Aishwarya Rai Daily Routine: अभिनेत्री ऐश्वर्या राय केवळ रूपासाठीच नव्हे, तर तिच्या व्यग्र आणि धावपळीच्या दिनक्रमासाठीही ओळखली जाते. जगभरातील प्रवास, विविध कार्यक्रम, मुलाखती, चित्रीकरण आणि त्यासोबत कुटुंबाची जबाबदारी अशा अनेक गोष्टी ती एकाच वेळी सांभाळताना दिसते. एवढ्या व्यग्र वेळापत्रकात स्वतःसाठी वेळ कसा काढायचा, हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर खुद्द ऐश्वर्यानं एका मुलाखतीत दिलं होतं.

गेल्या वर्षी Harper’s Bazaar Indonesia ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्यानं तिच्या २४ तासांच्या दिनक्रमाबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. तिच्या मते, प्रत्येक दिवस अगदी ठरावीक पद्धतीनं जात नाही. मात्र, तिच्या दिवसाची सुरुवात एका गोष्टीमुळे नेहमीच लवकर होते. ती दररोज साधारण पहाटे ५.३० वाजता दिवसाची सुरुवात करते, असं तिनं सांगितलं.

२४ तासांत ४८ तासांचं काम?

आपला दिवस कसा असतो, असं विचारण्यात आल्यानंतर ऐश्वर्यानं एक मजेशीर निरीक्षण सांगितलं. जगासाठी दिवसात २४ तास असले तरी आपल्या आयुष्यातील अनेक जबाबदाऱ्या आणि कामं पाहता आपण २४ तासांत ४८ तासांचं काम करण्याचा प्रयत्न करीत असल्यासारखं वाटतं, असं तिनं सांगितलं.

तिच्या मते, दररोजचा दिनक्रम एका ठरावीक चौकटीत बसवणं शक्य नाही. काम, कुटुंब आणि आई म्हणून असलेली भूमिका यामुळे प्रत्येक दिवस वेगळा असतो. मात्र, एक गोष्ट मात्र कायम असते आणि ती म्हणजे दिवसाची लवकर होणारी सुरुवात.

आई, कुटुंब आणि काम; सगळं कसं सांभाळते?

ऐश्वर्यानं मुलाखतीत महिलांच्या अनेक भूमिका आणि त्यातून येणाऱ्या जबाबदाऱ्यांविषयीही भाष्य केलं. एका दिवसात महिला अनेक भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे किती वाजता कोणतं काम केलं, यापेक्षा आपल्याला करायची असलेली कामं योग्य पद्धतीनं पूर्ण झाली का, हे अधिक महत्त्वाचं असल्याचं तिचं म्हणणं होतं.

अभिनेत्रीच्या मते, दिवसाचा भर प्रत्येक काम पूर्ण करण्यावर आणि ते समाधानकारकपणे पूर्णत्वास नेण्यावर असतो. त्यामुळे तिच्यासाठी दिनक्रम म्हणजे केवळ वेळेचं काटेकोर नियोजन नसून, समोर असलेली प्रत्येक जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.

मग तिचा रोजचा मंत्र काय?

ऐश्वर्याला दररोज उत्साहानं कामाला सुरुवात करण्यासाठी एखादा ठरावीक मंत्र आहे का, असं विचारण्यात आलं. त्यावर तिनं कोणताही एक ठरावीक मंत्र नसल्याचं सांगितलं. मात्र, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं आणि प्रत्येक क्षणात उपस्थित राहणं तिच्यासाठी महत्त्वाचं आहे.

दिवसभरात कितीही कामं असली तरी सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा, आपल्या जबाबदाऱ्यांशी प्रामाणिक राहावं आणि दिवसातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा, असा तिचा दृष्टिकोन आहे.

पहाटे उठण्याचा नेमका फायदा काय?

ऐश्वर्याच्या दिनक्रमातील पहाटे उठण्याची सवय लक्ष वेधून घेते. मात्र, लवकर उठणं प्रत्येक व्यक्तीसाठी आपोआप फायदेशीर ठरेल, असं म्हणता येत नाही. पुरेशी आणि नियमित झोप ही आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते.

नियमित वेळेत झोपणे आणि उठणे यांमुळे शरीराच्या जैविक घड्याळाला म्हणजेच circadian rhythm ला नियमित ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचा झोपेच्या वेळापत्रकावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता असते. सकाळी स्वतःसाठी काही वेळ मिळाल्यामुळे व्यायाम, ध्यान किंवा दिवसाचं नियोजन करण्यासाठीही वेळ मिळू शकतो.

मात्र, केवळ पहाटे उठण्यासाठी झोपेचा कालावधी कमी करणं योग्य नाही. त्यामुळे ऐश्वर्याची ५.३० वाजता उठण्याची सवय तशीच अंगीकारण्याऐवजी आपल्या झोपेची गरज आणि दिनचर्येनुसार वेळ ठरवणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं.

(टीप : ऐश्वर्या रायने सांगितलेली दिनचर्या तिच्या वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लवकर उठण्याचे आरोग्यविषयक परिणाम व्यक्तीनुसार वेगवेगळे असू शकतात. वरील माहिती केवळ सामान्य माहितीसाठी असून, आरोग्याशी संबंधित कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.)