Acidity Reason: अनेकांना रात्री झोपताना पोटात किंवा छातीत जळजळ होऊ लागते. बरेच जण याकडे साधी गॅस किंवा ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करतात. पण ही समस्या वारंवार होत असेल, तर त्यामागचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे. रात्री जेवण्याची वेळ, किती जेवलं आणि जेवल्यानंतर लगेच झोपणं यामुळेही पोटातील जळजळ वाढू शकते. याशिवाय काही आरोग्याच्या समस्या देखील यामागे कारणीभूत असू शकतात. चला तर जाणून घेऊया यामागची ३ मुख्य कारणं.
जेवल्यानंतर लगेच झोपणं आणि जड अन्न खाणं
रात्री पोटात जळजळ होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे ॲसिड रिफ्लक्स. या अवस्थेत पोटातील आम्ल (ॲसिड) अन्ननलिकेत वर येऊ लागतं. त्यामुळे छातीत आणि घशात जळजळ जाणवते. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे ही समस्या अधिक वाढते, कारण झोपल्यावर आम्ल खाली राहण्यास मदत होत नाही.
तसेच रात्री जास्त तेलकट, तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाल्ल्यासही जळजळ वाढते. खूप जास्त जेवल्यामुळे पोट भरून राहतं आणि ॲसिड रिफ्लक्सची समस्या निर्माण होऊ शकते. काही लोकांमध्ये चहा, कॉफी, चॉकलेट आणि आंबट पदार्थांमुळेही जळजळ वाढते. त्यामुळे रात्रीचं जेवण हलकं ठेवा आणि झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवा.
पोटात सूज, अल्सर किंवा हायटल हर्निया असणं
पोटाच्या आतील आवरणाला सूज येण्याच्या समस्येला गॅस्ट्रायटिस म्हणतात. यामुळे पोटाच्या वरच्या भागात जळजळ, दुखणं, पोट भरल्यासारखं वाटणं आणि मळमळ होऊ शकते.
तर पोटात किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात जखम झाल्यास पेप्टिक अल्सरची समस्या उद्भवते. काही लोकांमध्ये अल्सरमुळे होणारी वेदना रात्री किंवा उपाशीपोटी अधिक जाणवते. याचं कारण एच. पायलोरी नावाचा जीवाणू किंवा दीर्घकाळ वेदनाशामक औषधांचा वापर असू शकतो.
याशिवाय हायटल हर्नियामुळेही रात्री जळजळ होऊ शकते. या अवस्थेत पोटाचा वरचा भाग डायाफ्राममधील छिद्रातून छातीच्या दिशेने सरकतो. त्यामुळे काही लोकांमध्ये ॲसिड रिफ्लक्स वाढतो. यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर येणं आणि खाल्लेलं अन्न पुन्हा घशापर्यंत येणं अशा तक्रारी होऊ शकतात.
रात्री पोटातील जळजळ टाळण्यासाठी काय करावं?
रात्री पोटातील जळजळ कमी करण्यासाठी झोपण्यापूर्वी किमान ३ तास आधी जेवण करा. रात्रीचं जेवण हलकं ठेवा आणि खूप तेलकट, तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाणं टाळा.
जेवल्यानंतर लगेच अंथरुणावर जाऊ नका. त्याऐवजी काही वेळ चालण्याचा प्रयत्न करा. झोपल्यावर जळजळ वाढत असेल, तर बेडच्या डोक्याकडील भाग थोडा उंच ठेवा.
वारंवार होणाऱ्या या समस्येकडे फक्त घरगुती उपाय करून दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. जर पोटात किंवा छातीत सतत जळजळ होत असेल, गिळताना त्रास होत असेल, वारंवार उलट्या होत असतील किंवा कोणतेही कारण नसताना वजन कमी होत असेल, तर तातडीने तपासणी करून घ्या.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
