Almonds vs Peanuts: कोलेस्टेरॉल वाढलं की सर्वप्रथम आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. तेलकट पदार्थ, तळलेले पदार्थ आणि जास्त चरबीयुक्त अन्न खाणं कमी करण्यास सांगितलं जातं. मात्र, हृदयाच्या आरोग्यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. यामध्ये बदाम आणि शेंगदाणे या दोन्ही सुकामेव्यांचा समावेश होतो.
बदाम आणि शेंगदाणे हे दोन्ही प्रोटीन, फायबर आणि चांगल्या चरबीचे स्रोत आहेत. त्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ते मदत करू शकतात. पण, जर तुम्हाला खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL कमी करायचं असेल, तर बदाम की शेंगदाणे यापैकी कोणता पर्याय निवडावा? जाणून घेऊया.
कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम की शेंगदाणे?
दोन्ही पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी कोलेस्टेरॉल नियंत्रणाच्या दृष्टीने बदामांना थोडं अधिक महत्त्व दिलं जातं. याचं प्रमुख कारण म्हणजे बदामांमध्ये असलेलं अनसॅच्युरेटेड फॅट, फायबर आणि फायटोस्टेरॉलचं प्रमाण.
अनसॅच्युरेटेड फॅट शरीरासाठी तुलनेने चांगली मानली जाते. आहारातील सॅच्युरेटेड फॅटच्या जागी अनसॅच्युरेटेड फॅटचा समावेश केल्यास खराब LDL कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. साधारण २८ ग्रॅम बदाम आणि शेंगदाण्यांमधील चरबीचं प्रमाण पाहिल्यास फरक लक्षात येतो.
| पोषक घटक | बदाम (२८ ग्रॅम) | शेंगदाणे (२८ ग्रॅम) |
|---|---|---|
| असंपृक्त चरबी | १३.०७ ग्रॅम | १०.२ ग्रॅम |
| संतृप्त चरबी | १.१६ ग्रॅम | २.१९ ग्रॅम |
| फायबर | ३.१ ग्रॅम | २.४ ग्रॅम |
या आकडेवारीनुसार बदामांमध्ये चांगल्या चरबीचं प्रमाण अधिक आणि संतृप्त चरबीचं प्रमाण तुलनेने कमी आहे.
बदाम कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी कसे मदत करतात?
बदामांमध्ये केवळ चांगली चरबीच नाही, तर फायबर आणि फायटोस्टेरॉलसारखे वनस्पतीजन्य घटकही असतात.
१. फायबरचा चांगला स्रोत
बदामांमधील फायबर पचनक्रियेसाठी उपयुक्त असतं. विरघळणारे फायबर शरीरातील कोलेस्टेरॉलचं शोषण कमी करण्यास मदत करू शकतं. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात फायबर असणं महत्त्वाचं आहे.
२. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत
बदामांमधील अनसॅच्युरेटेड फॅट सॅच्युरेटेड फॅटच्या जागी घेतल्यास LDL कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी करण्याच्या दृष्टीनेही त्यांचा आहारात समावेश फायदेशीर ठरू शकतो.
३. फायटोस्टेरॉलचा फायदा
बदामांमध्ये फायटोस्टेरॉल नावाचे वनस्पतीजन्य घटक असतात. हे घटक आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं शोषण कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास हातभार लागू शकतो. काही संशोधनांमध्ये दररोज ५० ते १०० ग्रॅम बदाम खाणाऱ्या व्यक्तींमध्ये खराब LDL कोलेस्टेरॉलची पातळी कमी झाल्याचं दिसून आलं आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात बदाम खाण्यापूर्वी त्यातील कॅलरी आणि एकूण आहाराचं प्रमाण लक्षात घेणं आवश्यक आहे.
शेंगदाणे खाल्ल्यानेही हृदयाला होतो फायदा
कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी बदामांना थोडं अधिक महत्त्व असलं, तरी शेंगदाण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेंगदाणे हेही हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त पोषक घटकांचा चांगला स्रोत आहेत. शेंगदाण्यांमध्ये ओलिक अॅसिड (Oleic Acid) नावाची असंपृक्त चरबी असते. ही चरबी कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यास मदत करू शकते. याशिवाय शेंगदाण्यांमध्ये आर्जिनिन (Arginine) नावाचं अमिनो अॅसिड असतं. शरीरात नायट्रिक ऑक्साइड तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नायट्रिक ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
काही संशोधनांनुसार नियमित शेंगदाणे खाल्ल्याने चांगल्या HDL कोलेस्टेरॉलची पातळी वाढण्यास आणि रक्तातील ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत होऊ शकते.
वजन वाढू नये असं वाटत असेल तर कोणता पर्याय निवडावा?
कोलेस्टेरॉलसोबतच वजन नियंत्रणात ठेवण्याची इच्छा असेल, तर बदामांचा आहारातील समावेश फायदेशीर ठरू शकतो. काही अभ्यासांमध्ये दररोज बदाम खाणाऱ्या प्रौढ व्यक्तींमध्ये सहा आठवड्यांनंतर LDL कोलेस्टेरॉल कमी झाल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे त्यांच्या वजनात लक्षणीय वाढ झाल्याचं आढळलं नाही. मात्र, बदाम असोत किंवा शेंगदाणे, दोन्ही पदार्थांमध्ये कॅलरी भरपूर असतात. त्यामुळे किती प्रमाणात खाता, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मीठ लावलेले, तळलेले किंवा तेलात भाजलेले शेंगदाणे खाण्यापेक्षा साधे भाजलेले शेंगदाणे निवडणं अधिक चांगलं.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टीही लक्षात ठेवा
केवळ बदाम किंवा शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होईल, असं नाही. त्यासाठी संपूर्ण जीवनशैलीत बदल करणं आवश्यक आहे.
- आहारात फळं, भाज्या, कडधान्यं आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
- तळलेले पदार्थ आणि संतृप्त चरबीयुक्त पदार्थांचं सेवन कमी करा.
- नियमित व्यायाम आणि चालण्याची सवय लावा.
- शरीराचं वजन नियंत्रणात ठेवा.
- पुरेशी झोप घ्या.
- धूम्रपान आणि तंबाखूचं सेवन टाळा.
- कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करा.
खराब कोलेस्टेरॉल कमी करण्याच्या दृष्टीने बदामांमध्ये असंपृक्त चरबी, फायबर आणि फायटोस्टेरॉलचं प्रमाण तुलनेने अधिक असल्याने त्यांना प्राधान्य देता येऊ शकतं. मात्र, शेंगदाणेही हृदयासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे दोन्हींचा योग्य प्रमाणात आहारात समावेश करता येतो. तुम्हाला उच्च कोलेस्टेरॉलचा त्रास असल्यास केवळ आहारावर अवलंबून राहू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेली औषधं स्वतःहून बंद करू नका.
