Side Effects Of Holding Urine : जर तुम्हालाही बराच वेळ लघवी रोखून ठेवण्याची सवय असेल, तर सावध व्हा. कारण- तुमची ही सवय नकळतपणे तुमच्या मूत्रपिंडांना आणि मूत्राशयाला हानी पोहोचवू शकते, त्यामुळे स्वाभाविकत: त्यांच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. परिणामत: यूटीआय, किडनी स्टोन आणि अगदी मूत्राशय फुटणे यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.
लघवी रोखून धरण्याचे गंभीर परिणाम
१) वेदना आणि पेटके
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशय आणि संपूर्ण मूत्रसंस्थेवर दबाव वाढतो. परिणामी एखाद्या व्यक्तीला पोटदुखी आणि पेटके येऊ शकतात.
२) किडनी स्टोन
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने ती जाड होते. त्याचप्रमाणे जर लघवी मूत्रपिंड आणि मूत्राशयात जास्त काळ राहिली, तर लघवीतील आम्ल, ऑक्झलेट व कॅल्शियम ऑक्झलेट यांसारखी खनिजे लहान स्फटिके तयार करू लागतात. हे कण कालांतराने कडक होतात आणि शेवटी वेदनादायक स्टोन तयार होतात, ज्याला किडनी स्टोन, असे म्हणतात.
३) मूत्राशय वाढणे
मूत्राशय मूत्र साठवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याची क्षमता ४०० ते ६०० मिली असते. जेव्हा ते अर्धे भरलेले असते तेव्हा मेंदू शरीराला मूत्र बाहेर टाकण्याचे संकेत देतो. जेव्हा असे होत नाही तेव्हा मूत्राचे प्रमाण वाढते आणि मूत्राशयावर दबाव येतो. जर हे दीर्घकाळ चालू राहिले, तर मूत्राशयाचा आकार वाढू लागतो आणि त्याचे स्नायू कमकुवत होतात, ज्यामुळे त्याच्या सामान्य कार्यावर नकारात्मक परिणाम होतो.
४) मूत्र गळणे, मूत्राशय रिकामे न होणे
मूत्राशयाचे स्नायू कमकुवत झाल्यामुळे दोन परिस्थिती उदभवू शकतात. पहिली म्हणजे, मूत्र आत धरून ठेवले तरी गळते. खोकताना, शिंकताना किंवा इतर शारीरिक हालचाली करताना ते अचानक गळते, ज्याचे प्रमाण कमी किंवा जास्त असू शकते. अनेकदा ही स्थिती रोखता येत नाही. दुसरी बाब म्हणजे व्यक्तीकडून मूत्र शरीराबाहेर टाकले जात असले तरी मूत्राशय पूर्णपणे रिकामे होऊ शकत नाही. या दोन्ही परिस्थितींत व्यक्तीला मूत्राशयाच्या समस्येचा सामना करावा लागतो. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पर्याय नसतो.
५) मूत्राशय फुटणे
अशी प्रकरणे फार कमी असतात; पण जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्राशय फुटण्याची शक्यता असते. असे घडण्याचे कारण म्हणजे लघवी तुंबून राहिल्यामुळे मूत्राशयाच्या स्नायूंवर प्रचंड दबाव येतो, ज्यामुळे या अवयवाचे अस्तर कमकुवत आणि पातळ होते. जर दाब कमी झाला नाही, तर मूत्राशय फुटू शकते आणि मूत्र आत गळू शकते, ज्यासाठी त्या व्यक्तीला आपत्कालीन शस्त्रक्रिया करून घेणे आवश्यक ठरू शकते.
६) यूटीआयचा वाढता धोका
लघवीद्वारे शरीरातील विषाक्त घटक बाहेर टाकले जातात. जर असे घडले नाही, तर मूत्रमार्ग हानिकारक जीवाणूंसाठी प्रजनन स्थळ बनू शकतो. त्यामुळे यूटीआयचा हा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, जो विशेषतः महिलांमध्ये सामान्य आहे.
७) पायलोनेफ्रायटिसचा धोका
जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने मूत्रमार्गाच्या संसर्गाचा (UTI) धोका निर्माण होऊ शकतो आणि वाईट जीवाणूंची वाढ होऊ शकते. जर या त्रासावर त्वरित उपचार केले नाहीत, तर ई. कोलायसारखे जीवाणू मूत्राशय आणि मूत्रपिंडांना हानी पोहोचवू शकतात आणि ते वेगाने पसरू शकतात. या स्थितीमुळे पायलोनेफ्रायटिस नावाचा गंभीर मूत्रपिंड संसर्ग होऊ शकतो आणि मग रुग्णाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागू शकते.
८) धूम्रपान करणाऱ्यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका
सिगारेटमधील तंबाखूमुळे शरीरात विविध प्रकारच्या विषाक्त घटकांचा भरणा होतो. त्यापैकी बरेच कार्सिनोजेन्स किंवा कर्करोग निर्माण करणारे घटक आहेत. मूत्रसंस्था ही शरीराला या विषाक्त घटकांपासून मुक्त होण्यास मदत करणारी वाहिनी आहे. पण जेव्हा या विषाक्त घटकांनी भरलेले मूत्र मूत्राशयात तुंबून राहते तेव्हा कर्करोग निर्माण करणारे घटक शरीराचे नुकसान करू लागतात. त्यामुळे मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
… म्हणून लघवी रोखून ठेवू नका
तुमच्या शरीराला द्रवपदार्थांनी हायड्रेट ठेवा आणि जेव्हा तुमचे मूत्राशय भरलेले असते आणि तुम्हाला लघवी करण्याची इच्छा होत असेल तेव्हा लघवी रोखून ठेवू नका. जरी परिस्थितीमुळे तुम्हाला लघवी करता येत नसली तरी एक किंवा दोन तासांपेक्षा जास्त वेळ लघवी रोखून ठेवू नका. जास्त वेळ घेतल्यास तुमच्या मूत्राशय व मूत्रपिंडांवरील दबाव वाढेल आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
