Abhijeet Deepke Health Update: ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू झाली आहे. टायफॉइडवर उपचार सुरू असतानाच पुन्हा तब्येत का बिघडली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर त्यांना सध्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे टायफॉइड झाल्यानंतरही शरीर पूर्णपणे बरे होण्यासाठी किती काळ लागतो आणि कोणती काळजी घ्यावी, याकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी डॉक्टरांनी अभिजीत दिपके यांची तपासणी केली. यापूर्वी २५ जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलनादरम्यान त्यांनी स्वतःला टायफॉइड झाल्याची माहिती दिली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले होते.
डॉक्टरांनी काय सांगितले?
डॉ. विशाल लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके यांचा रक्तदाब काहीसा कमी झाला होता. त्यांना उलट्या आणि जुलाबाचाही त्रास होत होता, त्यामुळे त्यांना आयव्ही फ्लुइड देण्यात आले. सध्या त्यांना ताप नसला तरी प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास रक्त तपासणी करून पुढील उपचारांचा निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
टायफॉइडनंतर लगेच शरीर पूर्ववत होत नाही
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, टायफॉइड हा सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. दूषित पाणी किंवा अन्नामुळे हा संसर्ग होऊ शकतो. या आजारामध्ये तीव्र ताप, उलट्या, जुलाब, अशक्तपणा, डोकेदुखी, अंगदुखी आणि भूक न लागणे अशी लक्षणे दिसू शकतात.
औषधे सुरू केल्यानंतर काही दिवसांत ताप कमी होतो आणि प्रकृती सुधारत असल्याचे वाटते. मात्र, याचा अर्थ शरीर पूर्णपणे बरे झाले आहे असा होत नाही. आजाराच्या काळात शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षारांचे प्रमाण कमी होऊ शकते, त्यामुळे ताप उतरल्यावरही काही दिवस किंवा काही आठवडे थकवा, अशक्तपणा आणि पचनाच्या तक्रारी जाणवू शकतात.
लक्षणे पुन्हा दिसू शकतात का?
होय, काही रुग्णांमध्ये उपचार पूर्ण झाल्यानंतरही टायफॉइडची लक्षणे पुन्हा दिसू शकतात. याला वैद्यकीय भाषेत रिलॅप्स असे म्हणतात. उपचारानंतर पुन्हा ताप येणे, उलट्या, जुलाब किंवा पूर्वीसारखी लक्षणे दिसू लागल्यास ती केवळ अशक्तपणा समजून दुर्लक्ष करू नये.
अशा वेळी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्वतःहून पुन्हा अँटीबायोटिक औषधे सुरू करणे किंवा उरलेल्या गोळ्या घेणे धोकादायक ठरू शकते.
अशक्तपणा दुर्लक्षित करू नका
टायफॉइडचा परिणाम संपूर्ण शरीरावर होतो, त्यामुळे आजारातून बरे झाल्यानंतरही नेहमीची कामे करताना लवकर थकवा जाणवू शकतो. अचानक जड व्यायाम किंवा जास्त शारीरिक श्रम सुरू करणे टाळावे. शरीराला पुरेशी विश्रांती देत हळूहळू दैनंदिन कामे सुरू करावीत. अशक्तपणा दीर्घकाळ कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आहारात कोणती काळजी घ्यावी?
टायफॉइडनंतर पचनसंस्था काही काळ संवेदनशील राहू शकते; त्यामुळे हलका, ताजा आणि सहज पचणारा आहार घ्यावा. तळलेले, मसालेदार आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत. एकाच वेळी भरपूर जेवण्यापेक्षा थोड्या-थोड्या प्रमाणात अनेक वेळा खाणे अधिक फायदेशीर ठरते. शक्यतो घरचे ताजे अन्न खावे आणि बाहेरील अन्न खावे लागल्यास ते गरम व व्यवस्थित शिजवलेले असल्याची खात्री करावी.
शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका
टायफॉइडमध्ये ताप, उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते, त्यामुळे उपचारानंतरही पुरेसे पाणी आणि डॉक्टरांनी सुचवलेले इतर द्रवपदार्थ नियमित घ्यावेत. सतत उलट्या-जुलाब होत असतील किंवा पाणीही पोटात राहत नसेल तर घरी न थांबता तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.
औषधांचा पूर्ण कोर्स करणे अत्यंत महत्त्वाचे
टायफॉइडची लक्षणे कमी झाली किंवा ताप उतरला म्हणून डॉक्टरांनी दिलेली अँटीबायोटिक औषधे मध्येच बंद करू नयेत. संपूर्ण औषधोपचार पूर्ण करणे आवश्यक आहे. उपचारादरम्यान पुन्हा ताप येणे, तीव्र अशक्तपणा, पोटदुखी, सतत उलट्या-जुलाब किंवा प्रकृती अधिक बिघडल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा.
टीप : ही माहिती विविध संशोधन, वैद्यकीय अहवाल आणि तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. ही माहिती वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. कोणतेही औषध, उपचार किंवा जीवनशैलीतील बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
