Cancer Symptoms Treatment : लोकांच्या मनात कर्करोगाबाबत (कॅन्सर) अनेक शंका व प्रश्न असतात. याबाबत अचूक जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते; मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अशाच काही अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर कॅन्सर सर्जन आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरांनी सविस्तर माहिती दिली आहे.
कर्करोग हा एक अत्यंत गंभीर आजार आहे. वेळीच निदान झाले, तर त्यावर योग्य उपचार करणे शक्य होते; मात्र उपचारांना उशीर झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. गेल्या काही वर्षांत केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. भारतात दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कर्करोगाची लक्षणे आणि वेळेवर निदान यांबाबत सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.
वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांचे निदान आणि चाचण्या वेगवेगळ्या असतात. अशा परिस्थितीत “वेदना किंवा गंभीर लक्षणे दिसण्याची वाट पाहू नका, नियमितपणे आरोग्य तपासणी (Screening) करून घ्या,” असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टर देतात. यामुळे कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होऊ शकते. रायपूर येथील प्रसिद्ध कॅन्सर सर्जन आणि सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जयेश शर्मा यांनी कर्करोगाबाबत लोकांच्या मनात असलेल्या प्रश्नांवर आणि भ्रमांवर भाष्य करताना पुढील ५ महत्त्वाची सत्ये सांगितली आहेत:
कर्करोगाबाबतची ५ महत्त्वाची सत्ये:
१) वेदना होण्याची पाहू नका वाट
अनेकांचा असा समज असतो की, आजार गंभीर असल्याशिवाय वेदना होत नाहीत. परंतु, कर्करोग हा शरीरातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होतो. बऱ्याचदा सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही वेदना होत नाही. त्यामुळे वेदना सुरू होण्याची वाट न पाहता तपासणी करणे गरजेचे आहे.
२) जीवनशैलीसोबतच इतर घटकही जबाबदार
सुमारे निम्म्या प्रकारच्या कर्करोगांवर जीवनशैलीतील सकारात्मक बदलांमुळे नियंत्रण मिळवणे शक्य असते. परंतु, उर्वरित निम्म्या कर्करोगांवर आपले थेट नियंत्रण नसते. वय, पर्यावरण, आनुवंशिकता आणि जनुकीय घटक (Genetics) यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे एखाद्याला कर्करोग झाला, तर त्या व्यक्तीच्या चुकीच्या सवयींमुळेच तो झाला असावा, असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरते.
३) उपचारात कोणताही नसतो‘शॉर्टकट’
कर्करोगाच्या उपचारात कोणताही सोपा किंवा जादूचा मार्ग नाही. जर कोणी असा दावा करत असेल किंवा “मी अनेक रुग्णांना पूर्णपणे बरे केले आहे” असे सांगत असेल, तर त्यांच्याकडे उपचारांचा यशस्वी दर (Success Rate) आणि वैज्ञानिक पुरावे नक्की मागा. यामुळे तुमची आर्थिक व मानसिक फसवणूक टळू शकते.
४) पहिल्या-दुसऱ्या टप्प्यात ९०% आजार होतो बरा
जर कर्करोगाचे निदान पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात (Stage 1 or 2) झाले आणि त्वरित वैद्यकीय उपचार सुरू केले, तर ८० ते ९० टक्के कर्करोग समूळ नष्ट करता येतो. वेळेवर उपचार घेतल्यास उपचारांचा खर्च कमी होतो, वेळ वाचतो आणि रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता वाढते.
५) तपासणी चाचण्या सहज उपलब्ध
भारतात स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), तोंडाचा कर्करोग (Oral Cancer), गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer), फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) आणि मोठ्या आतड्याचा कर्करोग (Colon Cancer) यांसारख्या सामान्य कर्करोगांसाठी उत्तम तपासणी चाचण्या सहज उपलब्ध आहेत. कोणतीही स्पष्ट लक्षणे नसतानाही या चाचण्यांमुळे आजाराचा शोध घेता येतो. यामुळे कर्करोगाचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी करता येतो.
