8 Foods That Need Extra Care During the Rainy Season : पावसाळा जितका आनंददायी असतो, तितकाच तो आरोग्यासाठी काही आव्हानेही घेऊन येतो. या काळात हवेत ओलावा (आर्द्रता) खूप वाढतो. त्यामुळे जिवाणू, बुरशी आणि यीस्ट यांसारखे सूक्ष्मजीव झपाट्याने वाढू लागतात. यामुळेच पावसाळ्यात अनेक खाद्यपदार्थ लवकर खराब होतात. अन्न कधीकधी दिसायला आणि वासाने अगदी सामान्य वाटू शकते. पण, त्यात हानिकारक जिवाणू असू शकतात, ज्यामुळे अन्नातून विषबाधा आणि पोटाचे विकार होऊ शकतात. त्यामुळे, पावसाळ्यात अन्न योग्यरित्या साठवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चला, अशा आठ पदार्थांबद्दल जाणून घेऊया जे पावसाळ्यात जास्त काळ बाहेर ठेवू नयेत.

शिजवलेला भात

शिजवलेला भात हा पावसाळ्यात सर्वात लवकर खराब होणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. त्यात ‘बॅसिलस सेरियस’ (Bacillus cereus) नावाच्या जिवाणूंचे बीजाणू असू शकतात, जे शिजवल्यानंतरही जिवंत राहतात. जर भात जास्त काळ बाहेर ठेवला. तर त्यांची वेगाने वाढ होऊ शकते आणि ते असे विषारी घटक तयार करतात जे पुन्हा गरम करूनही पूर्णपणे नष्ट होत नाहीत. त्यामुळे भात थंड झाल्यावर २ तासांच्या आत रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ

दूध, दही, चीज, क्रीम आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तापमानातील बदलांसाठी अत्यंत संवेदनशील असतात. पावसाळ्यात त्यामध्ये जिवाणूंची झपाट्याने वाढ होते आणि ते लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे वापरानंतर लगेच त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि जास्त वेळ बाहेर ठेवणे टाळा.

कापलेली फळे

फळे न कापता काही दिवस सुरक्षित राहू शकतात. पण, एकदा फळ कापल्यावर, त्यांचा पृष्ठभाग जिवाणू आणि बुरशीच्या संपर्कात येतो. पावसाळ्यात कापलेली फळे किचन काउंटरवर ठेवल्याने संसर्गाचा धोका वाढू शकतो. कापलेली फळे हवाबंद डब्यात ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

डाळ आणि भाजी

अनेक घरांमध्ये एकाच वेळी मोठ्या प्रमाणात डाळ किंवा भाजी शिजवली जाते. पण, पावसाळ्यात त्यांना जास्त वेळ गॅसवर किंवा खोलीच्या तापमानावर ठेवणे असुरक्षित आहे. त्यामधील ओलावा जिवाणूंच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करतो. त्यामुळे उरलेली डाळ किंवा भाजी थंड करा आणि एका लहान डब्यात काढून लगेच रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

समुद्री खाद्यपदार्थ

मासे, कोळंबी आणि इतर समुद्री खाद्यपदार्थ कोणत्याही हंगामात लवकर खराब होतात. पण, पावसाळ्यात ही प्रक्रिया अधिक वेगाने होते. अगदी थोड्या कालावधीतही जिवाणूंची वेगाने वाढ होऊ शकते.ताजे सी-फूड (समुद्री खाद्य) खरेदी करा आणि लगेच फ्रिजमध्ये ठेवा आणि जास्त वेळ बाहेर ठेवणे टाळा.

मांस

पावसाळ्यात चिकन किंवा मांस किचन काउंटरवर ठेवणे ही एक मोठी चूक ठरू शकते. बाहेरील भाग लवकर गरम होतो, ज्यामुळे जिवाणूंसाठी अनुकूल वातावरण तयार होते. तर आतील भाग गोठलेला राहतो. मांस नेहमी फ्रिजमध्ये किंवा मायक्रोवेव्हच्या डीफ्रॉस्ट मोडमध्ये वितळवून घ्या आणि लगेच शिजवा.

नारळाचे पदार्थ

पावसाळ्यात ताज्या नारळापासून बनवलेली नारळाची चटणी, नारळाची ग्रेव्ही आणि मिठाई यांचा टिकण्याचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होतो. या पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि ओलावा जिवाणू आणि बुरशीच्या जलद वाढीस प्रोत्साहन देतात. त्यामुळे हे पदार्थ ताबडतोब फ्रिजमध्ये ठेवा आणि शक्य तितक्या लवकर त्यांचे सेवन करा.

ब्रेड आणि बेकरी उत्पादने

पावसाळ्यात ब्रेड, बन, केक आणि इतर बेकरी पदार्थ हवेतील ओलावा शोषून घेतात, ज्यामुळे बुरशीची वेगाने वाढ होऊ शकते. कधीकधी, बुरशी बाहेरून न दिसता आतपर्यंत पसरलेली असते. पाव आणि बेकरी उत्पादने थंड, कोरड्या जागी ठेवा. जर लगेच वापरायचे नसतील, तर ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

पावसाळ्यात अन्न साठवण्यासाठीच्या टिप्स…

  • शिजवलेले अन्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
  • उरलेले अन्न नेहमी स्वच्छ, हवाबंद डब्यात भरून फ्रिजमध्ये ठेवा.
  • फ्रिजचे तापमान ५°C किंवा त्यापेक्षा कमी असावे.
  • कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवू नका.
  • उरलेले अन्न खाण्यापूर्वी ते पूर्णपणे गरम करूनच खा.
  • अन्नातून विचित्र वास येत असेल, रंग बदलला असेल किंवा बुरशी दिसत असेल, तर अजिबात खाऊ नका, लगेच फेकून द्या.