Toothache home remedy fast relief : दात दुखू लागल्यास रोजचा साधा दिवसही त्रासदायक होऊ शकतो. कधी आपण जेवणाचा आनंद घेत असतो, पण अचानक दात दुखू लागल्याने खाणे-पिणेही कठीण होते. काही वेळा दातदुखी अचानक सुरू होते. अशा वेळी थोडा वेळ थांबावे, घरगुती उपाय करून पाहावेत की लगेच दंतवैद्याकडे जावे, असा प्रश्न अनेकांना पडतो.
पण, दातांत अचानक वेदना का होतात? याचे कारण समजून घेणेही महत्वाचे आहे. कधी कधी या वेदनेमागील कारण दातातील कीड (कॅव्हिटी), संसर्ग (इन्फेक्शन) किंवा दातांच्यामध्ये अडकलेले अन्नाचे कणही असू शकतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी वेदना सुरू झाल्यावर नेमके काय करावे?
एका युजरने ‘क्वोरा’ (Quora) वर हाच प्रश्न विचारला की, “दातांत अचानक वेदना होत असल्यास मी काय करावे?” या वेदनेमागची कारणे शोधण्यासाठी, तात्पुरता आराम कसा मिळवता येईल हे जाणून घेण्यासाठी आणि दातांच्या वेदनेसाठी नेहमी तातडीने वैद्यकीय मदतीची गरज असते का हे समजून घेण्यासाठी आम्ही ‘लक्ष्मी डेंटल लिमिटेड’च्या ऑर्थोडॉन्टिक्स आणि डेंटोफेशियल ऑर्थोपेडिक्समधील तज्ज्ञ, डॉक्टर अदिती नेडुंगडी (MDS) यांच्याशी संपर्क साधला.
दातांत अचानक वेदना का होतात?
डॉक्टरांच्या मते, अचानक दात दुखण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही कारणे सामान्य असतात, तर काही समस्यांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.
१. दात दुखण्याचे एक सामान्य कारण म्हणजे दातांना कीड लागणे. तोंडातील बॅक्टेरियामुळे दातांच्या बाहेरील थराचे आणि आतील भागाचे नुकसान होऊ लागते. त्यामुळे दातांमध्ये वेदना जाणवू शकतात. जेव्हा दातांची कीड खोलवर पोहोचते आणि दाताच्या आतील भागातील ‘पल्प’ (ज्यामध्ये रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू असतात) संक्रमित होतो, तेव्हा तीव्र वेदना जाणवू लागतात.
२. दुसरे एक कारण म्हणजे ‘पल्पायटिस’ (pulpitis). म्हणजेच दाताच्या आतील भागाला (पल्पला) आलेली सूज. ही सूज दातातील खोलवर गेलेली कीड, दुखापत किंवा काही दंत उपचारांमुळे होऊ शकते.
३. दात तुटल्यास किंवा त्याला तडे गेल्यासही, चावताना किंवा खाताना अचानक वेदना होऊ शकतात.
४. कधीकधी दातांमधील वेदना ही ‘डेंटल ॲब्सिस’मुळेही होऊ शकते. यामध्ये दाताच्या मुळाशी किंवा त्याच्या आजूबाजूच्या हिरड्यांमध्ये जिवाणूंचा संसर्ग होतो आणि त्यामुळे तीव्र वेदना जाणवू शकतात. याशिवाय, हिरड्यांना सूज येणे, दातांमध्ये अन्न अडकणे, दातांची मुळे उघडी पडणे किंवा अक्कलदाढ येणे यामुळेही दात दुखू शकतात. काही वेळा सायनसचा संसर्ग झाल्यास वरच्या दातांमध्येही वेदना जाणवू शकतात.
दातांत अचानक वेदना सुरू झाल्यावर लगेच काय करावे?
सगळ्यात पहिला तर कोमट पाण्याने हळूवारपणे चूळ भरणे. यामुळे जिथे तुम्हाला वेदना होत असतील तिथले अन्नाचे कण किंवा इतर कचरा बाहेर पडण्यास मदत होऊ शकते.जर दातांच्या मध्ये अन्न अडकले असेल, तर त्या ठिकाणी हळूवारपणे फ्लॉस (दातांमधील अन्नकण काढण्यासाठी वापरला जाणारा विशेष धागा) वापरू शकता. यामुळे अडकलेले अन्न बाहेर काढण्यास आणि होणारा त्रास कमी करण्यास मदत होऊ शकते. मात्र, फ्लॉस वापरताना जास्त जोर लावू नका. त्यामुळे हिरड्यांना इजा होऊ शकते.
गरम किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर वेदना होतात का? चावल्यामुळे वेदना वाढतात का? काहीही खात किंवा पीत नसतानाही वेदना सुरूच राहतात? हे तपासून पाहणे गरजेचे आहे. जर वेदना तीव्र असतील, वारंवार होत असतील किंवा त्यामुळे खाण्यापिण्यात किंवा झोपेत अडथळा येत असेल. तर त्वरित दंतवैद्याची (डेंटिस्ट) भेट घ्या.
तात्पुरत्या आराम मिळवण्यासाठी घरी काय करता येईल?
घरगुती उपाय मूळ समस्येवर उपचार ठरू शकत नाहीत. पण, दंतवैद्याकडे जाईपर्यंत अस्वस्थता कमी करण्यासाठी काही साधे उपाय उपयुक्त ठरू शकतात.
१. एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिक्स करा आणि त्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे तोंडातील अन्नाचे कण साफ होण्यास आणि तोंडातील ऊतींना (tissues) आराम मिळण्यास मदत होते. गुळण्या केल्यानंतर पाणी थुंकून टाकावे, ते गिळू नये.
२. जर दातदुखीबरोबर सूजही असेल, तर ‘कोल्ड कॉम्प्रेस’ (थंड शेक) फायदेशीर ठरू शकते. स्वच्छ कापडात गुंडाळलेला बर्फ किंवा थंड वस्तू गालावर १०-१५ मिनिटांसाठी ठेवणे.
३. पॅरासिटामॉल किंवा आयबुप्रोफेनसारखी वेदनाशामक औषधे (पेनकिलर) जी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात आणि वेदना कमी करण्यास मदत करू शकतात. मात्र अशा वेळी औषधाच्या पाकिटावरील सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. मऊ पदार्थ खाणे आणि तोंडाच्या ज्या बाजूला त्रास नाही, त्या बाजूने अन्न चावणे यामुळेही होणारा त्रास कमी होऊ शकतो.
दातदुखी असताना काय टाळावे?
जेव्हा दात दुखू लागतात. तेव्हा त्वरित आराम मिळेल असे वाटणारे कोणतेही घरगुती उपाय करून पाहण्याची इच्छा होणे स्वाभाविक आहे. मात्र, काही सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या युक्त्या फायद्यापेक्षा जास्त नुकसान करू शकतात.
१. अनेक लोक थेट दातावर किंवा हिरड्यांवर ॲस्पिरिन (aspirin) लावतात. असे करणे टाळले पाहिजे, कारण यामुळे मऊ उतींना (soft tissues) त्रास होऊ शकतो आणि रासायनिक जळजळ (chemical burns) होऊ शकते.
२. लवंगाचे तेल, अल्कोहोल किंवा इतर घरगुती पदार्थ थेट दुखणाऱ्या दातावर किंवा हिरड्यांवर लावू नयेत. यामुळे हिरड्या आणि तोंडाच्या आतील त्वचेला इजा होऊ शकते. तसेच, दात संवेदनशील असल्यास त्यावर थेट बर्फ ठेवणे टाळावे. हिरड्यांना सूज आली असल्यास त्या भागाला गरम शेक देऊ नये, जोपर्यंत डॉक्टरांनी तसा सल्ला दिलेला नाही.
३. दात दुखत असल्यास प्रत्येक वेळी प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) घेण्याची गरज असतेच असे नाही. अनेकांना हा गैरसमज असतो की दातदुखी सुरू झाली की अँटिबायोटिक्स घ्यायला हवीत. मात्र, कोणते औषध घ्यायचे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठरवावे.
४. दातदुखीसाठी नेहमीच प्रतिजैविकांची गरज नसते. जर संसर्ग (infection) झाला असेल, तर निदानानुसार त्यावर ड्रेनेज (पू काढून टाकणे), रूट कॅनाल उपचार किंवा दात काढून टाकणे (tooth extraction) असे कायमस्वरूपी उपाय करावे लागतात.”
आणि जर वेदना अचानक नाहीशी झाली तर? याचा अर्थ असा नाही की समस्या पूर्णपणे दूर झाली आहे.
कधीकधी दाताच्या आतील भागातील पल्प (दातातील मऊ ऊती, ज्यामध्ये नसा आणि रक्तवाहिन्या असतात) खराब होऊन त्याचे कार्य थांबते. अशा वेळी दातदुखी कमी होऊ शकते. म्हणूनच, जर दातातील वेदना सतत होत असेल किंवा वारंवार उद्भवत असेल, तर अस्वस्थता तात्पुरती कमी झाली तरीही दंतवैद्याकडून (dentist) तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
दातातील अचानक उद्भवणाऱ्या वेदना कधी मोठी समस्या ठरू शकतात?
जेव्हा दातदुखी तीव्र असते किंवा हळूहळू वाढत जाते. तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नये. विशेषतः दातदुखी इतकी वाढली असेल की झोपणे, जेवणे किंवा दैनंदिन कामे करणे शक्य होत नसेल, तर शक्यतो त्याच दिवशी दंतवैद्याकडे जावे.
दातदुखीबरोबर चेहरा किंवा हिरड्यांना सूज येणे, दुखणाऱ्या दाताजवळ पू होणे, तोंडात सतत वाईट चव येणे, ताप येणे किंवा थंडी वाजणे, जबड्याखालील लसिका ग्रंथींना (लिम्फ नोड्स) सूज येणे आणि तोंड उघडताना त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
अपघात किंवा दुखापतीमुळे दात तुटल्यास किंवा जागेवरून हलल्यास लगेच दंतवैद्याकडे जावे. वेळेत उपचार केल्यास दात वाचवता येण्याची शक्यता तपासता येते. कारण काही वेळा दात किंवा हिरड्यांजवळ सुरू झालेली सूज गाल, जबडा किंवा मानेपर्यंत पसरू शकते. अशी सूज वेगाने वाढत असल्यास ती अधिक गंभीर ठरू शकते.
चेहरा, तोंडाच्या आतील भाग किंवा मानेवर वेगाने सूज येणे म्हणजे संसर्ग आसपासच्या भागांमध्ये पसरत असल्याचे लक्षण असू शकते. डोळ्यांभोवती सूज येणे, डोळ्यांत वेदना होणे किंवा दिसण्यात बदल जाणवणे हीदेखील चिंतेची लक्षणे आहेत. श्वास घेण्यास किंवा गिळण्यास त्रास होत असेल अथवा सूज वेगाने पसरत असेल, तर वेळ न घालवता आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्यावी.
दातदुखी कमी झाली म्हणजे संसर्ग बरा झाला असे नाही
दातदुखीसोबत ताप नसेल तरी दातामध्ये संसर्ग असण्याची शक्यता असते. काही वेळा दातातील फोडातून (ॲब्सेस) पू बाहेर पडल्यामुळे वेदना तात्पुरत्या कमी होतात. मात्र, त्यामुळे संसर्ग पूर्णपणे बरा झाला असे समजू नये.
काही गंभीर प्रकरणांमध्ये, विशेषतः संसर्ग पसरत असल्यास किंवा तापासारखी लक्षणे दिसत असल्यास, डॉक्टर प्रतिजैविके (अँटिबायोटिक्स) देऊ शकतात. मात्र, केवळ औषधांवर अवलंबून न राहता दातामध्ये संसर्ग होण्यामागील मूळ कारणावर उपचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे
