डॉ. शुभांगी महाजन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मायक्रोपिग्मेंटेशन, जे कायमस्वरूपी मेकअप किंवा कॉस्मेटिक टॅटूइंग म्हणूनही ओळखले जाते. ही एक कॉस्मेटिक प्रक्रिया आहे जी तुमच्या त्वचेवरील गमावलेला रंग परत आणण्यासाठी किंवा बदलण्यासाठी वापरली जाते.  मायक्रोपिग्मेंटेशन बहुतेकदा तुमच्या चेहऱ्यावर वापरले जाते. उदा. भुवया, पापण्या (आयलाइनर म्हणून) आणि ओठ वाढवण्यासाठी. त्वचेवर कॅमोफ्लाज म्हणून आणि रंग गमावलेल्या त्वचेच्या भागात रंग पुर्नसचयित करण्यासाठीही याचा वापर केला जातो.

मायक्रोपिग्मेंटेशनसाठी कुणी करावे?

  • कोणीही (पुरुष किंवा स्त्रिया) मायक्रोपिग्मेंटेशनचा वापर करू शकतात. जर तुम्ही अशी व्यक्ती असाल, ज्याला मेकअप लागू करताना शारीरिक आव्हाने टाळून सर्वोत्तम दिसायचे असेल तर, मायक्रोपिग्मेंटेशन तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल.
  • मायक्रोपिग्मेंटेशन हे काही वैद्यकीय परिस्थितींवर उपचार किंवा उपाय म्हणून उपयोगी ठरते :
  • चेहऱ्यावर पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया करण्यासाठी पाठपुरावा म्हणून.
  • वयामुळे किंवा अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीमुळे पातळ होत असलेल्या भुवया भरून काढण्यासाठी.
  • त्वचारोगामुळे गमावलेला त्वचेचा रंग परत मिळविण्यासाठी.
  • स्तनाच्या शस्त्रक्रियेनंतर एरिओला (स्तनांभोवतीचा भाग) पुन्हा तयार करण्यासाठी
  • तुम्हाला पारंपरिक, तात्पुरत्या मेकअपची अ‍ॅलर्जी असल्यास कायमस्वरूपी उपाय म्हणून.

प्रक्रिया कशी केली जाते?

त्वचेला सुन्न करण्यासाठी आणि प्रक्रियेदरम्यान तुम्हाला आरामदायी ठेवण्यासाठी स्थानिक भूल दिली जाते. सामान्यत:, मायक्रोपिग्मेंटेशन ऑफिस सेटिंगमध्ये केले जाऊ  शकते. यात त्वचेच्या पृष्ठभागाच्या अगदी खाली (डर्मिस) रंगीत रंगद्रव्ये ( टॅटू शाई/आयर्न ऑक्साइड) इलेक्ट्रिक टॅटू उपकरण वापरून इंजेक्ट केले जाते. प्रक्रियेच्या जटिलतेवर अवलंबून ३० मिनिटांपासून कित्येक तास प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागतात. प्रक्रियेनंतर अँटीसेप्टिक क्रीम लावण्यास देतात. 

काय काळजी घ्यावी?

काही रुग्णांना इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी एकापेक्षा जास्त उपचारांची आवश्यकता असू शकते. वर्षांनुवर्षे रंगद्रव्य कमी होत असल्याने लुक राखण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त उपचारदेखील करावे लागू शकतात. उपचार केलेल्या भागावर हलकी सूज आणि लालसरपणा होऊ  शकतो. तुमचे सौंदर्यतज्ज्ञ किंवा प्लास्टिक सर्जन तुम्हाला काही मलम लावण्यास देतील. तसेच, त्यांनी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन करा. जर तुम्हाला जास्त सूज, वेदना, जळजळ किंवा लालसरपणा जाणवला, ताप किंवा पुरळ आली तर तुमच्या सौंदर्यतज्ज्ञांशी किंवा प्लास्टिक सर्जनशी त्वरित संपर्क साधा.

धोके काय आहेत? 

र्निजतुकीकरण केलेल्या सुया न वापरल्यास किंवा शाई दूषित असल्यास हिपॅटायटीस, एचआयव्ही आणि स्टॅफ यांसारखे संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रशिक्षित कॉस्मेटिक फिजिशियनच्या क्लिनिकमध्ये प्रक्रिया केल्यास असे संक्रमण होण्याची शक्यता कमी असते. 

डोळ्याभोवती मायक्रोपिग्मेंटेशन प्रक्रियेमुळे पापण्यांचे नुकसान, पापण्यांना गंभीर दुखापत, क्रस्टिंग आणि एक्ट्रोपियन होऊ शकते.

तुमचे शरीर टॅटूच्या शाईवर ‘फॉरेन बॉडी’ म्हणून प्रतिक्रिया देऊ  शकते आणि रंगद्रव्याच्या कणांभोवती गाठ (फॉरेन बॉडी ग्रॅन्युलोमा) बनू शकते. केलॉइडसारखे चट्टे टॅटूच्या जागी तयार होऊ शकतात. 

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aesthetics micropigmentation girls makeup ysh
First published on: 08-12-2021 at 01:39 IST