Cough Relief Home Remedies: नोव्हेंबर महिना सुरू झाला असून वातावरणात हळूहळू गारवा जाणवू लागला आहे. सकाळी आणि रात्री थंडीची चाहूल लागतेय, तर दिवसा काही ठिकाणी अजूनही उष्णता जाणवते. हवामानातील या बदलाचा परिणाम अनेकांच्या आरोग्यावर होताना दिसतो. कधी नाक वाहणे, कधी सतत शिंका येणे, तर कधी घशात खवखव आणि खोकल्याचा त्रास सुरू होतो. विशेषतः घशात कफ साचल्यामुळे वारंवार खोकला येणे आणि नाक बंद होणे यामुळे दैनंदिन कामांवरही परिणाम होतो.

अशा वेळी अनेक जण लगेच औषधांचा आधार घेतात. मात्र, आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही नैसर्गिक पदार्थांचाही पारंपरिक घरगुती उपाय म्हणून वापर केला जातो. यातीलच एका पदार्थाच्या तेलाला त्याच्या उग्र वासामुळे आणि उबदार गुणधर्मांमुळे विशेष महत्त्व दिले जाते. या तेलाचा योग्य पद्धतीने वापर केल्यास सर्दीमुळे होणारा त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. विशेषतः नाक चोंदणे, घशातील खवखव आणि कफामुळे होणारा अस्वस्थपणा यासाठी त्याचा वापर केला जातो. नेमके हे तेल कोणते आणि त्याचा वापर कसा करायचा, जाणून घेऊया.

१. नाक बंद होण्याचा त्रास कमी करण्यास मदत

सर्दी झाल्यानंतर नाक चोंदणे ही सर्वसामान्य समस्या आहे. नाक बंद झाल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि रात्री झोपही व्यवस्थित लागत नाही. अशा वेळी काही लोक सुगंधी तेलाच्या वाफेचा वापर करतात. या तेलातील सुगंधामुळे नाक बंद असल्याची जाणीव तात्पुरती कमी होऊन श्वास घेणे काहीसे सोपे वाटू शकते.

२. घशातील खवखव आणि खोकल्यापासून आराम

सतत खोकला येणे, घशात काहीतरी अडकल्यासारखे वाटणे आणि घशात खवखव होणे यामुळे खूप त्रास होतो. या तेलामध्ये थायमॉल नावाचे नैसर्गिक रासायनिक संयुग आढळते. त्यामध्ये सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्म असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे, त्यामुळे या तेलाचा सुगंध काही काळ आरामदायी वाटू शकतो.

३. शरीराला उबदारपणा मिळण्यास मदत

आयुर्वेदात काही पदार्थांचा उष्ण गुणधर्मासाठी वापर केला जातो. थंडीच्या दिवसांत अशा पदार्थांचा पारंपरिक घरगुती उपायांमध्ये समावेश केला जातो. या तेलाचा उबदारपणा देणारा गुणधर्म सर्दीमुळे जाणवणारा अस्वस्थपणा काही प्रमाणात कमी करू शकतो. छातीवर किंवा घशाजवळ तो योग्य प्रकारे वापरल्यास उबदारपणा जाणवू शकतो. मात्र, कोणतेही तेल त्वचेवर लावण्यापूर्वी त्याची योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

४. शरीरातील सूज आणि वेदनांसाठीही वापर

या तेलामध्ये दाहशामक गुणधर्म असल्याचे काही प्राथमिक संशोधनातून समोर आले आहे, त्यामुळे सांधेदुखी, स्नायूंच्या वेदना किंवा सूज यांसारख्या समस्यांमध्ये त्याचा बाह्य वापर केला जातो. मात्र, अशा त्रासांवर उपचार म्हणून त्याचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

५. पचनाच्या समस्यांमध्येही उपयोग

पोट फुगणे, गॅस होणे आणि अपचन यांसारख्या समस्यांसाठीही या तेलाचा पारंपरिक वापर केला जातो. यामध्ये असलेल्या थायमॉलमुळे पचनाशी संबंधित काही प्रक्रिया प्रभावित होऊ शकतात. मात्र, तेलाचे सेवन स्वतःहून करू नये. विशेषतः शुद्ध स्वरूपातील सुगंधी तेल पिणे धोकादायक ठरू शकते.

या तेलाचा वापर कसा करावा?

या तेलाचा वापर करताना सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरक्षितता. सुगंधी तेलाचे काही थेंब गरम पाण्यात टाकून त्याचा सुगंध घेण्याची पद्धत काही ठिकाणी वापरली जाते. मात्र, उकळत्या पाण्याची थेट वाफ घेणे टाळावे, त्यामुळे चेहरा आणि श्वसनमार्ग भाजण्याचा धोका असतो. लहान मुलांसाठी अशा प्रकारचे प्रयोग डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नयेत. तसेच हे तेल थेट नाकात, तोंडात किंवा घशात टाकू नये.

नेमके कोणत्या बियांच्या तेलाबद्दल आहे?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर्दी, खोकला आणि नाक बंद होण्याच्या त्रासासाठी वापरल्या जाणाऱ्या या तेलाचा स्रोत कोणता? तर हे तेल म्हणजे ओव्याच्या बियांचे तेल, अर्थात अजवाइन ऑइल!

ओव्यामध्ये थायमॉलसारखे घटक आढळतात. त्याच्या उग्र सुगंधामुळे आणि पारंपरिक वापरामुळे घरगुती उपायांमध्ये ओव्याला विशेष स्थान आहे. मात्र, ओव्याचे तेल सर्दी किंवा फ्लू पूर्णपणे बरा करते असा ठोस मानवी वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. सर्दीचा त्रास जास्त दिवस राहिल्यास ताप किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.