Aishwarya Rai Parenting Secrets 4 Powerful Lessons Every Parent Can Learn: आजच्या काळात लहान मुलांच्या हातात मोबाईल दिसणं ही अगदी सामान्य बाब झाली आहे. सोशल मीडिया, व्हिडीओ गेम्स आणि इंटरनेटच्या जगात अनेक मुलं लहान वयातच रमू लागली आहेत. मात्र, बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या मुलीच्या संगोपनाबाबत घेतलेला एक निर्णय सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
जगभर प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्रीची मुलगी असल्यामुळे आराध्या बच्चन कायम चर्चेत असते. मात्र, इतक्या प्रसिद्ध कुटुंबात वाढूनही आराध्या सोशल मीडियापासून दूर कशी राहिली, हा प्रश्न अनेकांना पडतो. याच संदर्भात ऐश्वर्याने केलेलं एक विधान आता चर्चेचा विषय ठरत आहे.
एका कार्यक्रमादरम्यान आराध्याच्या नावाने सोशल मीडियावर फिरणाऱ्या बनावट खात्यांविषयी बोलताना ऐश्वर्या स्पष्टपणे म्हणाली की, ‘ते तिचं खाते नाही, ती सोशल मीडियावर नाही.’ हे एक साधं वाक्य असलं तरी त्यामागे पालकत्वाचा मोठा संदेश दडलेला असल्याचं अनेकांना वाटत आहे.
विशेष म्हणजे, अभिषेक बच्चननेही एका मुलाखतीत सांगितलं होतं की आराध्याकडे स्वतःचा मोबाईल फोन नाही. मुलीच्या संगोपनात ऐश्वर्याने घेतलेल्या मेहनतीचं श्रेयही त्याने तिला दिलं होतं, त्यामुळे अनेक पालकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, अखेर ऐश्वर्याने असं काय केलं ज्यामुळे आराध्या आभासी जगापासून दूर राहू शकली?
या संपूर्ण गोष्टीतून पहिला मोठा धडा मिळतो तो म्हणजे मुलांना मोबाईल किंवा सोशल मीडिया देणं ही सक्तीची गोष्ट नाही. अनेकदा मुलं मागतात म्हणून त्यांना लगेच फोन दिला जातो, मात्र मुलांची मानसिक तयारी, त्यांचं वय आणि त्यांची समज लक्षात घेऊन निर्णय घेणं अधिक महत्त्वाचं ठरू शकतं.
दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे बालपणाला स्क्रीनच्या चौकटीत अडकवू नये. कुटुंबासोबत संवाद साधणं, मित्रांसोबत खेळणं, पुस्तकं वाचणं आणि वास्तव आयुष्यातील अनुभव घेणं हे मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक मानलं जातं. आराध्याच्या संगोपनात याच गोष्टींना प्राधान्य दिल्याचं दिसून येतं.
तिसरा धडा पालकांच्या भूमिकेशी संबंधित आहे. मुलांच्या आयुष्यात सातत्य, शिस्त आणि योग्य मार्गदर्शन महत्त्वाचं असतं. घरातील नियम ठामपणे पाळले गेले तर मुलांमध्येही चांगल्या सवयी विकसित होऊ शकतात. अभिषेकच्या वक्तव्यातून ऐश्वर्याने ही भूमिका प्रभावीपणे निभावल्याचं स्पष्ट होतं.
चौथा आणि सर्वात महत्त्वाचा धडा म्हणजे गोपनीयतेचं महत्त्व. आज अनेक मुलांची माहिती आणि फोटो सोशल मीडियावर सहजपणे शेअर केले जातात. मात्र, प्रत्येक क्षण जगासमोर मांडण्याची गरज नसते. मुलांचं वैयक्तिक आयुष्य सुरक्षित ठेवणं हीदेखील पालकांची जबाबदारी आहे.
ऐश्वर्या राय बच्चनची ही भूमिका केवळ सेलिब्रिटी पालकांसाठी नाही, तर प्रत्येक कुटुंबासाठी विचार करायला लावणारी आहे. मुलांना वास्तव आयुष्याशी जोडून ठेवायचं की त्यांना लहान वयातच डिजिटल जगात ढकलायचं हा निर्णय अखेर पालकांनाच घ्यावा लागतो आणि कदाचित याच निर्णयावर मुलांचं भविष्यही अवलंबून असू शकतं.
