कर्करोग हा एक गंभीर आजार असून, जगभरातील लाखो लोक त्याचा सामना करीत आहेत. कर्करोगाचे अनेक प्रकार असून, त्यामागे विविध कारणे असू शकतात. अनेकदा सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाची लक्षणे स्पष्टपणे जाणवत नाहीत. त्यामुळे आजाराचे निदान उशिरा होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत कर्करोगाबाबत जागरूकता असणे आणि शरीरात जाणवणाऱ्या असामान्य बदलांकडे दुर्लक्ष न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली, योग्य आहार, नियमित व्यायाम आणि तंबाखू तसेच धूम्रपानापासून दूर राहणे यांसारख्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तसेच, वय आणि जोखमीनुसार आवश्यक तपासण्या वेळेवर करून घेणेही गरजेचे आहे. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला कर्करोगाबाबत अधिक जागरूक राहायचे असेल, तर या लेखात आम्ही आयसीएमआर (Indian Council of Medical Research)कडून दिल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गदर्शनाबद्दल जाणून घेणार आहोत. हे उपाय आरोग्यदायी जीवनशैली राखण्यास आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

कर्करोग म्हणजे काय आणि तो कसा होतो?

कर्करोग हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये शरीरातील काही विशिष्ट पेशी वेगाने आणि अनियंत्रितपणे वाढतात. सामान्यतः शरीर गरजेनुसार पेशी तयार करते आणि जुन्या किंवा खराब झालेल्या पेशी नष्ट केल्या जातात. मात्र, कर्करोगामध्ये या प्रक्रियेत अडथळा येतो आणि पेशी असामान्यपणे वाढतच राहतात. इतकेच नाही, तर कालांतराने या पेशींच्या गाठी किंवा ट्यूमर तयार होऊ शकतात आणि त्या आसपासच्या ऊतींना नुकसान पोहोचवू शकतात. काही प्रकारचे कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतात.

कर्करोगाचे किती प्रकार?

जर तुम्हाला वाटत असेल की, कर्करोगाचे फक्त पाच किंवा १० प्रकार आहेत, तर सत्य ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल. उपलब्ध माहितीनुसार, कर्करोगाचे २०० हून अधिक प्रकार आहेत. सामान्यतः, कर्करोग कोणत्या अवयवात किंवा ऊतीमध्ये सुरू होतो, त्यानुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते. प्रमुख प्रकारांमध्ये स्तनाचा कर्करोग, फुप्फुसाचा कर्करोग, तोंड आणि घशाचा कर्करोग, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, पुरुषस्थ ग्रंथी (प्रोस्टेट)चा कर्करोग, मोठ्या आतड्याचा, पोटाचा कर्करोग, यकृताचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग आदींचा समावेश होतो.

कर्करोग टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये

हे लक्षात ठेवा की, ज्यांच्या कुटुंबात कर्करोगाचा इतिहास आहे, त्यांनाच कर्करोग होईल असे नाही. प्रत्येकाला धोका असतो, विशेषतः ज्यांची जीवनशैली चांगली नाही त्यांना. आयसीएमआरने (ICMR) कर्करोग प्रतिबंधासाठी काही महत्त्वाचा सल्ला दिला आहे, ज्याचे पालन केल्याने तुमचे जीवन सुधारू शकते.

काय करावे?

  • आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करा
  • नेहमी सक्रिय राहा म्हणजेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय.
  • आपले वजन सामान्य मर्यादेत ठेवा
  • नियमित आरोग्य तपासणी आणि कर्करोग तपासणी करून घ्या.
  • भरपूर ताज्या भाज्या आणि फळे खा
  • आपल्या शरीरात दिसणाऱ्या चिन्हे आणि लक्षणांबद्दल जागरूक राहा.
  • सुरक्षित लैंगिक सवयींचा अवलंब करा
  • कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांच्या संपर्कात येणे टाळा किंवा कमी करा.

काय करू नये?

  • कोणत्याही स्वरूपात तंबाखूचे सेवन करू नका
  • मद्यपानाचे सेवन मर्यादित करा, शक्यतो ते अजिबातच करू नका.
  • मसालेदार, तळलेले, प्रक्रिया केलेले आणि जंक फूड खाणे टाळा.
  • बैठी जीवनशैली टाळा