Ayurvedic Remedy for Diabetes: मधुमेह म्हणजेच डायबिटीज. ही अशी व्याधी आहे की, ती एकदा शरीरात वाढू लागली, तर तिला नियंत्रणात ठेवणे मोठे आव्हान ठरते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले की, शरीरात इतर अनेक आजार हळूहळू मुळे रोवू लागतात. म्हणूनच मधुमेहाला ‘सायलेंट किलर’, असेही म्हटले जाते. तो अचानक हल्ला करत नाही; मात्र हळूहळू शरीराची झीज करत राहतो. विशेषतः मधुमेह रुग्णांनी आहार-विहाराबाबत अधिक जागरूक राहणे अत्यावश्यक असते.
अशा वेळी आयुर्वेदतज्ज्ञ आचार्य बालकृष्ण यांनी एक साधा, पण प्रभावी उपाय सुचवला आहे. त्यांच्या मते, बार्ली (जौ) हा धान्य प्रकार मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो. रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू नये यासाठी आयुर्वेदात अनेक नैसर्गिक उपाय सांगितले आहेत. त्यापैकी बार्लीचा हा उपाय विशेष लक्षवेधी ठरत आहे.
कसा करायचा हा उपाय?
आचार्य बालकृष्ण यांच्या सल्ल्यानुसार १० ग्रॅम बार्ली, ५ ग्रॅम तीळ व ३ ग्रॅम मेथी हे सर्व साहित्य जाडसर कुटून घ्यावे. हे मिश्रण सुमारे अर्धा लिटर पाण्यात रात्री भिजत ठेवावे. सकाळी उठल्यानंतर ते चांगले गाळून घ्यावे आणि हे पाणी रिकाम्या पोटी प्यावे. नियमित सेवन केल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते, असा दावा करण्यात येतो.
हा उपाय केवळ मधुमेहापुरता मर्यादित नाही, तर शरीरातील इतर काही त्रासांवरही उपयुक्त ठरू शकतो, असे सांगितले जाते.
मूत्रविकारांवर लाभदायक?
ज्यांना लघवी कमी होणे, लघवी करताना जळजळ होणे किंवा वारंवार लघवीची समस्या भेडसावत असेल, त्यांच्यासाठी बार्लीचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो. हेच मिश्रण मातीच्या भांड्यात भिजवून सकाळी सेवन केल्यास शरीरातील उष्णता कमी होऊन जळजळ शांत होण्यास मदत मिळू शकते. मूत्रविकारांवरही याचा सकारात्मक परिणाम दिसू शकतो, असे सांगितले जाते.
खोकल्यावरही परिणामकारक?
आचार्य बालकृष्ण यांनी खोकल्यासाठीही बार्लीचा उपयोग होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे खोकला, कफ यांवर आराम मिळू शकतो. लघवी सुरळीत होण्यास मदत होऊ शकते आणि मूत्रपिंडांच्या तक्रारींवरही काही प्रमाणात लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते.
मात्र तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा
हे सर्व उपाय आयुर्वेदाधारित असून, प्रत्येक व्यक्तीची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय नियमितपणे सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. मधुमेह हा गंभीर आजार असल्याने औषधे, आहार व जीवनशैली यांचा समतोल राखणे अधिक महत्त्वाचे ठरते.
रोजच्या जीवनात साध्या धान्याचा असा उपयोग करून आरोग्य सुधारता येईल का, हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, योग्य मार्गदर्शन आणि सातत्य यांमुळे आरोग्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल नक्कीच उचलता येऊ शकते.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
