Cold Milk For Acidity Gas: जेवल्यानंतर काही वेळातच आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ होणे, घशात आंबट पाणी येणे किंवा तोंडात वारंवार आंबट-कडवट चव जाणवणे असा त्रास अनेकांना होतो. काही वेळा ही जळजळ इतकी वाढते की अस्वस्थपणा जाणवतो आणि पाणी प्यायल्यानंतरही लगेच आराम मिळत नाही. अनेकजण याला साधा ‘गॅस’ समजून दुर्लक्ष करतात. मात्र, हा त्रास वारंवार होत असेल तर त्यामागे GERD (Gastroesophageal Reflux Disease) म्हणजेच गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असण्याची शक्यता असते.

GERD म्हणजे नेमकं काय?

Harvard Health Publishing नुसार, GERD ही पचनसंस्थेशी संबंधित समस्या आहे. यामध्ये पोटातील आम्ल आणि पचनरस पुन्हा अन्ननलिकेत वर येतो. त्यामुळे अन्ननलिकेच्या आतील भागाला जळजळ आणि सूज येऊ शकते. अन्ननलिकेच्या खालच्या भागात असलेली एक स्नायूंची रिंग म्हणजे लोअर इसोफेजियल स्फिंक्टर. अन्न पोटात गेल्यानंतर ही रिंग बंद होते आणि पोटातील आम्ल वर येण्यापासून रोखते. मात्र GERDमध्ये ही रिंग योग्य प्रकारे बंद न झाल्यामुळे पोटातील आम्ल पुन्हा अन्ननलिकेत येऊ शकते. परिणामी छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि घशात आंबट पाणी येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

GERD होण्यामागे कोणती कारणे असू शकतात?

अन्ननलिकेचा स्फिंक्टर कमजोर किंवा सैल होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ…

  • काही विशिष्ट प्रकारचे पदार्थ आणि पेये
  • धूम्रपान
  • मद्यपान
  • गर्भावस्था
  • काही औषधे
  • लठ्ठपणा
  • पोटावर वाढलेला दबाव
  • हायटल हर्निया, म्हणजे पोटाचा काही भाग डायाफ्रामच्या वर सरकणे

या कारणांमुळे पोटातील आम्ल वर येण्याची शक्यता वाढू शकते.

आम्लाचा वारंवार संपर्क धोकादायक ठरू शकतो?

पोटातील आम्लाचा अन्ननलिकेशी दीर्घकाळ संपर्क झाल्यास जळजळ, सूज आणि जखम होऊ शकते. दीर्घकाळ GERDची समस्या राहिल्यास काही लोकांमध्ये Barrett’s esophagus (बॅरेट्स इसोफॅगस) ही स्थिती निर्माण होऊ शकते. या स्थितीमध्ये अन्ननलिकेच्या आतील पेशींमध्ये बदल होतात आणि पुढे अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अ‍ॅसिड रिफ्लक्सकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही.

फक्त छातीत जळजळच नाही, ही लक्षणेही दिसू शकतात

GERDची लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखी असतीलच असे नाही. काही जणांमध्ये पुढील त्रास जाणवू शकतो.

  • छातीच्या हाडामागे जळजळ किंवा वेदना
  • जेवल्यानंतर, वाकल्यानंतर किंवा झोपल्यानंतर त्रास वाढणे
  • छाती किंवा पोटाच्या वरच्या भागात जडपणा अथवा अस्वस्थता
  • पोटातील आम्ल किंवा द्रव पदार्थ तोंडात परत येणे
  • मळमळ
  • तोंडात वारंवार आंबट किंवा कडू चव येणे
  • अन्न गिळताना त्रास होणे
  • आवाज बसणे किंवा घोगरा होणे
  • सतत घसा खवखवणे

आंबट ढेकर आणि अ‍ॅसिड रिफ्लक्सपासून आराम मिळवण्यासाठी काय करावे?

जीवनशैलीमध्ये काही बदल केल्याने GERDची लक्षणे कमी करण्यास मदत होऊ शकते.

  • जेवल्यानंतर लगेच झोपू नका. रात्री झोपण्याच्या साधारण तीन ते चार तास आधी जेवण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
  • एकावेळी खूप जेवण्याऐवजी कमी प्रमाणात आणि वारंवार खा. यामुळे पोटावर अचानक जास्त ताण येणे टाळता येऊ शकते.
  • कॉफी, चॉकलेट, जास्त चरबीयुक्त पदार्थ आणि काही व्यक्तींमध्ये त्रास वाढवणारे पदार्थ कमी करा. आंबट पदार्थ, सिट्रस फळे आणि टोमॅटो यांच्यामुळेही काही लोकांमध्ये जळजळ वाढू शकते.
  • डाव्या कुशीवर झोपणे काही लोकांमध्ये रात्रीचा अ‍ॅसिड रिफ्लक्स कमी करण्यास मदत करू शकते.
  • रात्रीचा त्रास होत असल्यास बेडच्या डोक्याची बाजू सुमारे ६ इंच उंच करणे उपयोगी ठरू शकते. फक्त उशा वाढवण्यापेक्षा पलंगाच्या डोक्याची बाजू उंच करणे अधिक योग्य पद्धत मानली जाते.
  • धूम्रपान आणि मद्यपान टाळा. यामुळे अन्ननलिकेचा स्फिंक्टर सैल होऊन रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो.
  • वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. अतिरिक्त वजनामुळे पोटावर दबाव वाढू शकतो आणि त्यामुळे आम्ल वर येण्याची शक्यता वाढू शकते. तसेच खूप घट्ट कपडे घालणे टाळा. पोटावर वाढणारा दबाव काही लोकांमध्ये रिफ्लक्सचा त्रास वाढवू शकतो.

अ‍ॅसिडिटी झाली की दूध प्यावे का?

अ‍ॅसिडिटी किंवा छातीत जळजळ झाली की अनेकजण लगेच दूध पितात. मात्र, दूध प्रत्येक व्यक्तीला आराम देईलच असे नाही. जास्त चरबीयुक्त दूध काही लोकांमध्ये रिफ्लक्सची लक्षणे वाढवू शकते. त्यामुळे दूध हा GERDवरील खात्रीशीर उपाय समजून त्यावर अवलंबून राहणे योग्य नाही.

वारंवार त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या

कधीतरी अ‍ॅसिडिटी होणे आणि वारंवार GERDची लक्षणे जाणवणे यात फरक आहे. छातीत जळजळ किंवा आम्ल वर येण्याचा त्रास वारंवार होत असेल, गिळताना अडचण येत असेल किंवा लक्षणे वाढत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास, घाम येणे किंवा वेदना हात/जबड्याकडे जाणे अशी लक्षणे असतील तर त्याला केवळ अ‍ॅसिडिटी समजू नका आणि तातडीने वैद्यकीय मदत घ्या.