Habits That Indicate Future Liver Damage : यकृत (लिव्हर) हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव आहे आणि तो स्वतःची पुनर्निर्मिती (regeneration) करण्याची क्षमता असलेल्या काही मोजक्या अवयवांपैकी एक आहे. त्यामुळे शरीरातील अनेक महत्त्वाच्या कार्यांमध्ये यकृताची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ‘क्लीव्हलँड क्लिनिक’च्या मते, यकृत अनेक महत्त्वाची कार्ये करते; यामध्ये रक्ताचे शुद्धीकरण, ऊर्जेचा साठा आणि पचनास मदत करणारे पित्त (bile) तयार करणे यांचा समावेश होतो.
यकृत पडद्यामागून शांतपणे काम करत असल्याने, त्याला हळूहळू हानी पोहोचवू शकणाऱ्या दैनंदिन सवयींकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. १ जुलै रोजी शेअर केलेल्या एका इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये कॅलिफोर्नियास्थित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट ज्यांनी एम्स, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्डमध्ये प्रशिक्षण घेतले आहे असे डॉक्टर सौरभ सेठी यांनी अशा तीन सामान्य सवयींवर प्रकाश टाकला, ज्यामुळे तरुणांमध्येही यकृत खराब होण्याचा धोका वाढू शकतो.
यकृताला हानी पोहचवणाऱ्या ३ सवयी
१. दररोज मद्यपान करणे
अनेक लोकांचा असा समज आहे की, दिवसातून एकदा मद्यपान करणे, विशेषतः एक ग्लास रेड वाईन घेणे, निरुपद्रवी किंवा आरोग्यासाठी फायदेशीर असते. पण, डॉक्टर सेठी यांच्या मते, यकृताच्या आरोग्याच्या बाबतीत या समजाला पुष्टी देणारा असा कोणताही पुरावा आजवर तरी सापडला नाही. मद्यपानासाठी यकृताला सुरक्षित अशी कोणतीही ठराविक मर्यादा नाही. कारण – प्रत्येक पेयामुळे यकृतावर चयापचय क्रियेचा (metabolic) अतिरिक्त ताण येतो आणि कालांतराने ही हानी हळूहळू साचत जाऊन अशी स्थिती निर्माण होते जी अपरिवर्तनीय (irreversible) असते. त्याचबरोबरइमेजिंग चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, मध्यम प्रमाणात मद्यपान करणाऱ्या ४० टक्क्यांपर्यंत लोकांमध्ये ‘फॅटी लिव्हर’ आजाराशी संबंधित बदल आधीच दिसून येतात.
२. दररोज ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ (अत्यंत प्रक्रिया केलेले) अन्न खाणे
यकृताच्या आरोग्यासाठी आणखी एक मोठी चिंता म्हणजे ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ अन्नावर वाढत चाललेला अवलंब. अशा प्रकारच्या अन्नाच्या सततच्या सेवनामुळे यकृतावर अतिरिक्त ताण येतो आणि दीर्घकाळात आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे डॉक्टरांनी स्पष्ट केले की, ज्या लोकांच्या आहारात फ्रक्टोज, रिफाइंड कर्बोदके (refined carbohydrates) आणि सॅचुरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते. त्यांना ‘फॅटी लिव्हर’चा आजार होऊ शकतो. अतिरिक्त फ्रक्टोज, रिफाइंड कर्बोदके आणि सॅचुरेटेड फॅट्स यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे फॅटी लिव्हरचा आजार बळावू शकतो. विशेषतः २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे, जे काही वर्षांपूर्वी कल्पनाही करता येणार नाही इतके जास्त आहे. २००० च्या सुरुवातीपासून मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये फॅटी लिव्हरच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वाढीसाठी ‘अल्ट्रा-प्रोसेस्ड’ अन्नाचा मोठ्या प्रमाणावर होणारा वापर हा एक महत्त्वाचा घटक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
३. तणाव आणि अपुरी झोप
तिसरी सवय म्हणजे दीर्घकाळ तणावात राहणे आणि सतत अपुरी झोप घेणे. अनेक जण त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीतील या घटकांचा यकृताच्या (लिव्हरच्या) आरोग्यावर होणाऱ्या परिणामाशी संबंध जोडत नाहीत. मात्र प्रत्यक्षात या सवयी यकृतावर मोठा आणि नकारात्मक परिणाम करू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. पण, कॉर्टिसोलच्या असंतुलनामुळे अंतर्गत अवयवांभोवती चरबी जमा होते आणि ही चरबी फॅटी लिव्हर डिसीजच्या सर्वात सुस्थापित कारणांपैकी एक असते. फॅटी लिव्हरच्या रुग्णांमध्ये निरोगी व्यक्तींच्या तुलनेत कॉर्टिसोलची पातळी ६५ टक्क्यांनी जास्त असते. आणि ही वाढ थेट रोगाच्या तीव्रतेशी संबंधित असते. डॉक्टर सेठी यांच्या मते, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि झोपेला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे जीवनशैली उपाय आहेत, जे यकृताचे दीर्घकालीन आरोग्य जपण्यास मदत करू शकतात.
