प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्सचा वापर करताना जीवाणू हे औषधाला दाद देईनासे होतील अशा पद्धतीने करायचा नसतो. प्रतिजैविके जर वेगळ्या पद्धतीने वापरली तर त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकून राहतो असे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. जेव्हा जीवाणू हे प्रतिजैविकांचे आव्हान स्वीकारण्यात तरबेज होतात तेव्हा त्यांना आटोक्यात आणण्यासाठी सिक्वेनशियल ट्रीटमेंट (क्रमवारीगत औषध वापर पद्धती) नावाची नवी पद्धत वापरण्यात येते. यात प्रतिजैविकाच्या मात्रा कमी प्रमाणात आलटून पालटून दिल्या जातात त्यामुळे औषधे पचवण्याची त्यांची युक्ती कामी येत नाही. ब्रिटनमधील एक्सटर विद्यापीठाच्या रॉबर्ट बेअर्जमोर यांनी सांगितले की, आमच्या अभ्यासात औषधाची मात्रा, जीवाणूंची संहती व औषधांना होणारा प्रतिरोध या तीन बाबी विचारात घेतल्या आहेत. या संशोधनानुसार दोन अँटीबायोटिक्सच्या मदतीने जीवाणूंना औषधाची कमी मात्रा देऊनही मारता येते. मग त्यांनी औषधांना दाद न देण्याचे प्रमाण वाढत नाही. जीवाणूंची सातत्याने वाढ होण्याचेही टळते. फक्त त्यासाठी प्रतिजैविक वेगवेगळ्या औषधांच्या स्वरूपात एकत्रित वापरणे गरजेचे असते. प्राणघातक ठरणार नाही अशा मात्रेत प्रतिजैविके देऊन आपण जीवाणूंना मारू शकतो.
जीवाणू प्रादुर्भावाच्या परीक्षानळी प्रारूपात असे दिसून आले की, ज्या जीवाणूंमध्ये औषधांना रोखण्याची क्षमता निर्माण झाली आहे त्यांच्यात औषधाला रोखणारी जनुकेही असतात. पण त्यांनाही मारण्याची क्षमता सिक्वेन्शियल ट्रीटमेंट पद्धतीत आहे. सिक्वेन्शियल ट्रीटमेंट या पद्धतीत वेगळ्या प्रकारची प्रतिजैविक औषधे ही कमी मात्रेत दिली जातात, जो परिणाम एका प्रतिजैविकाने किंवा दोन औषधांच्या मिश्रणाने साध्य होत नाही तो क्रमवारी पद्धतीने केलेल्या उपचार पद्धतीत साध्य होतो.
संशोधनानुसार सिक्वेन्शियल ट्रीटमेंटमध्ये सर्व औषधरोधक जीवाणूतील उत्परिवर्तन रोखले जात नसले तरी एक औषध दुसऱ्या औषधाप्रती जीवाणूला संवेदनशील बनवते त्यामुळे जीवाणूंमध्ये औषधरोधकता निर्माण होण्याची शक्यता कमी असते. प्लॉस बायॉलॉजी या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे.