5 Ways Eating More Fiber Can Backfire : आहारात फायबरचं प्रमाण वाढवा आणि पचनसंस्थेला त्याचा फायदा होऊ द्या हा फायबरबाबतचा सल्ला ऐकायला अगदी सोपा वाटतो. पण, अचानक त्याचे प्रमाण वाढवणे, चुकीचा प्रकार निवडणे, पुरेसे पाणी न पिणे यांमुळे तुम्हाला बरे वाटण्याऐवजी अधिक त्रास होऊ शकतो. तर याबद्दल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपेटोलॉजीमध्ये ‘डबल बोर्ड-सर्टिफाइड’ आहेत आणि ज्यांनी एम्स (AIIMS), हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड येथे प्रशिक्षण घेणारे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर सौरभ सेठी यांनी व्हिडीओद्वारे माहिती दिली आहे. त्यांच्या मते, काही सामान्य चुका टाळणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे.
इन्स्टाग्राम पोस्टमध्ये डॉक्टरांनी नमूद केले की, केवळ पाच टक्के प्रौढ व्यक्ती फायबरच्या शिफारस केलेल्या दैनंदिन प्रमाणाचे पालन करतात. काही लोक दिवसाला सुमारे १५ ग्रॅम फायबर घेतात; तर फायबरचे प्रमाण शरीरात २५ ते ३८ ग्रॅमदरम्यान असायला पाहिजे. जर तुम्ही ही कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर आहारात अचानक खूप जास्त फायबर समाविष्ट करण्याऐवजी ते हळूहळू वाढवणे अधिक चांगले ठरेल.
फायबरबाबत टाळण्यासारख्या ५ चुका
१. पुरेसे पाणी न पिणे
फायबरयुक्त जेवणाचे सेवन करणे हा एक आरोग्यदायी पर्याय वाटू शकतो. पण, जर तुम्ही द्रव पदार्थाचे सेवन करीत नसाल, तर त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. फायबर पचनमार्गातून पुढे सरकताना पाणी शोषून घेते. जर शरीरात पुरेसा द्रव नसेल, तर ही प्रक्रिया तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला अपेक्षित आराम मिळण्याऐवजी पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
२. फायबरचे प्रमाण खूप वाढवणे
कमी फायबर असलेल्या आहारातून अचानक जास्त फायबर असलेल्या आहाराकडे वळणे ही आणखी एक चूक आहे. तुमच्या पचनसंस्थेतील जीवाणूंना या बदलाशी जुळवून घेण्यासाठी वेळेची गरज असते. त्यामुळे फायबरचे प्रमाण हळूहळू वाढावा. दर काही दिवसांनी त्यात पाच ग्रॅमपेक्षा जास्त वाढ करू नये. त्यामुळे एकाच दिवसात १५ ग्रॅमवरून ३५ ग्रॅमवर जाण्याऐवजी तुमच्या पचनसंस्थेला जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्या.
३. सर्व फायबर एकाच वेळी खाणे
दिवसभरात तुम्ही फायबरचे सेवन कसे करता हेदेखील महत्त्वाचे आहे. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात सेवन करण्याऐवजी, ते वेगवेगळ्या जेवणांमध्ये विभागून घ्या. त्यामागचा उद्देश पचनसंस्थेवर एकाच वेळी मोठा ताण (डोस) टाकण्याऐवजी, तिला पचनासाठी कमी प्रमाणात फायबर देणे हा आहे.
४. चुकीच्या प्रकारातील फायबर निवडणे
सर्व प्रकारचे फायबर एकाच प्रकारे काम करीत नाहीत. त्यामुळे विरघळणारे (soluble) आणि न विरघळणारे (insoluble) फायबर यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ- ओट्स आणि इसबगोल (psyllium) यांसारख्या पदार्थांमध्ये आढळणारे ‘विरघळणारे फायबर’ (पाण्यात विरघळणारा घटक) आणि पचनक्रिया मंदावते. अतिसार, कोलेस्ट्रॉल समस्यांच्या व्यवस्थापनासाठी हे फायबर उपयुक्त ठरू शकते. गव्हाचा कोंडा आणि भाज्यांची साले यांमध्ये असलेले अविद्राव्य फायबर आतड्यांची हालचाल सुरळीत करण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी हे फायबर अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे तुमच्या त्रासानुसार फायबरचा योग्य प्रकार निवडला नाही, तर फायदा होण्याऐवजी पोटाचे त्रास आणखी वाढू शकतात.
५. आतड्यांची बिघडणारी लक्षणे दुर्लक्षित करणे
आहारात फायबर वाढवल्यानंतर जर पोटाशी संबंधित त्रास कमी होण्याऐवजी वाढत असेल, तर तो त्रास सहन करत फायबर तसंच घेत राहू नये. शरीराला फायबरचे प्रमाण किंवा प्रकार योग्य नसल्याचा हा संकेत असू शकतो. फायबर आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे; पण जास्त फायबर म्हणजे जास्त फायदा शरीराला होईल, असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे आहारात फायबर हळूहळू वाढवावे, पुरेसे पाणी प्यावे आणि कोणत्या प्रकारचे फायबर घेत आहोत याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे पचनसंस्थेवर अचानक ताण येणार नाही.
