Airport Tips for Comfortable Journey : लांबचा पल्ला लवकर गाठण्यासाठी, वेळ वाचविण्यासाठी अनेक जण विमानाचा प्रवास सोईस्कर मानतात. विमान प्रवास हा आरामदायक व थोडा खर्चीक असतो. तो अनेकांना आवडत असला तरी पहिल्यांदाच व सतत विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी विमानतळाची प्रक्रिया थोडी गोंधळात टाकणारी ठरू शकते. त्यामुळे विमान प्रवासाची प्रत्येक पायरी समजून घेतल्यास प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि तणावरहित होतो.
सतत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ती म्हणते की, प्रवास करताना विमानतळावरील सुरक्षा तपासणीसाठी नेहमी आधीच तयार राहावे आणि सर्व सामान नीट व व्यवस्थित ठेवावे. नंतर अभिनेत्री पुढे म्हणाली, “मी खूप प्रवास करते आणि प्रत्येक वेळी सुरक्षा तपासणीची प्रक्रिया वेळखाऊ आणि त्रासदायक वाटतात. त्यामुळे त्या तपासणीसाठी आधीच तयारी करून ठेवल्यास वेळ वाचतो आणि अनावश्यक त्रासही टाळता येतो”.
‘कॉन्डे नास्ट ट्रॅव्हलर मिडल ईस्ट’शी (Condé Nast Traveller Middle East) बोलताना प्रियांका चोप्रा म्हणाली, “प्रवास करताना तुमची इलेक्ट्रॉनिक उपकरणे एकाच ठिकाणी ठेवा आणि आवश्यक कागदपत्रे हातात तयार ठेवा. गरज पडल्यास बूट काढावे लागू शकतात. त्यामुळे त्याचीही तयारी ठेवा. एकदा तपासणी झाल्यानंतर पुन्हा मागे बोलावले जाऊन तीच प्रक्रिया करावी लागणे मला अजिबात आवडत नाही. म्हणूनच मी माझ्या चेक-इन बॅगेजची विशेष काळजी घेते. १०० मिलीपेक्षा जास्त क्षमतेच्या द्रवपदार्थांच्या बाटल्या ठेवत नाही. अशा वस्तूंसाठी मी लहान झिप-लॉक पिशव्या वापरते. त्यामुळे सुरक्षा तपासणी जलद आणि कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण होते”.
जर तुम्ही कधी विमानतळावरील सुरक्षा तपासणीच्या वेळी घाईघाईने खिशातले सामान बाहेर काढले असेल किंवा पासपोर्ट शोधताना तुमच्या मागे उभ्या असलेल्या प्रवाशांना वाट पाहायला लागत असेल, तर प्रियांकाचा हा प्रवासविषयक सल्ला तुम्हाला नक्कीच पटेल. त्याची खातरजमा करण्यासाठी आम्ही विमान वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व एअर इंडियाच्या निवृत्त वरिष्ठ एजीएम (AGM) के. अनुराधा सुरेश यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी हा सल्ला अतिशय उपयोगी आणि रोजच्या प्रवासात कामी येणारा असल्याचे सांगितले.
अनुराधा म्हणाल्या, “सुरक्षा तपासणीदरम्यान होणारा उशीर हा प्रक्रियेमुळे नाही, तर तुमच्या तयारीच्या अभावामुळे होतो. कागदपत्रे हाताशी ठेवणे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे एकाच ठिकाणी ठेवणे आणि कॅबिन बॅग व्यवस्थित भरल्यास सुरक्षा तपासणी लवकर पूर्ण होते. त्यामुळे प्रवाशांचा ताण कमी होतो आणि विमानतळावरील कामकाजही अधिक सुरळीत व सुरक्षितपणे पार पडते.
प्रियांकाचा सल्ला हा अशा साध्या गोष्टींपैकी एक आहे, ज्या ऐकायला अगदी सामान्य वाटतात; पण त्यामुळे सर्वांसाठीच – म्हणजेच प्रवासी, सुरक्षा कर्मचारी, एअरलाइन कर्मचारी आणि सहप्रवासी यांच्यासाठी खरोखरच तो अधिक सुखकर होतो.
नागरी उड्डाण मंत्रालयाच्या ‘ब्यूरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी’ (BCAS)नेही इतर गोष्टींबरोबरच उपाययोजना खालीलप्रमाणे :
- सामानाची (बॅगेज) मर्यादा – केवळ एक ‘चेक-इन बॅग’ आणि एक ‘कॅबिन बॅग’ नेण्याची परवानगी आहे.
- द्रव पदार्थ, एरोसोल व जेल (LAGs) – द्रव पदार्थ १०० मिली किंवा त्यापेक्षा कमी क्षमतेच्या स्वतंत्र डब्यांमध्ये असावेत आणि ते १-क्वार्ट (सुमारे १ लिटर) क्षमतेच्या पारदर्शक, पुन्हा बंद करता येण्याजोग्या प्लास्टिक पिशवीत पूर्णपणे मावणारे असावेत.
- वेळ – देशांतर्गत उड्डाणांसाठी दोन तास आधी आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी तीन ते चार तास आधी विमानतळावर पोहोचावे.
- प्रक्रिया – या प्रक्रियेमध्ये ओळख पटवणे (identity verification), शारीरिक तपासणी (frisking) आणि ‘कॅबिन’ तसेच ‘चेक-इन’ अशा दोन्ही प्रकारच्या सामानाची एक्स-रे (X-ray) तपासणी यांचा समावेश असतो.
