Why Are People Putting an A4 Paper in the Freezer: घरातील फ्रिज हा रोज वापरला जाणारा आणि सर्वांत महत्त्वाच्या उपकरणांपैकी एक मानला जातो. विशेषतः उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रिजची योग्य कार्यक्षमता अत्यंत आवश्यक असते. मात्र, फ्रिजचा फ्रीझर योग्य प्रकारे काम करीत आहे की नाही, याची खात्री किती जण नियमितपणे करतात? सध्या सोशल मीडियावर याच संदर्भातील एक अनोखी ट्रिक प्रचंड व्हायरल होत आहे. या ट्रिकमध्ये फ्रीझरमध्ये फक्त A4 आकाराचा साधा पांढरा कागद ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
पहिल्या नजरेला ही कल्पना विचित्र वाटू शकते. साध्या कागदाचा आणि फ्रीझरचा काय संबंध, असा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, या साध्या प्रयोगातून फ्रीझरच्या कार्यक्षमतेबाबत काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. म्हणूनच ही ट्रिक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
फ्रीझरचे कार्य सुरळीत राहण्यासाठी त्यामध्ये योग्य तापमान आणि आर्द्रतेचे संतुलन असणे आवश्यक असते. प्रत्येक वेळी फ्रिजचा दरवाजा उघडला जातो किंवा गरम पदार्थ आत ठेवले जातात, तेव्हा बाहेरील ओलसर हवा फ्रीझरमध्ये प्रवेश करते. ही अतिरिक्त आर्द्रता कालांतराने फ्रीझरच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते; मात्र हे सर्वसामान्य वापरकर्त्याला सहजपणे लक्षात येत नाही.
तज्ज्ञांच्या मते, फ्रीझरमध्ये थंड हवा सर्व भागांमध्ये समान प्रमाणात फिरणे आवश्यक असते. एखाद्या भागात जास्त ओलावा निर्माण होत असेल किंवा बर्फ जास्त प्रमाणात तयार होत असेल, तर त्याचा परिणाम थंड होण्याच्या प्रक्रियेवर होऊ शकतो. त्यामुळे उपकरणाला अधिक मेहनत घ्यावी लागू शकते आणि विजेचाही वापर वाढू शकतो.
त्याशिवाय फ्रीझरचा दरवाजा व्यवस्थित बंद होत आहे की नाही, हेही अनेकदा लक्षात येत नाही. रबर गॅस्केट सैल झाल्यास बाहेरील उष्ण आणि दमट हवा आत प्रवेश करू शकते. त्यामुळे बर्फाचा थर वाढणे, थंडावा कमी होणे आणि फ्रिजचा कॉम्प्रेसर जास्त वेळ सुरू राहणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात.
काही जणांचा असा समज असतो की, फ्रीझरमध्ये साधा कागद ठेवल्यास दुर्गंधीही कमी होते. मात्र, तज्ज्ञांच्या मते, हा समज पूर्णपणे योग्य नाही. साधा प्रिंटर पेपर दुर्गंधी शोषून घेण्यात प्रभावी ठरत नाही. तो थोडासा ओलावा शोषू शकतो किंवा बर्फाचे छोटे तुकडे आणि कण गोळा होण्यास मदत करू शकतो. मात्र, तो फ्रीझरची नियमित स्वच्छता करण्याचा पर्याय ठरू शकत नाही.
आता प्रश्न असा की, A4 आकाराचा कागद ठेवून नेमकं काय समजतं?
तज्ज्ञांच्या मते, A4 आकाराचा साधा कागद सेल्युलोज तंतूंनी बनलेला असल्यामुळे तो ओलावा शोषून घेण्याची क्षमता ठेवतो. हा कागद काही वेळ फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर बाहेर काढला असता तो ओलसर, लाटांसारखा वाकलेला किंवा मऊ झालेला दिसत असेल, तर फ्रीझरमध्ये अतिरिक्त आर्द्रता साचत असल्याचे संकेत मिळू शकतात.
जर कागदावर बारीक बर्फाचे स्फटिक तयार झाले असतील किंवा कागद कडक झाला असेल, तर फ्रीझरमध्ये जास्त प्रमाणात बर्फ तयार होत असल्याची शक्यता असते. त्यामुळे थंड हवेचा प्रवाह कमी होऊ शकतो आणि फ्रिजला अधिक ऊर्जा वापरावी लागू शकते.
त्याशिवाय हा कागद फ्रीझरच्या दरवाजाच्या रबर गॅस्केटमध्ये अडकवून दरवाजा बंद करूनही एक साधी चाचणी करता येते. दरवाजा बंद केल्यानंतर कागद कोणताही अडथळा न येता, सहज बाहेर निघत असेल, तर गॅस्केटची पकड कमकुवत झाली असल्याची शक्यता असते. तसेच फ्रीझरच्या वेगवेगळ्या भागांत कागद ठेवून कोणत्या भागात अधिक ओलावा किंवा बर्फ तयार होतो, याचाही अंदाज घेता येतो. त्यामुळे थंड हवेचा प्रवाह सर्वत्र समान आहे की नाही, याची कल्पना मिळू शकते.
तज्ज्ञांच्या मते, हा प्रयोग फ्रीझरची स्थिती समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. मात्र, हा कोणताही अधिकृत देखभाल उपाय नाही. फ्रिजची नियमित स्वच्छता, योग्य तापमान राखणे आणि वेळोवेळी तपासणी करणे हेच त्याचे आयुष्य आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते.
