Coffee Side Effect: जगभरातील लाखो लोक आपल्या दिवसाची सुरुवात एक कप कॉफीने करतात. अशा परिस्थितीत, अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या सर्वांत मोठ्या अभ्यासाने काहीसा दिलासा दिला आहे. या संशोधनानुसार, बहुतेक तंदुरुस्त लोकांसाठी दररोज ४०० मिलिग्रॅमपर्यंत कॅफिनचे सेवन करणे सुरक्षित आहे. त्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि हृदय निकामी होण्याचा धोकाही कमी होतो. तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, सर्वच कॅफिन सारखे नसते. उदाहरणार्थ- एनर्जी ड्रिंक्स आणि कॅफिन शॉट्समध्ये कमी प्रमाणातही भरपूर कॅफिन असते. त्यामुळे फायद्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकते. ‘मॅक्स हेल्थकेअर’मधील कार्डियाक सायन्सेसचे चेअरमन डॉ. बलबीर सिंग यांच्या मते, ॲट्रियल फायब्रिलेशनने ग्रस्त असलेल्या लोकांवर कॉफी पिण्याचा अधिक गंभीर परिणाम होऊ शकतो. ॲट्रियल फायब्रिलेशन ही हृदयाची एक गंभीर स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाचे वरचे कप्पे वेगाने आणि अनियमितपणे धडकतात, ज्यामुळे स्ट्रोक, हृदय निकामी होणे आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा धोका वाढतो.
हृदयाच्या आरोग्यासाठी कॉफी किती सुरक्षित?
अमेरिकन हार्ट असोसिएशनने ‘सर्क्युलेशन’ या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या नवीन वैज्ञानिक निष्कर्षांनुसार, माफक प्रमाणात कॉफी प्यायल्याने बहुतेक लोकांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांचा धोका वाढत नाही. इतकेच नव्हे, तर साखर, सिरप टाळल्याने किंवा ब्लॅक कॉफी प्यायल्याने हृदयविकार, स्ट्रोक, हृदय निकामी होणे आणि मधुमेह यांचा धोका कमी होऊ शकतो, असेही त्यात सुचवले आहे.
एनर्जी ड्रिंक्सची गोष्ट वेगळी का?
माफक प्रमाणात कॉफी पिणे सुरक्षित असले तरी एनर्जी ड्रिंक्सच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. अनेक एनर्जी ड्रिंक्स आणि एनर्जी शॉट्समध्ये सामान्य कॉफीपेक्षा तीन ते चार पट जास्त कॅफिन असते. त्यांमध्ये अनेकदा अशी औषधे किंवा घटक मिसळलेले असतात, जे शरीरात कॅफिनचा प्रभाव अधिक लवकर होण्यास मदत करतात. संशोधनात असे आढळून आले आहे की, एनर्जी ड्रिंक्समधील कॅफिनच्या उच्च पातळीमुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात. अगदी तंदुरुस्त तरुण लोकांनाही ही पेये मोठ्या प्रमाणात सेवन केल्यानंतर हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता आल्याचा अनुभव आला आहे.
कॅफिनचे फायदे
विशेष म्हणजे, संशोधकांच्या मते कॉफीचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. कॉफीमध्ये शेकडो नैसर्गिक घटक असतात, जे दाह कमी करतात आणि रक्तवाहिन्यांचे संरक्षण करतात. त्यामुळेच अनेक अभ्यासांमध्ये, सप्लिमेंट्स किंवा एनर्जी ड्रिंक्समधून सेवन केलेल्या कॅफिनपेक्षा कॉफी अधिक प्रभावी ठरते. हे संशोधन इतके गुंतागुंतीचे असण्याचे एक कारण म्हणजे त्याचे परिणाम प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळे असतात. कॉफीचा प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम होतो. तुमचे वय, जनुके, यकृताचे कार्य, औषधे आणि तुम्ही किती वेळा कॉफी पिता या सर्व गोष्टींवरून तुमचे शरीर कॅफिनचे चयापचय किती लवकर करू शकते हे ठरते. त्यामुळेच काही लोक कोणत्याही त्रासाशिवाय अनेक कप कॉफी पिऊ शकतात; तर काहींना फक्त एका कपानंतर चिंता, हृदयाची धडधड वाढणे किंवा निद्रानाशाचा त्रास होतो.
तर मग तुम्ही दिवसभरात किती कॉफी पिणे योग्य?
अनेक अभ्यासांमधून सातत्याने असे दिसून आले आहे की, दररोज दोन ते चार कप कॉफी पिणे इष्टतम आहे. तथापि, यापेक्षा जास्त सेवन केल्यास काही लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यावरून हे स्पष्ट होते की, कोणतीही गोष्ट प्रमाणातच सेवन करणे सर्वोत्तम आहे.
