकता.
३. सकाळी ५ ते १० मिनिटे कोवळ्या उन्हात बसा जपानी लोक सकाळचे कोवळे ऊन कधीही मिस करत नाहीत. सकाळचे हलक्के ऊन आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. हे शरीराचे नॅचरल क्लॉक म्हणजेच ‘सर्केडियन रिदम’ (Circadian Rhythm) संतुलित ठेवण्यास मदत करते. यामुळे दिवसभर शरीर ॲक्टिव्ह राहते आणि रात्री उत्तम झोप येते. दररोज पुरेशी आणि चांगली झोप घेतल्याने वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.
४. ५ मिनिटे दीर्घ श्वास घ्या (Deep Breathing) डॉक्टरांच्या मते, रोज सकाळी फक्त ५ मिनिटे काढून मेडिटेशन (ध्यान) किंवा दीर्घ श्वास घ्यावा. एक हात पोटावर ठेवा आणि नाकाने हळूहळू दीर्घ श्वास आत घ्या. असे केल्याने स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रणात राहतात.
५. सकाळी २० ते २५ मिनिटे चाला याशिवाय रोज सकाळी थोडा वेळ मॉर्निंग वॉक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. चालण्याने शरीर ॲक्टिव्ह होते आणि मेटाबॉलिझम (पचनशक्ती) बूस्ट होते, ज्याचा थेट फायदा वजन कमी करण्यासाठी होतो.
डॉ. सलीम झैदी सांगतात की, रोज सकाळी या ५ गोष्टी केल्यास स्ट्रेस हार्मोन्स नियंत्रणात राहतात. चाळीशीनंतर स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यामुळे वजन वेगाने वाढते. त्यामुळे तुम्ही या ५ जपानी सवयी तुमच्या रोजच्या जीवनशैलीत समाविष्ट करू शकता. यासह पौष्टिक आहार घ्या, रोज थोडा व्यायाम करा आणि ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या. हे रुटीन रोज फॉलो केल्यास महिनाभरातच शरीरावर सकारात्मक परिणाम दिसू लागतील आणि तुम्ही स्वतःला अधिक तंदुरुस्त व ॲक्टिव्ह अनुभवू शकाल.
