Natural Drinks to Reduce Pimples : दररोज त्वचेची काळजी घेऊनही आणि उपचार करूनही चेहऱ्यावर पुन्हा पुन्हा मुरुमे येत असतील, तर त्यामागे इतरही काही कारणे असू शकतात. वारंवार येणारे मुरुमे केवळ त्वचेची समस्या नसून शरीरातील हार्मोन्समधील बदल, दाह (इन्फ्लेमेशन) किंवा इतर अंतर्गत कारणांमुळेही उद्भवू शकतात. त्यामुळे मुरुमे वारंवार येत असतील, तर केवळ बाहेरून त्वचेची काळजी घेण्याऐवजी त्यामागचे नेमके कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे.

पोषणतज्ज्ञ श्वेता शहा यांच्या मते, अशा प्रकारे वारंवार येणारी मुरुमे सहसा ‘पित्त’ वाढणे, शरीरातील अंतर्गत उष्णता आणि रक्तातील अशुद्धींशी संबंधित असतात. जेव्हा शरीरातील विविध प्रक्रिया योग्य पद्धतीने काम करत नाहीत आणि शरीराचा समतोल बिघडतो, तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही दिसू शकतो.

तर तज्ज्ञांनी सुचवलेला ७ दिवसांचा एक उपाय (internal remedy) तुमच्या कामी येईल. केवळ वरवरच्या उपचारांवर भर देण्याऐवजी, हा उपाय शरीराला थंड ठेवण्यावर, दाह कमी करण्यावर आणि आतून त्वचेला बरे होण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करतो. साध्या पदार्थांपासून बनवलेला हा उपाय शरीरातील विषारी घटक (toxins) हळूवारपणे बाहेर काढून कमी कालावधीत त्वचेला पुन्हा निरोगी, स्वच्छ आणि शांत स्थितीत आणण्यास मदत करतो.

पिंपल्ससाठी ७ दिवसांचा उपाय

पोषणतज्ज्ञ श्वेता शहा यांनी सुचवलेला हा उपाय सलग सात दिवस, शक्यतो सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी करणे अपेक्षित आहे.

साहित्य

३ ते ४ लवंगा (रात्रभर पाण्यात भिजवलेल्या), थोडे मध, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि थोडी ताजी कडुनिंबाची पेस्ट.

कृती

  • ३ ते ४ लवंगा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी सकाळी, भिजवलेल्या लवंगा कुस्करून घ्या.
  • त्यात थोडे मध आणि लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर, त्यात थोडी ताजी कडुनिंबाची पेस्ट घाला आणि रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

यामुळे शरीरातील अंतर्गत उष्णता आणि दाह कमी करण्यास मदत होते, जे अनेकदा वारंवार मुरुमे येण्याचे मुख्य कारण ठरू शकतात.

हा उपाय शरीरातील अंतर्गत समस्या कमी करून मुरुमांवर नियंत्रण मिळवण्यास कशी मदत करतो?

प्रत्येक पदार्थ त्वचेच्या आरोग्यासाठी विशिष्ट भूमिका बजावतो. लवंगांमध्ये दाहशामक (anti-inflammatory) आणि जिवाणूविरोधी (antibacterial) गुणधर्म असतात. कडुनिंब रक्ताशुद्धीकरणासाठी पारंपारिकपणे ओळखले जाते. तर मध व लिंबू पचन सुधारण्यास आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास (detoxification) मदत करतात. त्यामुळे हे सगळे पदार्थ मिळून वाढलेले पित्त शांत करतात, अंतर्गत दाह कमी करतात आणि शरीराच्या नैसर्गिक शुद्धीकरण प्रक्रियेला चालना देतात.

हा उपाय केवळ लक्षणांना दाबण्याऐवजी मुरुमांच्या मूळ कारणावर उपचार करण्यावर भर देतो. जर हा उपाय सातत्याने केला तर तो रक्ताची शुद्धी करणे, शरीरातील अंतर्गत उष्णता व दाह (inflammation) कमी करणे, सक्रिय मुरुमे (acne) शांत करणे आणि त्वचा अधिक नितळ व स्वच्छ दिसण्यास मदत करतो. त्यामुळे याचे परिणाम व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे एका रात्रीत बदल घडवून आणण्यापेक्षा, हळूहळू होणाऱ्या सुधारणेवर भर दिला आहे.

लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी

हा उपाय अधिक फायदेशीर ठरण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, हलका आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. तसेच, तळलेले आणि खूप तिखट पदार्थ खाणे कमी करावे. तुम्हाला कोणतीही आरोग्यविषयक समस्या असल्यास किंवा तुम्ही गर्भवती असाल, तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मात्र, लक्षात ठेवा की हा नैसर्गिक उपाय मुरुमांवरील नियमित उपचारांचा पर्याय नाही. त्यामुळे डॉक्टरांनी दिलेली औषधे स्वतःहून बंद करू नयेत.