Aaloe Vera Gel Growth Tips: उन्हाळा सुरू झाला की घरातील अनेक रोपांची विशेष काळजी घ्यावी लागते. काही रोपं भराभर वाढतात, काहींना फुलं येतात, तर काही रोपं अचानक कोमेजल्यासारखी दिसू लागतात. यामध्ये सर्वाधिक आढळणारं रोप म्हणजे कोरफड. औषधी गुणधर्मांसाठी प्रसिद्ध असलेली कोरफड अनेकांच्या घरात असते. त्वचेपासून केसांपर्यंत विविध कारणांसाठी तिचा वापर केला जातो. मात्र, अनेकदा कोरफडीची पानं बारीक राहतात, त्यात जेल कमी असतं आणि रोपाची वाढही खुंटलेली दिसते.
पण, यामागे नेमकं कारण काय असू शकतं? आणि काही जणांच्या घरातील कोरफड इतकी भरदार, जाडसर आणि जेलने भरलेली कशी दिसते? याच प्रश्नाचं उत्तर एका बागकाम तज्ज्ञाने दिलं आहे.
विशेष म्हणजे यासाठी बाजारातून महागडं खत आणण्याची गरज नसल्याचं सांगितलं जातं. उलट आपल्या स्वयंपाकघरात रोज तयार होणारी एक फुकटची गोष्ट कोरफडीच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकते, असा दावा बागकामप्रेमींमध्ये केला जात आहे.
उन्हाळ्यात कोरफडीला सर्वात मोठा धोका असतो तो चुकीच्या निगेचा. अनेक जण भरपूर पाणी घालतात, तर काही जण रोप पूर्णपणे दुर्लक्षित करतात. परिणामी रोप जिवंत राहते, पण त्याच्या पानांमध्ये अपेक्षित जाडी आणि जेल तयार होत नाही.
माळ्यांच्या मते, कोरफडीला पोषण देताना योग्य वेळ आणि योग्य प्रमाण महत्त्वाचे असते. अनेकदा खत देण्यापेक्षा चुकीच्या सवयी रोपाचे अधिक नुकसान करतात.
पहिली मोठी चूक
कोरफडीची जुनी पानं काढून न टाकणे. अनेकजण रोप वाढत असल्याने सर्व पानं तशीच ठेवतात. मात्र, त्यामुळे रोपाची ऊर्जा जुन्या पानांमध्ये खर्च होते. जुनी आणि कोरडी पानं वेळोवेळी काढल्यास नवीन पानांची वाढ अधिक चांगली होऊ शकते.
दुसरी आणि तिसरी चूक
जास्त पाणी देणे आणि कुंडीत पाणी साचू देणे. कोरफड ही कमी पाण्यात वाढणारी वनस्पती आहे. सतत ओलसर मातीमुळे मुळांना बुरशी लागू शकते, परिणामी रोपाची वाढ मंदावू शकते.
तसेच काही जण पाणी कमी देतात. अशा वेळी पानांमध्ये साठवला जाणारा नैसर्गिक रस कमी होऊ शकतो, त्यामुळे माती पूर्ण कोरडी झाल्यानंतरच योग्य प्रमाणात पाणी देणे महत्त्वाचे मानले जाते.
चौथी चूक
कोरफडीला दिवसभर कडक उन्हात ठेवणे. कोरफड उष्ण हवामानात वाढत असली तरी तीव्र दुपारच्या उन्हामुळे पानांतील ओलावा कमी होऊ शकतो. तसेच पूर्ण सावलीत ठेवल्यास वाढ खुंटू शकते, त्यामुळे भरपूर प्रकाश मिळेल, पण थेट कडक ऊन टळेल अशा ठिकाणी रोप ठेवणे फायदेशीर ठरू शकते.
आता प्रश्न आहे तो स्वयंपाकघरातील फुकटचा पदार्थ नेमका कोणता?
बागकाम तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लसूण सोलल्यानंतर उरणारी साल अनेकजण टाकून देतात. मात्र, हीच साल पाण्यात काही तास भिजवून त्याचे द्रावण तयार केले जाऊ शकते. हे द्रावण महिन्यातून एकदा कोरफडीच्या रोपाला दिल्यास त्याला पोषण मिळण्यास मदत होऊ शकते असे सांगितले जाते.
याशिवाय वापरून झालेली चहापत्ती, थोडी कॉफी पावडर किंवा चिमूटभर हळदही काही बागकामप्रेमी वापरत असल्याचे दिसते. विशेषतः हळदीमध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असल्याने रोपांचे संरक्षण होण्यास मदत मिळू शकते, असे मानले जाते.
मात्र, कोणताही उपाय करताना प्रमाण आणि वेळ यांचे भान ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य काळजी घेतल्यास उन्हाळ्यातही कोरफडीचे रोप टवटवीत, भरदार आणि निरोगी ठेवणे शक्य होऊ शकते.
