Almonds or peanuts for weight loss : शेंगदाणे व बदाम दोन्ही सुकामेवा शरीर उबदार व निरोगी ठेवण्यासाठी अनेकदा खातात. पण तुम्हाला माहित आहे का, दोन्ही सुकामेवा त्यांच्या स्वरूपानुसार नव्हे, तर त्यांच्या पौष्टिक मूल्यानुसार खाल्ले पाहिजेत? शेंगदाण्यांबद्दल बोलायचे झाल्यास, पोषक तत्वांनी समृद्ध आणि किंमत बदामांपेक्षा खूपच कमी आहे. त्यातच जर तुम्ही शेंगदाणे भिजवून खाल्ले तर आणखीन आरोग्यदायी ठरतात. दररोज मूठभर शेंगदाणे खाल्ल्याने ऊर्जेची पातळी वाढते व शरीराला भरपूर फायबर मिळतात. चला, संशोधनातून जाणून घेऊया की या दोन्हींपैकी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर कोणता पदार्थ आहे ते…

शेंगदाणा खाण्याचे फायदे

वेबएमडीनुसार शेंगदाणे पोषक तत्वांचा एक उत्कृष्ट स्रोत आहेत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर, बी जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन ई, लोह, जस्त, पोटॅशियम व मॅग्नेशियम यांसारखी महत्त्वाची खनिजे असतात. शेंगदाण्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण तर अनेक आजारांचा धोका कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पोषणशास्त्रानुसार, शेंगदाण्यांचे सेवन केल्याने अक्रोड आणि बदामासारख्या महागड्या सुकामेव्याइतकेच पौष्टिक मूल्य मिळते आणि तेही खूप कमी किमतीत.

शेंगदाणे मोनोअनसॅचुरेटेड आणि पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ऍसिडस्, फायबर आणि प्लांट स्टेरॉल्सचा एक चांगला स्रोत आहेत. ही सर्व पोषक तत्वे निरोगी हृदय राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय, शरीरातील खराब (LDL) कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. तसेच, रक्ताच्या गुठळ्या (Blood Clots) होण्याची शक्यता कमी करण्यासही तो मदत करतो. परिणामी, हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात (स्ट्रोक) यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत मिळू शकते. शेंगदाण्यांमधील पोषक तत्वे शरीरातील सूज कमी करण्यासही मदत करतात, जी हृदयरोगासाठी धोकादायक मानली जातात.

बदाम खाण्याचे फायदे

हेल्थलाइननुसार, बदाम पोषक तत्वांनी समृद्ध असलेले सुके फळ आहे. २८ ग्रॅम बदामामध्ये (अंदाजे २३ बदाम) अंदाजे १६४ कॅलरीज, ६ ग्रॅम प्रथिने, १४ ग्रॅम आरोग्यदायी फॅट आणि ३.५ ग्रॅम फायबर असतात. बदाम हे व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, मॅंगनीज आणि कॅल्शियमचा देखील एक उत्कृष्ट स्रोत आहेत, जे निरोगी शरीरासाठी योगदान देतात. बदामातील मोनोअनसॅचुरेटेड फॅट, अमिनो ॲसिड आर्जिनिन, निरोगी रक्तवाहिन्या राखण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी चांगली ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे बदामाच्या सेवनाने हृदयरोगाचा धोका कमी होतो.

बदामातील प्रथिने, फायबर, आरोग्यदायी फॅट्स अन्नाच्या पचनाची गती कमी करतात. बदाम खाल्ल्यानंतर रक्तातील साखर वेगाने वाढत नाही, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. बदामामध्ये कॅलरीज जास्त असतात. पण, त्यातील प्रथिने, फायबर आणि आरोग्यदायी फॅट्स तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करतात. अनेक अभ्यासांनुसार, शिफारस केलेल्या कॅलरीच्या तुलनेत, संपूर्ण, न भाजलेल्या बदामांमधून शरीर अंदाजे २ टक्के कमी कॅलरीज शोषून घेते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते.

शेंगदाणे की बदाम; कोणता सुकामेवा आरोग्यासाठी फायदेशीर?

कॉन्टिनेंटल हॉस्पिटल्सच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या डॉक्टर एम. अनुराधा रेड्डी यांच्या अहवालानुसार, बदाम व शेंगदाणे दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध असतात. दोघांचेही संतुलित प्रमाणात सेवन केल्याने विविध पोषक तत्वे व फायदे मिळतात. एकंदरीत, बदाम व शेंगदाणे दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण, जर तुम्हाला अधिक प्रथिने (प्रोटीन) मिळवायची असतील. तर शेंगदाणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. जर तुम्हाला अधिक फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम आणि आरोग्यदायी चरबी (हेल्दी फॅट्स) हवी असेल, तर तुम्ही बदामाची निवड करू शकता. दोन्हीचे संतुलित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला अनेक आवश्यक पोषक तत्वे मिळतात.