अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांची संख्या अन्य कोणत्या ऑपरेटिंग सिस्टीमवरील स्मार्टफोनधारकांपेक्षा कैकपटीने अधिक आहे. गुगलची ही ऑपरेटिंग सिस्टीम आधार घेऊन विविध कंपन्या आपले स्मार्टफोन बाजारात आणत असतात. त्यापैकी काहीजण ऑपरेटिंग सिस्टीम जशीच्या तशी उचलतात तर काही त्यात आपल्याला हवे तसे बदल करतात. शिवाय अँड्रॉइडच्या ठरावीक काळानंतर अद्ययावत आवृत्त्या येत राहतात. त्यात वापरकर्त्यांच्या सुरक्षितता भक्कम करणारे तंत्रज्ञान विकसित केले जातेच; पण अन्यही नवनवीन सुविधा, वैशिष्टय़े यांचा अंतर्भाव केला जातो. मात्र यातील काही वैशिष्टय़े सर्वसामान्य वापरकर्त्यांना सहज उमगत नाहीत. किंबहुना, आपल्या स्मार्टफोनमध्ये अशी काही सुविधा आहे, हे त्यांच्या गावीही नसते. स्मार्टफोन वापराचा अनुभव आणखी मजेदार आणि उपयुक्त बनवणाऱ्या अशाच काही सुविधांबद्दल..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गेस्ट’ अकाऊंटचा फायदा

सध्या करोना निर्बंधांमुळे शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. बहुतांश विद्यार्थी पालकांच्या स्मार्टफोनवरूनच ऑनलाइन अभ्यास करत असतात. अशावेळी पालकांच्या स्मार्टफोनवरील संवेदनशील माहिती, मेसेज, छायाचित्रे किंवा चित्रफिती त्यांच्या पाहण्यात, वाचण्यात येण्याची शक्यता असते. शिवाय केवळ प्रौढ व्यक्तींनी हाताळण्यायोग्य असलेले अ‍ॅपही त्यांच्याकडून वापरले जाण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्हाला स्मार्टफोनमधील ‘गेस्ट युजर’चा पर्याय उपयुक्त ठरतो. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्ही एकापेक्षा अधिक युजर अर्थात वापरकर्ते तयार करू शकता. ज्यावेळी तुमचा स्मार्टफोन अन्य कुणाला वापरण्यासाठी किंवा हाताळण्यासाठी द्यायचा असेल तेव्हा तुम्ही ‘गेस्ट’ अकाऊंट सुरू करून त्यांना फोन वापरू देऊ शकता. या माध्यमातून मुख्य वापरकर्त्यांच्या स्मार्टफोन इंटरफेसवरील माहिती गोपनीय राहते आणि समोरील व्यक्ती स्मार्टफोनचा पूर्ण वापर करत असताना तुम्ही निर्धास्त राहू शकता. याकरिता स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ‘मल्टिपल युजर’ पर्याय निवडा. त्यातून तुम्ही ‘गेस्ट युजर’ स्थापित करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जेव्हा फोन दुसऱ्या व्यक्तीच्या हातात द्यायचा असेल तेव्हा स्मार्टफोनच्या मुख्य स्क्रीनवरून वरून खाली ‘स्वाइप’ करून तुम्ही वापरकर्ता बदलू शकता.

स्क्रीन रेकॉर्डिग

स्मार्टफोनची स्क्रीन रेकॉर्ड करण्याचा पर्याय हा अतिशय उपयुक्त आहे. कार्यालयीन कामासाठी एखादे सादरीकरण करायचे असो की, ऑनलाइन लेक्चर रेकॉर्ड करायचे असो, ‘स्क्रीन रेकॉर्ड’ पर्याय उपयोगी ठरतो. आतापर्यंत स्मार्टफोनची स्क्रीन रेकॉर्डिग करण्यासाठी अन्य अ‍ॅपचा वापर करावा लागत होता, मात्र अँड्रॉइड ११मध्ये गुगलने ‘स्क्रीन रेकॉर्डिग’चा पर्याय अंतर्भूत केला आहे. यासाठी तुम्हाला ‘क्वीक सेटिंग’ पॅनेलमध्ये जाऊन ‘स्क्रीन रेकॉर्डिग’चे बटण दाबावे लागेल. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रेकॉर्डिगचे पर्याय दिसतात. त्याद्वारे तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिग सुरू किंवा बंद करू शकता. तुम्ही सेटिंगमध्ये जाऊन स्क्रीन रेकॉर्डिगचे वेगवेगळे पर्यायही वापरू शकता.

‘पॉवर’ बटणाची ताकद

अँड्रॉइड ११मध्ये स्मार्टफोनच्या ‘पॉवर’ बटणालाही अधिक सक्षम करण्यात आले आहे. तुम्ही स्मार्टफोनचे ‘पॉवर’ बटण काही सेकंद दाबून धरताच तुम्हाला तीन पर्याय दिसतात. त्यात फोन रिस्टार्ट, इमर्जन्सी आणि पॉवर ऑफ असे पर्याय असतात. याशिवाय तुम्हाला ‘डिव्हाइस शॉर्टकट’ हा पर्यायही दिसतो. याद्वारे तुमच्या स्मार्टफोनशी संलग्न असलेल्या उपकरणांच्या हाताळणीसाठीचे पर्याय तुम्ही येथे आणू शकता. एवढेच नव्हे तर ‘पॉवर मेनू कंट्रोल्स’सारख्या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही काही ‘सिस्टीम अ‍ॅप’ही येथून नियंत्रित करू शकता.

‘असिस्टंट’चा खरा वापर

आपण अनेकदा काही कामानिमित्त बँक किंवा अन्य कोणत्या कंपनीच्या सव्‍‌र्हिस सेंटरला फोन करतो तेव्हा त्यावरील ‘बटणे दाबण्याच्या’ आणि प्रत्यक्ष प्रतिनिधीशी थेट संपर्क होण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रतीक्षेमुळे वैताग येतो. मात्र, अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये यासाठी एक खास सुविधा पुरवण्यात आली आहे. तुमच्याकडे गुगलचे फोन अ‍ॅप असेल आणि तुम्ही गुगलचे व्हॉइस असिस्टंट कार्यान्वित केले असेल तर तुम्ही चक्क ‘असिस्टंट’ला फोनवर प्रतीक्षा करण्यासाठी सुरू करू शकता. यासाठी तुमच्या फोन अ‍ॅपच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यातील तीन टिंबांवर क्लिक करा आणि सेटिंगमध्ये जा. येथे तुम्हाला ‘होल्ड फॉर मी’ (ऌ’ िऋ१ टी) हा पर्याय दिसेल तो सुरू करा. आता तुम्ही एखाद्या टोल फ्री क्रमांकाशी संपर्क साधला असेल आणि पलीकडील व्यक्तीने किंवा यंत्रणेने तुम्हाला ‘होल्ड’वर ठेवले असेल तर तुमच्या फोनच्या स्क्रीनवरील ‘होल्ड फॉर मी’ बटण क्लिक करा. त्यानंतर तुमचा गुगल असिस्टंट कॉलचा ताबा घेतो. जोपर्यंत पलीकडून मानवी आवाज येत नाही तोपर्यंत गुगल असिस्टंट लक्ष ठेवतो. पलीकडून कुणाचा आवाज येताच तो तुम्हाला स्क्रीनद्वारे तशी सूचना देतो. त्यामुळे तुम्हाला मोबाइल कानाला लावून पलीकडून प्रतिनिधीशी संपर्क होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत नाही.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Additional features in smartphone useful features in smartphone zws
First published on: 02-07-2021 at 01:18 IST