जगातील सर्वात लहान बाळ पाहिलंत का?; १३ महिन्यांच्या उपचारानंतर आलंय घरी

जन्मावेळी तिचं वजन फक्त २१२ ग्रॅम होतं. तुलना करायला गेलं तर हे एका सफरचंदाच्या वजनाइतकंच होतं.

After 13 Months Worlds Smallest Baby Home gst 97
जन्मावेळी क्वेक यू झुआनची उंची २४ सेमी तर वजन फक्त २१२ ग्रॅम होतं. (Photo : प्रातिनिधिक)

एक अत्यंत सकारात्मक बातमी! जन्मावेळी जगातील सर्वात लहान ठरलेल्या बाळाला आता अखेर तब्बल १३ महिन्यांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून हे बाळ सुखरूपपणे आपल्या घरी गेलं आहे. गेल्या वर्षी ९ जून रोजी सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये (NUH) तिचा जन्म झाला. तिचं नाव आहे क्वेक यू झुआन. जन्मावेळी तिचं वजन फक्त २१२ ग्रॅम होतं. तुलना करायला गेलं तर हे एका सफरचंदाच्या वजनाइतकंच होतं. क्वेक यू झुआनच्या आईची प्रसूती ही अवघ्या २५ आठवड्यांत झाली होती. बीबीसीने दिलेल्या दिलेल्या अहवालानुसार, क्वेक यू झुआन ही तब्बल ४ महिने प्री मॅच्युअर होती. जन्माच्या वेळी तिची उंची फक्त २४ सेमी इतकी होती.

खरंतर क्वेक यू झुआन इतकी लहान होती की जेव्हा तिला नवजात अतिदक्षता विभागात नेण्यात आलं तेव्हा ड्युटीवर असलेल्या नर्सला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. NUH च्या नर्स झांग सुहे यांनी ‘द स्ट्रेट टाइम्स’ला सांगितलं कि, “मला धक्का बसला म्हणून मी त्याचं विभागातील प्राध्यापकाशी बोलले आणि त्यांना विचारलं की तुम्ही तरी यावर विश्वास ठेवू शकता का? कारण, माझ्या २२ वर्षांच्या अनुभवात मी इतकं लहान नवजात बाळ कधीच पाहिलं नव्हतं.”

१३ महिने उपचार, अनेक आठवडे व्हेंटिलेटर

जन्मानंतर या लहानग्या बाळावर पुढचे तब्बल १३ महिने रुग्णालयात सखोल उपचार करण्यात आले. तिने अनेक आठवडे व्हेंटिलेटरवर घालवले. एक अत्यंत सकारात्मक बाब अशी कि, आता क्वेक यू झुआनचं वजन अत्यंत निरोगी म्हणजे ६.३ किलो इतकं आहे. तिला गेल्याच महिन्यात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. क्वेक यू झुआन ही जगातील जगलेलं सर्वात लहान प्रिमॅच्युअर बाळ असल्याचं मानलं जातं. दरम्यान तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी पत्रकारांशी प्रथमच बोलताना सांगितलं की, क्वेक यू झुआनचं वजन त्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच कमी होतं. डॉ. म्हणाले कि, “आम्ही तिचं वजन ४००, ५०० किंवा ६०० ग्रॅम असावं अशी अपेक्षा केली होती. परंतु, ती फक्त २१२ ग्रॅमची होती.”

उपचारादरम्यान डॉक्टरांपुढची आव्हानं

क्वेक यू झुआनवर उपचार करण्यास देखील बरीच आव्हाने होती. असं सांगितलं जातं कि, तिची त्वचा इतकी नाजूक होती की डॉक्टर तिची तपासणी देखील करू शकत नव्हते. तिचं शरीर इतकं लहान होतं की, डॉक्टरांना सर्वात लहान श्वासोच्छवासाची नळी शोधावी लागली. तिच्या मापाचं डायपर कापावं लागलं जेणेकरून ते तिला फिट होतील. इतकंच काय तर एका डॉक्टरने सांगितलं कि, “ती इतकी लहान होती की औषधाचं प्रमाण देखील दशांश बिंदूंवर ठरवावं लागलं होतं.”

आता क्वेक यू झुआनचं वजन अत्यंत निरोगी म्हणजे ६.३ किलो इतकं आहे. (NUH/ Facebook)

‘ती’ ठरली आशेचा किरण

“जन्माच्या वेळी इतकी प्रचंड आरोग्यविषयक गुंतागुंत असलेल्या अडचणींविरुद्ध चिकाटीने लढा देऊन तिने अनेकांना प्रेरित केलं आहे. ज्यामुळे ही ‘कोविड १९’ बाळ इतक्या प्रचंड आव्हानात्मक स्थितीत अनेकांसाठी आशेचा किरण ठरली”, असं हॉस्पिटलने आपल्या एका निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, आता यू झुआनच्या पालकांना वैद्यकीय उपकरणं वापरण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे. जेणेकरून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरामध्येच तिची काळजी घेतली जाईल.

आयोवा विद्यापीठाच्या सर्वात लहान बाळांच्या रजिस्ट्रीनुसार, क्वेक यू झुआनच्या जन्मापूर्वी २०१८ मध्ये  जन्मलेल्या एका मुलीच्या नावावर जगातील सर्वात हलक्या बाळाचा रेकॉर्ड होता. जन्मानंतर त्या बाळाचं वजन २४५ ग्रॅम इतकं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: After 13 months worlds smallest baby home gst