यंदा आपण देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आपल्या प्रत्येकाची स्वातंत्र्याची स्वतःची अशी एक व्याख्या असते. याच पार्श्वभूमीवर आज आपण एका सर्वेक्षणाबाबत जाणून घेणार आहोत. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की, ३९ टक्के भारतीयांना आर्थिक स्वातंत्र्य हे सर्वात मोठं वाटतं. लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप ओकक्यूपिडने (OkCupid) केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आलं की या डेटिंग अ‍ॅपवरील तब्बल ६५ टक्के भारतीयांनी पैशापेक्षा आपलं स्वातंत्र्य अधिक पसंत केलं आहे. तर ३५ टक्के लोकांनी पैसे निवडले आहेत.

स्वातंत्र्याच्या स्वतंत्र व्याख्या

या सर्वेक्षणात सहभागी ७३ टक्के युझर्सनी असं म्हटलं आहे कि, ते स्वतः एक स्वतंत्र विचार असणारे, योग्य आणि आवश्यक गोष्टींवर व्यक्त होणारे आणि स्वतः स्वतःला बळ देणारे स्वतंत्र भारतीय नागरिक आहेत. दरम्यान या सर्वेक्षणात सहभागी युझर्सपैकी ३० टक्के लोकांना विविध ठिकाणी मोकळा प्रवास करणं स्वातंत्र्यांचा अनुभव देतं. तर, २२ टक्के लोकांना लैंगिकता आणि ९ टक्के लोकांना आपल्या कलेतून व्यक्त होण्यासाठी मिळणारं स्वातंत्र्य अधिक प्रिय आहे.

आपल्या जोडीदाराच्या स्वातंत्र्यावर लोक म्हणतात…

ओकक्यूपिडच्या या सर्वेक्षणात नातेसंबंधांच्याबाबत बोलताना सहभागी ६८ टक्के युझर्सनी सांगितलं की, ते त्यांच्या जोडीदाराला पूर्ण स्वातंत्र्य देण्यावर ठाम आहेत. तर सुमारे ७३ टक्के लोकांनी असं म्हटलं की, नातेसंबंधात आर्थिक स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांना आपली स्वतंत्र बँक खाती हवी आहेत. दरम्यान, या तुलनेत २७ टक्के लोकांनी आपल्या जोडीदारासोबत संयुक्त बँक खातं असण्यास कोणतीही हरकत नसल्याचं म्हटलं आहे.

धर्म आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याबद्दल लोकांना काय वाटतं?

सर्वेक्षणादरम्यान लोकांना धर्म आणि वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्याबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं होतं. यावेळी वृत्तपत्रांचं/पत्रकारांचं स्वातंत्र्य महत्त्वाचं असल्याचं मत ९० टक्के लोकांनी व्यक्त केलं आहे. तर ७६ टक्के लोकांनी यावेळी असं म्हटलं आहे की, धार्मिक स्वातंत्र्याचं रक्षण करण्यासाठी कायदे असायला हवेत. दरम्यान, दुसरीकडे ५८ टक्के लोकांनी स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या दोन पर्यायांमध्ये स्वातंत्र्य निवडलं आहे.

ओकक्यूपिडचे सिनिअर मार्केटिंग मॅनेजर सितारा मेनन यांनी आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे कि, “भारतीय हे आपल्या स्वातंत्र्याकडे राष्ट्रीय किंवा वैयक्तिकरित्या मुक्तपणे व्यक्त होण्याचा अधिकार म्हणून पाहतात. तर नातेसंबंधांतील स्वातंत्र्याच्या बाबतीत, आपल्या जोडीदाराशी कसं वागावं? याबाबत लोकांचे विचार अधिक विस्तारत असून समोरच्यावर बंधनं लादण्याच्या पूर्वापार चालत आलेल्या जुनाट संकल्पनांना आव्हान दिलं जात आहे. याच गोष्टी तुमची तुमच्या भावी जोडीदारासोबतची सुसंगतता किती असेल याचा अंदाज देतात. प्रेमाच्या शोधात असणाऱ्यांसाठी ते जाणून घेणं अधिक महत्त्वाचं ठरतं.”