Women and Rare Diseases : महिलांना पीसीओएस, फायब्रॉइड्स किंवा स्तनाचा कर्करोग यांसारख्या आजारांविषयी माहिती असते, परंतु काही आजार असेही आहेत ज्यांची लक्षणे फार सामान्य असतात त्यामुळे अनेकदा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. जर हे आजार वेळीच ओळखले गेले नाहीत, तर ते गंभीर स्वरुप धारण करु शकतात. त्यामुळे महिलांनी शरीरात होणारे बदल समजून घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. या आजारांविषयी आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊ…

दिल्ली येथील मॅक्युर हॉस्पिटल आणि आस्था हॉस्पिटलच्या प्रसूती व स्त्रीरोगतज्ञ आणि आयव्हीएफ सह-संस्थापिका डॉ. गीता जैन यांनी एका वृत्तसंस्थेला या आजारांविषयी माहिती दिली आहे.

१. एंडोमेट्रिओसिस (Endometriosis)

एंडोमेट्रिओसिस हा महिलांना होणारा एक दुर्मिळ आजार आहे. या स्थितीत, गर्भाशयाच्या अस्तरसारख्या पेशी गर्भाशयाच्या बाहेर वाढू लागतात. यामुळे पोटात तीव्र वेदना, मासिक पाळीत जास्त रक्तस्राव आणि गर्भधारणेत अडचण येऊ शकते. महिला अनेकदा या स्थितीकडे मासिक पाळीतील सामान्य वेदना म्हणून दुर्लक्ष करतात, परंतु वेळेवर उपचार करणे आवश्यक आहे.

२. ॲडेनोमायोसिस (Adenomyosis)

ॲडेनोमायोसिस हा आणखी एक दुर्मिळ आजार आहे. या आजारात गर्भाशयाचे अस्तर त्याच्या स्नायूंमध्ये वाढते. यामुळे मासिक पाळीत तीव्र वेदना आणि रक्तस्त्राव, पोटात सूज आणि ॲनिमिया होऊ शकतो. हा आजार ३५ वर्षांवरील महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो, परंतु योग्य तपासणीशिवाय त्याचे निदान करणे कठीण असू शकते.

३. प्री मॅच्युअर ओव्हेरियन इनसफिशीयन्सी (Premature Ovarian Insufficiency)

तिसरा दुर्मिळ आजार म्हणजे प्री मॅच्युअर ओव्हेरियन इनसफिशीयन्सी (POI). यामध्ये वयाच्या ४० वर्षांपूर्वी अंडाशयाचे कार्य थांबते, ज्यामुळे मासिक पाळी अनियमित होते किंवा पूर्णपणे थांबते. हे अनेकदा हार्मोनल असंतुलनामुळे होते असे समजले जाते, परंतु याचा परिणाम भविष्यातील प्रजनन क्षमतेवर होऊ शकतो.

४. लायकेन स्क्लेरोसस (Lichen sclerosus)

चौथा आजार म्हणजे लायकेन स्क्लेरोसस, जो गुप्तांगांच्या त्वचेवर परिणाम करणारा एक दुर्मिळ दाहक रोग आहे. यामुळे खाज सुटणे, जळजळ होणे आणि त्वचा पातळ होणे अशी लक्षणे दिसतात. यावर त्वरित उपचार न केल्यास, तीव्र अस्वस्थता आणि संसर्ग होऊ शकतो.

५. जेस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक डिसीज (Gestational Trophoblastic Disease)

पाचवा दुर्मिळ आजार म्हणजे जेस्टेशनल ट्रोफोब्लास्टिक डिसीज, जो गर्भधारणेदरम्यान पेशींच्या असामान्य वाढीमुळे होतो. याच्या लक्षणांमध्ये असामान्य रक्तस्त्राव, अति प्रमाणात उलट्या होणे आणि गर्भाशय मोठे होणे यांचा समावेश असू शकतो. हा आजार दुर्मिळ आहे, परंतु वेळेवर निदान आणि उपचाराने तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

महिलांनी या आजारांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी?

महिलांनी कोणत्याही असामान्य वेदना, अनियमित रक्तस्राव , खूप थकवा किंवा गुप्तांगातील बदलांकडे दुर्लक्ष करू नये . नियमित स्त्रीरोग तपासणी, पॅप स्मीअर आणि अल्ट्रासाऊंडमुळे अनेक आजार लवकर ओळखण्यास मदत होते.वेळेवर उपचार केल्यास निरोगी आरोग्य ठेवण्यास मदत होईल.