Is Banana Good For Constipation Myth & Fact: केळ हे एक असे फळ आहे जे जवळपास संपूर्ण वर्षभर सहज उपलब्ध असते. इतर फळांच्या तुलनेत याची किंमत कमी असल्याने कमी उत्पन्न असणारे लोकही केळी सहज खरेदी करू शकतात. चवीला गोड आणि सहज मिळणाऱ्या या फळाबद्दल लोकांच्या मनात एक प्रश्न नेहमी येतो, बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास केळ खाल्ले पाहिजे का? तसेच जुलाब होत असल्यास केळ खाणे योग्य आहे का? काही लोकांच्या मते पिकलेले केळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता होते, तर काहींच्या मते कच्चे केळ खाल्ल्याने या त्रासापासून सुटका मिळते. अशा परिस्थितीत नेमके सत्य काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.

केळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या त्रासातून कायमची सुटका मिळते की त्रास वाढतो? तज्ज्ञांकडून जाणून घ्या सत्य

नवी दिल्लीतील MOC कॅन्सर केअर अँड रिसर्च सेंटरच्या ऑन्कोलॉजी डायटिशियन मानसी यादव यांनी माहिती देताना सांगितले की, अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की केळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता होते आणि फक्त जुलाब झाल्यास केळ खाल्ले तर ते नियंत्रणात येते. परंतु केळ्याचा परिणाम ते किती पिकले आहे आणि व्यक्तीची पचनशक्ती कशी आहे यावर अवलंबून असतो.

पिकलेल्या केळ्यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर ठरते. दुसरीकडे, कमी पिकलेल्या किंवा कच्च्या केळ्यामध्ये ‘रेसिस्टंट स्टार्च’चे प्रमाण अधिक असते, ज्याचा परिणाम वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळा होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, बद्धकोष्ठता किंवा जुलाब असताना केळ कसे खावे आणि कोणते केळ जास्त फायदेशीर ठरू शकते, हे खालीलप्रमाणे आहे:

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी केळ फायदेशीर ठरते का? (Is Banana Beneficial for Constipation?)

आहारतज्ज्ञ मानसी यांनी सांगितले की, केळ हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे; विशेषतः यामध्ये ‘सोल्युबल’ (विरघळणारे) फायबर आढळते. सोल्युबल फायबर पाणी शोषून घेऊन जेलसारखा पदार्थ तयार करते, ज्यामुळे पोट साफ होण्यास आणि आतड्यांची हालचाल सुलभ होण्यास मदत होते. मात्र, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असताना केळ किती फायदेशीर ठरेल हे प्रत्येक व्यक्तीची पचनक्षमता, बद्धकोष्ठतेचे मूळ कारण आणि केळ किती पिकले आहे यावर अवलंबून असते.

पिकलेले केळ सामान्यतः आहारात समाविष्ट केले जाऊ शकते आणि ते काहींना बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यास मदत करते. त्यात असलेले ‘पेक्टिन’ हे एक प्रकारचे सोल्युबल फायबर आहे, जे आतड्यांसाठी सौम्य असते. तरीही प्रत्येक व्यक्तीचे शरीर यावर वेगवेगळी प्रतिक्रिया देते. काहींचे पोट केळ खाल्ल्याने सहज साफ होते, तर काहींना पोट साफ होण्यात अडचणी येतात.

कच्चे किंवा सौम्य हिरवे केळ खाल्ल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो की कमी होतो? (Does Raw Banana Increase Constipation?)

केळ जितके कमी पिकलेले असेल, तितके त्यात रेसिस्टंट स्टार्चचे प्रमाण जास्त असते. काही लोकांना जास्त प्रमाणातील रेसिस्टंट स्टार्च पचवणे कठीण जाते, ज्यामुळे गॅस किंवा पोटफुगीसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे आधीपासूनच बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी कच्चे किंवा कमी पिकलेले केळ खाल्ल्यास त्रास वाढू शकतो. मात्र, काही प्रकरणांमध्ये जुलाब किंवा अतिसार रोखण्यासाठी कच्चे केळ खाल्ले जाते. केळ्यामध्ये असलेले पेक्टिन आणि पोषक घटक मल घट्ट करण्यास मदत करतात.

एका दिवसात किती केळी खाल्ली पाहिजेत? (How Many Bananas to Eat Per Day?)

एका मध्यम आकाराच्या केळ्याचे वजन साधारणतः १०० ते १२० ग्रॅम असते आणि त्यातून सुमारे ३ ग्रॅम फायबर मिळते. त्यामुळे सामान्य आहारात दिवसाला एक मध्यम आकाराचे केळ खाणे पुरसे आहे. परंतु केवळ एक केळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता पूर्णपणे दूर होणार नाही. संपूर्ण आहारात पुरेसे फायबर, मुबलक पाणी आणि नियमित शारीरिक हालचाल असणे आवश्यक आहे.

केळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता होते की सुटका मिळते? (Does Banana Cause or Cure Constipation?)

“केळ्यामुळे बद्धकोष्ठता होते” हा नियम प्रत्येकाला लागू होत नाही. पिकलेले केळ अनेक लोकांचा त्रास कमी करू शकते, तर काहींना ते खाल्ल्यानंतर बद्धकोष्ठता किंवा पोटफुगी जाणवू शकते. त्यामुळे हे सर्व व्यक्तीची पचनक्षमता, केळ किती पिकले आहे आणि दैनंदिन आहार कसा आहे यावर अवलंबून असते. केळ खाल्ल्याने सतत बद्धकोष्ठता वाढत असेल, तर पपईसारख्या इतर फायबरयुक्त फळांचा आहारात समावेश करावा.

बद्धकोष्ठता असताना केळ खाताना पाणी प्यावे का? (Drinking Water While Eating Banana)

केळ खाताना किंवा खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने कोणतेही मोठे नुकसान होत नाही. पुरेसे पाणी पिणे बद्धकोष्ठतेत अत्यंत गरजेचे असते, कारण फायबरसोबत द्रव पदार्थांचे सेवन केल्याने मल मऊ होतो आणि आतड्यांची हालचाल सुरळीत होण्यास मदत मिळते.

केळ दुधासोबत खाऊ शकतो का? (Can We Eat Banana With Milk?)

आहारतज्ज्ञ मानसी यांच्या मते, केळ दुधासोबत खाल्ल्याने प्रत्येकालाच पोटफुगीचा त्रास होईल असे नाही. ते व्यक्तीच्या पचनक्षमतेवर आणि दूध पचवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. केळ आणि दूध एकत्र करून शेक किंवा स्मूदी बनवून पिऊ शकता. त्यात ओट्स आणि खजूर घातल्यास तो अधिक पौष्टिक आणि कॅलरीयुक्त आहार बनू शकतो.

IBS चा त्रास असल्यास केळ खाणे योग्य आहे का? (Is Banana Safe in IBS?)

IBS (Irritable Bowel Syndrome) चा त्रास असणाऱ्या लोकांना अन्नाची निवड त्यांच्या लक्षणानुसार करावी लागते. ‘Low-FODMAP’ आहार IBS च्या काही रुग्णांमध्ये पोटफुगी, गॅस आणि इतर लक्षणे नियंत्रित करण्यास मदत करतो. आहारतज्ज्ञांच्या मते, पिकलेले केळ Low-FODMAP पर्यायांमध्ये धरले जाते, परंतु केळ खाण्याचे प्रमाण आणि स्वतःची पचनक्षमता विचारात घेणे आवश्यक आहे.

बद्धकोष्ठतेमुळे पोटफुगीची समस्या होत असल्यास काय करावे? (Bloating Due to Constipation)

केळ खाल्ल्याने गॅस किंवा पोटफुगी वाढण्याची शक्यता असल्यास जबरदस्तीने त्याचा आहारात समावेश करण्याची गरज नाही. काही लोकांना कच्चे किंवा कमी पिकलेले केळ खाल्ल्याने त्रास होतो. अशा स्थितीत व्यक्तीने स्वतःच्या सहनशक्तीनुसार पिकलेले केळ कमी प्रमाणात खावे किंवा पपईसारख्या दुसऱ्या फळाची निवड करावी.

अस्वीकरण (Disclaimer): हा लेख सामान्य आरोग्य आणि पोषणविषयक माहितीवर आधारित आहे. बद्धकोष्ठता, अतिसार, आयबीएस (IBS) किंवा इतर वैद्यकीय परिस्थितींमध्ये व्यक्तीच्या वयानुसार आणि आरोग्याच्या स्थितीनुसार आहाराची गरज बदलू शकते. आपल्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आहारतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.