सध्या जगभरात करोनाचं संकट आहे. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आलं होतं. दरम्यान, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांनी कोरोनाच्या संकटादरम्यानही मोठी कमाई केली आहे. लॉकडाऊनदरम्यान बेझोस यांच्या संपत्तीत सुमारे ४० अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.
ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनं दिलेल्या माहितीनुसार बेझोस यांच्याकडे १५५ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. दरम्यान, अॅमेझॉनच्या शेअर्सच्या वाढलेल्या किंमतींचा फायदा जेफ बेझोस यांना झाल्याचं म्हटलं जात आहे. करोनाच्या संकटादरम्यान अनेक कंपन्यांना मोठ्या संकटातून जावं लागलं होतं. परंतु अॅमेझॉनच्या शेअर्सनं यादरम्यानही उत्तम कामगिरी केली.
कंपन्यांना संकटातून जावे लागले असताना अॅमेझॉनने शेअर बाजारामध्ये चांगली कामगिरी केली. तसंच यादरम्यानही अॅमेझॉनच्या शेअर्सची किंमत २ हजार डॉलर्सच्या वरच राहिली असल्याचंही म्हटलं जात आहे. पहिल्यांदाच त्यांची एकूण संपत्ती १५० अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचली नाही. यापूर्वीही जुलै २०१८ मध्ये त्यांची संपत्ती १५० अब्ज डॉलर्सच्या वर गेली होती.
दरम्यान, मे महिन्याच्या अखेरीस अॅमेझॉन इंडियाचे प्रमुख अमित अग्रवाल यांनी माणीत झालेली वाढ पूर्ण करण्यासाठी तसंच या कठिण काळात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनी आपल्या ऑपरेशनल नेटवर्कमध्ये ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचं म्हटलं होतं. तसंच कंपनी अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसंच सुरक्षित कामकाजाचं वातावरणंही निर्माण करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले होते. करोनाच्या संकटकाळात जगभरातील अनेक कंपन्यांवर आणि क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला आहे. प्रामुख्यानं एव्हिएशन, ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे.