जगभरात एकीकडे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवरुन खरेदी करण्याचं प्रमाण वाढलंय, तर इलेक्ट्रिक वाहनांचाही वापर वाढला आहे. अशात आता दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ने भारतात प्रोडक्ट्सच्या डिलिव्हरीसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल्सचा (EV) वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने 23 फेब्रुवारी रोजी महिंद्रा इलेक्ट्रिकसोबत (Mahindra Electric) भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे.

या कराराअंतर्गत सुरूवातीला अ‍ॅमेझॉन जवळपास 100 महिंद्रा Treo Zor इलेक्ट्रिक व्हेईकल्सद्वारे देशात डिलिव्हरी सुरू करणार आहे. देशातील प्रमुख सात शहरांमध्ये सुरूवातीला Treo Zor या तीनचाकी इलेक्ट्रिक व्हेईकलचा प्रोडक्टच्या डिलिव्हरीसाठी वापर केला जाईल. यामध्ये बंगळुरु, नवी दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, भोपाण, इंदोर आणि लखनऊ या सात शहरांचा समावेश आहे. या गाड्या अ‍ॅमेझॉन इंडियाच्या डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर्सपर्यंत पोहोचवण्यास सुरूवात झाली आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिकसोबतची ही भागीदारी ई-परिवहन उद्योगातील भारताच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे, असं Amazon इंडियाने या कराराबाबत माहिती देताना म्हटलं. गेल्या वर्षी 2020 मध्ये अ‍ॅमेझॉन इंडियाने २०२५ पर्यंत आपल्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये जवळपास 10 हजार इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करणार असल्याची घोषणा केली होती. याशिवाय 2030 पर्यंत जगभरात आपल्या डिलिव्हरी नेटवर्कमध्ये जवळपास 1 लाख इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश करण्याचं कंपनीने जाहीर केलं आहे.

Treo Zor मधून 550 किलो वजनापर्यंतचं सामान नेता येतं. कंपनीने ऑक्टोबर 2020 मध्ये ही गाडी लाँच केली होती, यात अ‍ॅडव्हान्स्ड लीथियम-आयन बॅटरी आहे.