वाढत्या वयाबरोबर जबाबदाऱ्या वाढतात, अनेक बदल आपल्या आयुष्यात घडत असतात. तरुण असताना आपल्याला फारसे शारीरिक, मानसिक बदल समजत नाही, परंतु वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतर हे बदल प्रकर्षाने दिसतात. जेव्हा आपण ३० वर्षांचे होतो तेव्हा केवळ आपली जीवनशैलीच बदलत नाही तर आपले विचार आणि आरोग्याची काळजी घेण्याची पद्धत देखील बदलते. या वयात आपले शरीर पूर्वीसारखे कार्य करत नाही आणि जर आपण लहान चुका करणे टाळले नाही तर त्यानंतर मोठ्या समस्यांना समोरे जावे लागते, त्यामुळे वयाच्या तिशीनंतर जीवनशैलीत नेमके कोणते बदल करणे गरजेचे आहे जाणून घेऊ…

१) झोपेला प्राधान्य द्या

तरुणपणात उशिरापर्यंत जागणे आणि कमी झोपेच्या सवयीने काही फरक पडत नाही, पण वयाच्या तिशीनंतर ही सवय आपल्या आरोग्यावर परिणाम करू लागते. योग्य झोपेच्या अभावामुळे थकवा, वजन वाढणे, ताणतणाव आणि अशक्तपणा यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दररोज रात्री किमान ७ ते ८ तास झोपेचे लक्ष्य ठेवले पाहिजे. शिवाय तुम्ही झोपण्याची आणि उठण्याची वेळदेखील निश्चित केली पाहिजे.

२) आहारात संतुलन ठेवा

वयाच्या ३० व्या वर्षी पोहोचल्यानंतर चयापचय क्रिया हळूहळू कमकुवत होते, म्हणून आहाराची विशेष काळजी घ्यायला सुरुवात केली पाहिजे. जंक फूड, गोड पदार्थ आणि तळलेले स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढू शकते आणि आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. निरोगी राहण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या, फळे, प्रथिनांचे विविध स्रोत आणि पुरेसे पाणी यांचा समावेश करा. शक्य तितके बाहेरचे अन्न खाणे टाळा आणि संतुलित आहार राखण्याचा प्रयत्न करा.

३) दररोज व्यायामाची सवय लावा

वयाच्या ३० व्या वर्षानंतर तंदुरुस्त राहणे अधिक महत्त्वाचे बनते. ते फक्त दिखावा नाही तर एक गरज आहे. तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत किमान ३० मिनिटे चालणे, योगा किंवा हलका व्यायाम समाविष्ट करा. नियमित शारीरिक हालचाली निरोगी हृदय राखण्यास मदत करतात आणि तणाव कमी करतात.

४) मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या

बऱ्याचदा आपण आपल्या शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, परंतु मानसिक आरोग्याची पुरेशी काळजी घेण्यात अपयशी ठरतो. ३० वर्षांच्या वयानंतर कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि भविष्याबद्दलच्या चिंता आणखी वाढतात. जर तुम्ही ३० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल, तर तुम्ही स्वतःसाठी अधिक वेळ काढायला सुरुवात केली पाहिजे. तुमचा ताण कमी करण्यासाठी ध्यान करा किंवा तुमच्या आवडत्या कोणत्याही कामात व्यस्त रहा.

५) डिजिटल बॅलेन्स

जेव्हा तुम्ही तुमचा बहुतेक वेळ स्मार्टफोन किंवा स्क्रीनकडे पाहण्यात घालवता, तेव्हा ही सवय तुमच्या झोपेवरच परिणाम करत नाही तर तुमच्या डोळ्यांवर आणि मानसिक आरोग्यावरही हानिकारक परिणाम करू शकते. काम नसल्यास स्क्रीनकडे पाहणे टाळा. याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवला पाहिजे. जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या संतुलित राहता.