व्यक्ती जर तणावाखाली असेल तर ती अल्कोहोल सेवन करण्याची शक्यता जास्त असते, असे एका नव्या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. अल्कोहोलचे सेवन करण्याची इच्छा आणि त्यामागील मेंदूतील अभिक्रिया यांचा संबंध विज्ञानाला आजवर पूर्णपणे समजावून घेता आलेला नाही. या संदर्भात अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील संशोधक जॉन दानी यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांनी ताजे संशोधन केले. ब्रेन रिवार्ड सिस्टीम नावाने ओळखल्या जाणाऱ्या मेंदूतील अभिक्रियांमुळे तणावाखालील व्यक्ती अल्कोहोलचे सेवन करण्याची शक्यता असते, असे या संशोधनातून सिद्ध झाले. संशोधकांच्या या गटाने प्रयोगशाळेत उंदरांवर प्रयोग करून पाहिले असता ही बाब स्पष्ट झाली. तीच मानवासाठीही लागू होते. प्रयोगादरम्यान काही उंदरांना तणाव दिला नाही. तर काही उंदरांना एक तास तणावाखाली ठेवण्यात आले. जे उंदीर तणावाखाली होते त्यांनी सामान्य उंदरांपेक्षा अधिक अल्कोहोलचे सेवन केले. पंधरा तासांनी संशोधकांनी त्याची मात्रा तपासून पाहिली आणि फरक स्पष्ट झाला.
तणाव ही प्रणाली खरे तर मानवाला सुरक्षित राहण्यासाठी मदत करण्यासाठी उत्क्रांत झाली होती. मात्र अमलीपदार्थ मानवी संवेदनांची फसवणूक करतात, असे संशोधकांनी सांगितले. या संशोधनाचा वापर करून मानवामध्ये पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर आणि तणावाशी संबंधित अन्य विकारांवर उपचार करता येणे शक्य आहे, असे जॉन दानी यांनी सांगितले. त्यांच्या या संशोधनाचे निष्कर्ष न्यूरॉन नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)