Healthy eating during monsoon : पावसाळा सुरू झाला की, पचनाच्या समस्याही डोके वर काढतात. हवेतील आर्द्रता, बदललेल्या खाण्याच्या सवयी आणि तळलेले पदार्थ खाण्याची आवड यामुळे पोट फुगणे, ॲसिडिटी, अपचन, जेवणानंतर पोट जड वाटणे यांसारख्या समस्या सामान्य समस्या प्रत्येकाला जाणवू लागतात. आपल्यापैकी बहुतेकजण अशा वेळी सहजपणे आले-चहा किंवा चिमूटभर हळदीचा आधार घेतात; हे पदार्थ स्वयंपाकघरात महत्त्वाचे असले, तरी या काळात पोटाचे आरोग्य जपण्यासाठी केवळ हेच पदार्थ पुरेसे नसतात.
पोषणतज्ज्ञ आणि हेल्थ कोच डॉक्टर रिधिमा खामेसरा यांच्या मते, असे अनेक नेहमीचे पदार्थ आहेत जे पावसाळ्यात पचनक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम उत्तमरीत्या करतात.
मुगाची डाळ
मुगाच्या डाळीची साधी खिचडी दिसायला कदाचित फारशी आकर्षक वाटणार नाही. पण, पावसाळ्यात मंदावलेल्या पचनक्रियेसाठी हा सर्वोत्तम आहार आहे. तांदूळ आणि अगदी कमी तेल किंवा मसाल्यांचा वापर करून बनवलेली मुगाची डाळ पचायला हलकी असते. जेव्हा पचनसंस्था आधीच मंदावलेली असते. तेव्हा ही डाळ पोटासाठी हलकी ठरते.
ओवा
ओव्याचा संबंध सहसा बाळंतपणानंतरच्या आहाराशी जोडला जातो. पण, डॉक्टर म्हणतात प्रत्येक स्वयंपाकघरात त्याला स्थान असायला हवे.
जड जेवणानंतर चिमूटभर ओवा चावून खाणे किंवा डाळ शिजवताना त्यात ओवा घालणे फायदेशीर ठरते. यामुळे गॅस आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून लवकर आराम मिळू शकतो.
दह्याऐवजी ताक
जर तुम्ही जेवणानंतर नेहमी दही खात असाल. तर पावसाळ्यात त्याऐवजी ताक पिणे अधिक फायदेशीर ठरू शकते. भाजलेले जिरे आणि थोडेसे काळे मीठ घालून बनवलेले ताक दह्यापेक्षा हलके असते. यामुळे जेवणानंतर पोट खूप जड वाटण्याऐवजी पचनक्रियेला मदत होऊ शकते.
बडीशेप
अनेक जण जेवणानंतर बडीशेप खातात. रात्रीच्या जेवणानंतर बडीशेप चावून खाणे असो किंवा तिचा गरम चहा करून पिणे फायदेशीर ठरू शकते. पावसाळ्यात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या तळलेल्या पदार्थांमुळे पोट फुगणे किंवा जड वाटणे यांसारख्या समस्यांवर बडीशेप गुणकारी ठरू शकते.
दुधी भोपळा
दुधी भोपळा कदाचित तुमच्या ताटातील सर्वात आकर्षक भाजी नसेल. पण, याच गुणांमुळे तो अत्यंत उपयुक्त ठरतो. पाणी आणि फायबरने (तंतूमय पदार्थ) भरपूर आणि पचायला हलके असल्याने, पचनसंस्थेसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात जमिनीच्या वर वाढणाऱ्या भाज्यांची निवड करणे अधिक हिताचे ठरू शकते; कारण ओल्या मातीच्या संपर्कात असलेल्या भाज्या दूषित होण्याचा धोका अधिक असतो.
डाळिंब
दमट हवामानात लवकर खराब होणाऱ्या कापलेल्या फळांवर अवलंबून राहण्याऐवजी डॉक्टर डाळिंब खाण्याचा सल्ला देतात.फायबरने समृद्ध असण्याबरोबरच डाळिंब जास्त काळ ताजे राहते आणि पचन मंदावल्यासारखे वाटत असताना हा चांगला पर्याय ठरतो.
दिवसाची सुरुवात जिऱ्याच्या पाण्याने करा
कधीकधी, अगदी साध्या सवयींमुळेही खूप मोठा फरक पडू शकतो. डॉक्टर जिरे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून, दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी कोमट करून पिण्याचा सल्ला देतात. यामुळे जेवणापूर्वी पचनास मदत करणारे विकर (enzymes) सक्रिय होण्यास मदत होऊ शकते; त्यामुळे रिकाम्या पोटी कडक चहा पिण्यापेक्षा दिवसाची सुरुवात करण्यासाठी हा एक अधिक चांगला मार्ग आहे.
निरोगी पचनाची सुरुवात म्हणजे दैनंदिन निवड
पावसाळ्यातील आहारात हळद आणि आले यांचा समावेश करणे नक्कीच फायदेशीर ठरते. पण, पचनाची सर्व जबाबदारी केवळ त्यांच्यावरच नसते. पावसाळ्यात पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मूग डाळ, ओवा, ताक, बडीशेप, दुधी भोपळा, डाळिंब आणि जिरे यांसारख्या रोजच्या वापरातील पदार्थांचीही महत्त्वाची भूमिका ठरू शकते. दैनंदिन आहारात काही साधे बदल केल्यानेच पचनसंस्थेला हलकेपणा जाणवू शकतो; विशेषतः अशा ऋतूत जेव्हा पचनाच्या तक्रारी उद्भवणे खूप सामान्य असते.
