अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या (Amazon Great India Festival Sale 2021) तारखांमध्ये बदल केला आहे. फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलच्या (Flipkart Big Billion Days Sale 2021) नवीन तारखा जाहीर केल्यानंतर अ‍ॅमेझॉनकडून देखील हे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे, ४ ऑक्टोबरपासून सुरु होणारा अ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आता एक दिवस आधी म्हणजे ३ ऑक्टोबरलाच सुरु होणार आहे. अ‍ॅमेझॉनने याबाबत एक निवेदनच प्रसिद्ध केलं आहे. आता सेलच्या तारखांमधील हे बदल म्हणजे दोन मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांमधील तीव्र होत चाललेल्या स्पर्धेचं चित्र स्पष्ट करतात. दरम्यान, अ‍ॅमेझॉन सेलच्या तारखा जरी बदलल्या असल्या तरी प्राइम सदस्यांसाठी हा सेल एक दिवस आधीच सुरु होईल.

ई-कॉमर्समधील सर्वात मोठी कंपनी मानल्या जाणाऱ्या अ‍ॅमेझॉनने एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. “आमचं सर्वोच्च प्राधान्य हे आमच्या ग्राहकांचा विश्वास आणि आमच्या विक्रेत्यांच्या विशेषत: लाखो लहान विक्रेते आणि देशभरातील हजारो स्थानिक दुकान मालकांच्या हिताला आहे. त्याकरिता आम्ही आमच्या भागीदार, लहान व्यावसायिक आणि ग्राहकांसाठी नवनवे प्रयोग सुरुच ठेवतो. जेणेकरून, सणांच्या हंगामासाठी ते कायमच तयार राहतील. दरम्यान, अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल हा आता ३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू होईल आणि नेहमीप्रमाणे प्राइम सदस्यांना या सेलचा लवकर अ‍ॅक्सेस मिळेल.”

Flipkart पाठोपाठ Amazon ची घोषणा

विशेष म्हणजे अ‍ॅमेझॉनने आपल्या सेलच्या तारखा बदलण्याची अधिकृत घोषणा करण्याच्या काहीच तासांपूर्वी फ्लिपकार्टने आपल्या बिग बिलियन डेज सेलच्या नवीन तारखांची घोषणा केली होती. सुरुवातीला फ्लिपकार्टने आपला या सेल ७ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र, त्यानंतर, फ्लिपकार्टने तारखा बदलत आपला हा बिग बिलियन डेज सेल ३ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर दरम्यान असणार असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर काहीच तासांत अ‍ॅमेझॉनने देखील आपला ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल ४ ऑक्टोबर नव्हे तर ३ ऑक्टोबरला सुरु होणार असल्याचं सांगितलं.

अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई-कॉमर्स कंपन्या या आपापल्या सेल्समध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रिकल उपकरणं आणि अन्य अनेक लोकप्रिय उत्पादन विभागांवर (कॅटेगरी) भरपूर डील्स आणि ऑफर देतील.

अ‍ॅमेझॉन सेलच्या ऑफर्स

अ‍ॅमेझॉन या फेस्टिवल सेलअंतर्गत लाखो लघु मध्यम (एसएमबी) उद्योजक आपल्या मालाची विक्री करू शकतील. यावेळी या सेलमध्ये सुमारे ४५० शहरांमधील ७५ हजारांहून अधिक स्थानिक दुकानांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या सेलमध्ये १ हजारहून अधिक नव्या उत्पादनांचा समावेश होणार आहे.

१. अ‍ॅमेझॉन पे आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यावर तुम्हाला ७५० रुपयांचा जॉइनिंग बोनस आणि ५% रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील.
२. अ‍ॅमेझॉन पे वर साइन अप केल्यानंतर ६० हजारांच्या झटपट क्रेडिटसह तुम्हाला फ्लॅट १५० रुपयांचा कॅशबॅक मिळेल. याशिवाय १००० रुपयांचे गिफ्ट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना १००० रुपयांची रिवोर्ड्स परत मिळतील. त्याचवेळी, अ‍ॅमेझॉन पे बॅलन्समध्ये पैसे जोडल्यास ग्राहकांना २०० रुपयांचं बक्षीस आणि अ‍ॅमेझॉन पे यूपीआय वापरून केलेल्या खरेदीवर १०० रुपयांपर्यंत १०% कॅशबॅक मिळेल.
३. कॉर्पोरेट भेटवस्तूंवर खास ऑफर्स, बल्क डिस्काउंट, परवडणाऱ्या किमतीत फेस्टिव्हल ऑफर, कॅशबॅक, बक्षिसं इ. मिळेल.
४. ग्राहकांना एचपी, लेनोवो, कॅनन, गोदरेज, कॅसिओ, युरेका फोर्ब्स इत्यादी टॉप ब्रॅण्डमधून लॅपटॉप, प्रिंटर, नेटवर्किंग डिव्हाइसेस, ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स, व्हॅक्यूम क्लीनर इत्यादी श्रेणींमध्ये जीएसटी इनव्हॉइससह २८% अधिक बचत होईल.

फ्लिपकार्ट सेलच्या ऑफर्स

फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये अनेक मोबाईलवर मोठी सूट दिली जाईल. मोटोरोला, ओप्पो, पोको, रियलमी, सॅमसंग आणि विवोसह अनेक कंपन्या नवीन उपकरणं लाँच करत आहेत जी ग्राहकांसाठी उपलब्ध होतील. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये मोटोरोला एज २० प्रो, मोटो टॅब जी २० आणि रिअलमी ४ के गुगल टीव्ही स्टिकसह विविध उपकरणांच्या खरेदीवर सूट मिळू शकते. त्याचसोबत, स्मार्टवॉच, पॉवर बँक, हेल्थकेअर उपकरणं, हेडफोन आणि स्पीकर्ससारख्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर ८० टक्के सूट मिळेल.

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये घरगुती उपकरणं उदा. टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि अनेक वस्तू ८० टक्के सूट मिळणार आहे. याव्यतिरिक्त, फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँक क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना १० टक्के त्वरित सूट देणार आहे. पेटीएमद्वारे वॉलेट आणि यूपीआय व्यवहारांवर आश्वासित कॅशबॅक देखील मिळेल.