7 signs of liver disease : यकृत हा शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे; मात्र यकृताशी संबंधित अनेक समस्या सुरुवातीला स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे फॅटी लिव्हर किंवा यकृताला झालेली इजा सहज लक्षात येत नाही. शरीर काही सूक्ष्म संकेतांद्वारे मात्र याची जाणीव करून देऊ शकते. त्यामध्ये लघवी, शौचाचा रंग, त्वचा आणि पचनसंस्थेतील बदलांचा समावेश होतो.

एम्स, हार्वर्ड व स्टॅनफोर्ड येथे प्रशिक्षित बोर्ड-प्रमाणित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व हेपॅटोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, लघवीचा रंग सतत गडद राहणे किंवा शौचाच्या रंगात बदल होणे यांकडे दुर्लक्ष करू नये. चला, यकृताच्या आजाराची काही सुरुवातीची लक्षणे जाणून घेऊया…

लघवीचा रंग सतत गडद राहणे

गडद रंगाची लघवी डिहायड्रेशनमुळे होऊ शकते. मात्र, पुरेसे पाणी पिऊनही लघवी सतत चहा किंवा कोलासारखी गडद दिसत असेल, तर ते यकृत किंवा पित्तवाहिन्यांशी संबंधित समस्येचे संकेत असू शकते. त्यासोबत शौचाचा रंग पांढरा, राखाडी किंवा मातीसारखा होणे आणि डोळे पिवळे पडणे, अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

पुरळ नसतानाही सतत खाज येणे

यकृत किंवा पित्तवाहिन्यांशी संबंधित समस्यांमुळे त्वचेवर पुरळ नसतानाही तीव्र खाज येऊ शकते. विशेषतः तळहात आणि तळपायांवर ही खाज अधिक जाणवू शकते. खाज सतत होत असेल आणि त्यामागे स्पष्ट कारण नसेल, तर वैद्यकीय तपासणी आवश्यक आहे.

त्वचेवर लाल, कोळ्यासारख्या रक्तवाहिन्या दिसणे

त्वचेवर मध्यभागी लाल ठिपका आणि त्याभोवती पसरलेल्या बारीक रक्तवाहिन्यांना ‘स्पायडर अँजिओमा’ म्हणतात. एक-दोन अशा खुणा असणे सामान्य असू शकते. मात्र, अचानक विशेषतः चेहरा, खांदे किंवा छातीवर अशा अनेक खुणा दिसू लागल्या, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तळहात लाल होणे

तळहातांवर विशेषतः अंगठा आणि करंगळीच्या मुळाशी लालसरपणा दिसण्याला ‘पाल्मर एरिथेमा’ म्हणतात. त्याचा संबंध काही वेळा यकृताच्या आजाराशी असू शकतो. मात्र, गर्भधारणा, थायरॉईड आणि संधिवात यांसारख्या इतर कारणांमुळेही असे होऊ शकते. त्यामुळे केवळ या लक्षणावरून यकृताच्या आजाराचे निदान करता येत नाही.

सहज जखम होणे किंवा रक्तस्राव

पूर्वीपेक्षा सहज जखम होणे किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना रक्तस्राव होणे हे यकृताच्या गंभीर समस्येचे संकेत असू शकते. यकृत रक्त गोठण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली अनेक प्रथिने तयार करते. त्यामुळे यकृताचे कार्य बिघडल्यास या प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो.

पोटात सूज किंवा पाणी साठणे

पोटाचा आकार सतत वाढणे, तसेच पाय आणि घोट्यांना सूज येणे अशी लक्षणे यकृताच्या गंभीर आजारात दिसू शकतात. सिरोसिसच्या प्रगत अवस्थेत पोटात द्रव साचण्याला ‘अॅसायटिस’ म्हणतात. त्यासोबत पोटदुखी, ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी.

डोळे पिवळे पडणे किंवा अचानक गोंधळ होणे

डोळ्यांचा पांढरा भाग किंवा त्वचा पिवळी पडणे म्हणजे कावीळ. शरीरात बिलिरुबिन वाढल्यामुळे असे होऊ शकते. त्यामागे यकृताचा आजार, हेपॅटायटिस, काही औषधांमुळे होणारी यकृताची इजा किंवा पित्तवाहिनीतील अडथळा अशी विविध कारणे असू शकतात.

यकृताच्या आजाराने ग्रस्त व्यक्ती अचानक गोंधळलेली, खूप झोपाळू किंवा विसरभोळी होत असेल, तर ते गंभीर गुंतागुंतीचे लक्षण असू शकते. अशा वेळी तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.