Is Sleeping After Lunch Good or Bad: दुपारचं जेवण झालं की, डोळे आपोआप मिटायला लागतात… अंगात जडपणा जाणवतो… आणि मनात एकच प्रश्न येतो “थोडीशी डुलकी घेतली तर चालेल का?” अनेक जण याला आळस समजतात; तर काही जण याला शरीराची गरज मानतात. पण खरा प्रश्न असा आहे की, दुपारची डुलकी आरोग्यासाठी फायदेशीर आहे की घातक? याचं उत्तर आता संशोधनातून समोर आलं आहे.

तज्ज्ञ सांगतात की, दुपारी १ ते ४ या वेळेत शरीरात नैसर्गिकरीत्या ऊर्जा कमी होते. ही ऊर्जा केवळ जड जेवणामुळे होत नाही, तर आपल्या शरीराच्या जैविक घड्याळाचा (बॉडी क्लॉक) हा एक भाग असतो. त्यामुळे या वेळेत थकवा येणं ही पूर्णपणे नैसर्गिक गोष्ट आहे.

डुलकी घेतल्यास मेंदू होतो ताजातवाना!

संशोधनानुसार, दुपारी घेतलेली छोटीशी ‘पॉवर नॅप’ मेंदूला विश्रांती देते. त्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि काम करण्याची कार्यक्षमता वाढते. म्हणजेच योग्य वेळेत आणि योग्य कालावधीसाठी घेतलेली डुलकी तुमची उत्पादकता वाढवू शकते.

Award Banner

नासाच्या एका अभ्यासात आढळलं की, फक्त २६ मिनिटांची डुलकी घेतल्याने जागरूकता ५४% ने वाढते आणि कामगिरीत ३४% सुधारणा होते. त्यामुळेच खेळाडू, डॉक्टर, पायलट यांसारखे तणावपूर्ण काम करणारे लोकही डुलकीचा उपयोग करतात.

पण इथेच आहे मोठा ‘ट्विस्ट’!

डुलकी फायदेशीर असली तरी ती जास्त वेळ घेतली, तर उलट परिणाम होऊ शकतो. ३० मिनिटांपेक्षा जास्त झोप घेतल्यास मेंदू गाढ झोपेत जातो. अशा वेळी जाग आली, तर शरीर जड वाटतं, डोळे उघडत नाहीत आणि मन गोंधळलेलं वाटतं. यालाच ‘स्लीप इनर्शिया’, असे म्हणतात.

ही अवस्था काही वेळ टिकू शकते आणि तुमचं पुढचं काम बिघडू शकतं. विशेष म्हणजे, उशिरा घेतलेली डुलकी रात्रीच्या झोपेवरही परिणाम करू शकते.

तज्ज्ञ काय सांगतात?

तालार मुख्तारियन (युनिव्हर्सिटी ऑफ वॉरिक येथील मानसिक आरोग्य तज्ज्ञ) यांच्या मते, डुलकी सर्वांसाठी सारखीच फायदेशीर असेलच असं नाही. प्रत्येक व्यक्तीच्या झोपेच्या सवयी, वय आणि जीवनशैलीनुसार त्याचा परिणाम बदलतो. योग्य वेळेत घेतलेली डुलकी फायदेशीर ठरू शकते; पण चुकीच्या वेळेत घेतल्यास रात्रीची झोप बिघडू शकते.

मग योग्य डुलकी कशी घ्यावी?

तज्ज्ञांच्या मते:

  • डुलकी १० ते २० मिनिटांचीच असावी
  • ती दुपारी २ वाजण्यापूर्वी घ्यावी
  • शांत, थंड आणि अंधाऱ्या जागेत झोपावं. ते शक्य नसल्यास आय मास्क किंवा नॉईज कॅन्सलिंग हेडफोन वापरावेत. परंतु, सर्वांसाठी डुलकी योग्य असतेच, असं नाही

प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. वय, दैनंदिन सवयी आणि झोपेचा पॅटर्न यांवर डुलकीचा परिणाम अवलंबून असतो. काहींना डुलकी घेतल्यावर खूप फ्रेश वाटतं; तर काहींना उलट सुस्ती जाणवते.

निष्कर्ष: फायदेही, तोटेही – निर्णय तुमचा!

दुपारची डुलकी ही ना पूर्णपणे वाईट आहे, ना पूर्णपणे चांगली. योग्य वेळ आणि योग्य कालावधी असेल, तर ती तुमच्यासाठी ऊर्जा देणारी ठरू शकते; पण चुकीच्या पद्धतीनं घेतल्यास ती रात्रीची झोप बिघडवू शकते.

त्यामुळे एकच मंत्र – तुमच्या शरीराला काय सूट होतं, हे ओळखा आणि त्यानुसारच डुलकी घ्या!