Fruits for Piles: मूळव्याध हा एक असा आजार आहे, जो नियंत्रणात ठेवला नाही, तर त्याची लक्षणे आणखी वाढू शकतात. खराब आहार आणि बिघडणारी जीवनशैली या बाबी मूळव्याधीच्या विकासासाठी जबाबदार आहेत. या स्थितीसाठी पचनाच्या समस्या विशेषतः त्रासदायक असतात. आहारात फ्रोजन मीट, फास्ट फूड व डीप फ्राईड अन्न यांसारखे खोल तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केल्याने पचनाच्या समस्या वाढतात.
बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याधीची लक्षणे आणखी वाढतात. मूळव्याध रक्ताळलेली आणि सूजयुक्त अशा दोन प्रकारची असते. रक्ताळलेल्या मूळव्याधीत फक्त रक्तस्राव होतो; परंतु गुदद्वारात कोणताही त्रास होत नाही. तर गुदद्वारात सूज येणाऱ्या बाह्य मूळव्याधीमुळे वेदनांचाही त्रास होतो. दोन्ही प्रकारची मूळव्याध त्रासदायक असते. अशा त्रासदायी मूळव्याधीपासून सुटका करून घेण्यासाठी एक फळ आहे, ज्याच्या सेवनानं तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो.
मूळव्याध नियंत्रित करण्यासाठी पेरू खाणे हा खूप प्रभावी उपाय आहे. पेरू हे हिवाळ्यातील एक स्वादिष्ट आणि पौष्टिक फळ आहे. या फळात उष्मांक कमी असतात आणि त्यात फायबर भरपूर असते, ज्यामुळे पचनास मदत होते. मूळव्याधीच्या रुग्णांसाठी पेरूचे सेवन अत्यंत फायदेशीर आहे. हे फळ कच्चे, आंबट चटणी किंवा गोड जाम अशा विविध प्रकारे खाल्ले जाऊ शकते. पेरू खाणे मूळव्याध रुग्णांसाठी कसे फायदेशीर आहे ते पाहूया.
पेरू मूळव्याध कसा नियंत्रित करतो
गुलाबी पेरूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यास मदत करतात. साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक डॉ. विमल झांझर (एमडी) यांच्या मते, पेरूमध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि त्यात भरपूर फायबर असते. त्याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
मूळव्याधीच्या रुग्णांनी बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी पेरूचे सेवन करावे. फायबरने समृद्ध असलेला पेरू योग्य रीतीने पचनक्रिया वाढवतो आणि मल सैल करतो. हे फळ आतड्यांची हालचाल सुधारते आणि आतडे स्वच्छ करते. त्याचे सेवन केल्याने मलविसर्जन सोपे होते. मूळव्याधीचा त्रास असलेल्यांनी नियमितपणे पेरूचे सेवन करावे. पोषक तत्त्वांनी समृद्धअसलेला पेरू मूळव्याधीच्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो.
मूळव्याध रुग्णांनी पेरू कधी खावा?
ई जीवनसत्त्वाने समृद्ध असलेला पेरू मूळव्याध आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. क जीवनसत्त्वाने समृद्ध असलेला पेरू मूळव्याधीचे रुग्ण रिकाम्या पोटीही खाऊ शकतात. सकाळी रिकाम्या पोटी मिठासह हे आरोग्यदायी फळ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. हे फळ गुदाशयातील जळजळही कमी करते.
