Things You Should Never Wash In Hot Water : घर स्वच्छ करताना अनेक जण गरम पाण्याचाही वापर करताना दिसतात. वस्तूंमध्ये असणारी घाण आणि जीवाणू काढून टाकण्यासाठी गरम पाणी हा वापरणे हा सोपा उपाय असला तरीही त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. रोजच्या वापरातील काही वस्तू अशा आहेत, ज्या चुकूनही गरम पाण्याने स्वच्छ करू नयेत. असे केल्याने या वस्तू लवकर खराब होऊ शकतात, त्यांचा आकार बिघडू शकतो किंवा त्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.

दागिने

दागिने स्वच्छ केल्याने त्यांची चमक टिकून राहते. पण, गरम पाणी वापरणे हानिकारक ठरू शकते. गरम पाण्यामुळे खड्यांची जडणघडण सैल होऊ शकते आणि मोती किंवा इतर रत्नांचे नुकसानहोऊन अगदी तुटूही शकतात किंवा त्यांचा रंग फिका पडू शकतो.

थर्मास

थर्मासचा वापर पाणी पिण्यासाठी केला जातो. विशेषतः शाळकरी मुलांमध्ये. पण, थर्मास गरम पाण्याने स्वच्छ करू नयेत. यामुळे त्यांचे इन्सुलेशन (तापमान टिकवून ठेवण्याची क्षमता) खराब होऊ शकते, थर्मल सीलला नुकसान पोहोचू शकते, आतील अस्तराला तडेही जाऊ शकतात. त्यावर गरम पाणी ओतल्याने आतील प्लास्टिकचे भाग देखील सैल होऊ शकतो.

Award Banner

काचेचे ग्लास

विशेषतः उन्हाळ्यात, लोक काचेच्या ग्लासामधून ज्यूस किंवा थंड पाणी पितात. त्यामुळे काचेचे ग्लास लगेच गरम पाण्याने धुऊ नयेत. यामुळे काचेला तडा जाऊ शकतो किंवा ती फुटू शकते. काचेवरील नक्षीकामही खराब होऊ शकते.

प्लास्टिकचे डबे

हलके प्लास्टिकचे डबे किंवा वाट्या देखील गरम पाण्याने धुऊ नयेत. पातळ प्लास्टिक जास्त उष्णता सहन करू शकत नाही, ज्यामुळे त्या आकुंचन पावतात आणि स्वच्छ करण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करतात.

लाकडी कटिंग बोर्ड आणि भांडी

लाकडी कटिंग बोर्ड देखील गरम पाण्याने स्वच्छ करू नयेत. यामुळे ते फुगू शकतात, त्यांचा आकार बिघडू शकतो किंवा त्यांना तडे जाऊ शकतात. त्याचप्रमाणे, लाकडी भांडी देखील गरम पाण्याने धुवू नयेत. लाकडी भांडी स्वच्छ करण्यासाठी नेहमी कोमट पाण्याचा वापर करा.

लॅमिनेट आणि लाकडी फ्लोअरिंग

लाकडी फ्लोअर्स देखील गरम पाण्याने स्वच्छ करू नयेत. यामुळे हार्डवुड फ्लोअर्सवर तापमान आणि आर्द्रतेच्या पातळीचा परिणाम होऊ शकतो. कारण लाकडाच्या पृष्ठभागावर लहान छिद्रे असतात. गरम पाण्याने स्वच्छ केल्यास ही छिद्रे आणखी उघडू शकतात, ज्यामुळे फ्लोअर वाकडा होऊ शकतो किंवा फुगू शकतो. लॅमिनेट फ्लोअर्स ओलावा किंवा वाफेच्या संपर्कात आल्यास कोटिंग फुगू शकते, ज्यामुळे फ्लोअर फुगतो किंवा वाकडा होतो.

पेंट ब्रशेस

पेंट ब्रशेसचा वापर केवळ घरे रंगवण्यासाठीच नाही, तर चित्रकला आणि घरगुती कामांसाठीही केला जातो. जेव्हा त्यांच्यावर कडक रंगाचा थर जमा होतो, तेव्हा ते साध्या पाण्याने स्वच्छ करणे कठीण जाते. अशा परिस्थितीत, लोक त्यांना गरम पाण्याने धुणे पसंत करतात. मात्र, यामुळे ब्रशचे केस एकत्र धरून ठेवणारा डिंक सैल होऊ शकतो, ज्यामुळे ब्रश लवकर खराब होतो.