AC Office Dehydration Risks vs Outdoor Workers: ४० अंश उष्णतेत उभा असलेला बांधकाम कामगार, दुपारच्या उन्हात ट्रॅफिकमधून मार्ग काढणारा डिलिव्हरी रायडर, सकाळी ६ वाजल्यापासून न बसता काम करणारा भाजीवाला; नैसर्गिकपणे आपण यांनाच डिहायड्रेशनचा धोका जास्त आहे असं मानतो. पण वास्तवात, अनेकदा थंड, आरामदायी ऑफिसमध्ये बसून काम करणारी व्यक्ती दिवसाच्या शेवटी अधिक त्रासदायक अवस्थेत असते. ती फार गंभीर नसते, हॉस्पिटलमध्ये जाण्याइतकीही नसते. पण हळूहळू, सतत आणि दीर्घकाळासाठी परिणाम करणारी असते.
प्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. पी. विक्रांत रेड्डी सांगतात की, त्यांनी हा पॅटर्न इतक्या वेळा पाहिला आहे की आता त्यांना त्याचं आश्चर्य वाटत नाही. ते म्हणतात, “पहिल्या नजरेत असं वाटतं की उन्हात काम करणाऱ्यांना डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. पण प्रत्यक्षात अनेकदा तापमान नियंत्रित वातावरणात बसणारे ऑफिस कर्मचारीच आवश्यकतेपेक्षा कमी पाणी पितात.” यामागचं कारण आळस किंवा दुर्लक्ष नसतं. ऑफिसमधील कामाची पद्धत, एसी वातावरणात शरीराची प्रतिक्रिया आणि व्यस्त कामाच्या वेळापत्रकामुळे शरीर देत असलेले सूक्ष्म संकेत दुर्लक्षित होतात.
जेव्हा आरामच समस्या ठरतो
डिहायड्रेशनबाबत शरीराची एक नैसर्गिक सूचना म्हणजे तहान. पण तहान ही मोठी घंटा नसून एक हलकी सूचना असते. ती विशेषतः उष्णता, घाम किंवा उन्हामुळे होणाऱ्या अस्वस्थतेसोबत अधिक जाणवते. पण हे सगळं नसल्यास ती सहज दुर्लक्षित होते.
एसीमुळे वातावरण आरामदायी वाटतं. घाम येत नाही, त्वचा लाल होत नाही, घसा कोरडा पडत नाही. त्यामुळे शरीराचे संकेत मंदावतात. वेळ जातो, शरीरातील पाण्याची कमतरता वाढत जाते आणि कोणालाच जाणवत नाही.
पण लोकांना हे लक्षात येत नाही की शरीरातून पाणी तरीही कमी होत असतं — फक्त ते दिसत नाही. डॉ. रेड्डी सांगतात, “थंड हवा आरामदायी वाटते, पण ती कोरडीही असते. त्वचेद्वारे आणि श्वासाद्वारे शरीरातून पाणी कमी होतं, फक्त घाम दिसत नाही. त्यामुळे पाणी पिण्याची गरज तितकी तातडीची वाटत नाही.”
कॅफिनचा सापळा
भारतामधील कोणत्याही ऑफिसमध्ये सकाळी ९ ते संध्याकाळी ६ दरम्यान पाहिलं, तर चहा, कॉफी आणि व्हेंडिंग मशीन सहज दिसतात. कॅफिन कामाच्या दिनक्रमाचा भाग बनलेलं आहे. सामाजिक, सवयीचं आणि थकवा कमी करण्यासाठी उपयोगी.
पण समस्या अशी की ते पाण्याची जागा घेतात…
तज्ज्ञ सांगतात की, “चहा आणि कॉफी काही प्रमाणात द्रव देतात, पण ते पाण्याची जागा घेतात, त्यात भर घालत नाहीत. अनेक वेळा लोक अनेक कप कॅफिन घेतात, पण तरीही शरीराला आवश्यक असलेलं पाणी मिळत नाही.” लोकांना वाटतं की ते दिवसभर काही ना काही पित आहेत. चहा, कॉफी, थंड पेय मात्र प्रत्यक्षात शरीराला पुरेसं पाणी मिळालेलं नसतं.
तुम्ही ज्या लक्षणांकडे दुर्लक्ष करता…
ऑफिसमधील डिहायड्रेशन फार धोकादायक स्वरूपात दिसत नाही. ते साध्या लक्षणांमधून दिसून येतं. दुपारनंतर डोकेदुखी, लक्ष केंद्रीत न होणं, थकवा. तज्ज्ञ सांगतात, “हलके डिहायड्रेशन फार स्पष्ट वाटत नाही. थोडा थकवा, सौम्य डोकेदुखी, लक्ष केंद्रीत करण्यात अडचण ही लक्षणं कामाचा ताण, स्क्रीन टाइम किंवा झोपेच्या कमतरतेवर ढकलली जातात. ओठ कोरडे होणं किंवा डोकं जड वाटणंही दुर्लक्षित केलं जातं.” आपण दुपारचा थकवा आणि डोकेदुखी हे कामाचाच भाग आहे असं गृहित धरलं आहे. पण अनेकदा शरीर फक्त पाण्याची मागणी करत असतं.
दीर्घकाळ बसून राहण्याचा परिणाम
एकाच जागी दीर्घकाळ बसून राहिल्यास शरीराचे संकेत ओळखण्याची शक्यता कमी होते. उठणं-बसणं, चालणं यामुळे तहान जाणवते. पण स्क्रीनसमोर बसल्यावर हे कमी होतं.
तज्ज्ञ सांगतात, “दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसल्याने शरीराचे संकेत ओळखण्याची शक्यता कमी होते. कमी वेळा उठल्याने पाणी पिण्याचे प्रमाणही कमी होते. हळूहळू हा पॅटर्न बनतो.” डेस्कवरची बाटली पूर्ण न होणं, कोपऱ्यातील वॉटर डिस्पेंसरकडे न जाणं, सलग मीटिंग्स या छोट्या गोष्टींचा परिणाम मोठा होतो.
दीर्घकालीन सवयींचा किडनीवर परिणाम
सुरुवातीला ही लक्षणं किरकोळ वाटतात, पण दीर्घकाळ पाणी कमी पिण्याचे परिणाम गंभीर होऊ शकतात. तज्ज्ञ सांगतात, “सतत कमी पाणी घेतल्याने मूत्र अधिक सघन होतं आणि कालांतराने किडनी स्टोन किंवा मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका वाढतो. हे परिणाम लगेच दिसत नाहीत, त्यामुळे ते दैनंदिन सवयींशी जोडले जात नाहीत.”
उपाय सोपा आहे…
यासाठी मोठे बदल आवश्यक नाहीत, फक्त थोडी जाणीव हवी.
तज्ज्ञ सांगतात, “पाणी जवळ ठेवणं, कामामधून थोडा ब्रेक घेणं आणि फक्त चहा-कॉफीवर अवलंबून न राहणं उपयोगी ठरतं. दिवसभर थोडं-थोडं पाणी पिणंही महत्त्वाचं आहे.”
डेस्कवर बाटली ठेवा, बॅगेत नाही. गरज वाटल्यास रिमाइंडर लावा. मीटिंगच्या मध्ये थोडा ब्रेक घ्या आणि प्रत्येक चहाचा कप पाण्याची जागा घेईलच असं समजू नका.
ऑफिसमधील एसी बदलणार नाही, पण आपल्या सवयी बदलू शकतात. शरीर देत असलेल्या सूक्ष्म संकेतांकडे थोडं अधिक लक्ष दिलं, तर ही समस्या सहज टाळता येऊ शकते.
