Amitabh Bachchan Reveals ICU Stay Recovery After Surgery: बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी आपल्या आरोग्याबाबत केलेल्या एका खुलाशाने चाहत्यांची चिंता वाढवली आहे. स्वतःच्या ब्लॉगवर त्यांनी आपण शस्त्रक्रियेनंतर काही काळ अतिदक्षता विभागात म्हणजेच ICUमध्ये उपचार घेत असल्याचे सांगितले. मात्र, त्यांची नेमकी कोणती शस्त्रक्रिया झाली किंवा कोणत्या आजारासाठी उपचार घ्यावे लागले, याचा खुलासा केलेला नाही. त्यांच्या या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असून, शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून घरी परतल्यानंतरचा काळ किती आव्हानात्मक असतो, याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, शस्त्रक्रिया, ICUमधील उपचार आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहिल्यानंतर घरी परतणे हा आयुष्यातील सर्वांत कठीण टप्पा असतो. त्यांच्या मते हा काळ केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक आणि दैनंदिन आयुष्याच्या दृष्टीनेही मोठी परीक्षा असते. आयुष्यभर स्वतःला विजेता समजणाऱ्या व्यक्तीसमोर अचानक पराभवासारखी परिस्थिती उभी राहते. काही जण धैर्याने या टप्प्यावर मात करतात, तर काही जण भूतकाळातील यशातच रमून जातात. मात्र, प्रत्येकाची ही वैयक्तिक निवड असते.
या अनुभवातून एक महत्त्वाचा आरोग्यविषयक मुद्दाही समोर आला आहे. अनेकांना वाटते की रुग्णालयातून सुट्टी मिळाली म्हणजे उपचार पूर्ण झाले. प्रत्यक्षात मात्र खरी पुनर्प्राप्ती त्यानंतरच सुरू होते. शस्त्रक्रिया शरीरातील समस्या दूर करते, पण शरीर पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने लागू शकतात.
मुंबई सेंट्रल येथील वॉकहार्ट रुग्णालयाचे जनरल आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संजय सोनार यांनी सांगितले की, ‘रुग्णालयातून घरी परतल्यानंतरचा काळ हा उपचार प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. शस्त्रक्रियेनंतर उद्भवणाऱ्या अनेक गुंतागुंती याच काळात दिसून येऊ शकतात, त्यामुळे औषधे वेळेवर घेणे, जखमेची योग्य काळजी घेणे, प्रथिनयुक्त संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे आणि फळे व हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.’
डॉ. सोनार पुढे सांगतात की, शस्त्रक्रियेनंतर शक्य तितक्या लवकर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हलका व्यायाम किंवा घरात थोडेफार चालणे सुरू करावे, त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि पायांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी होतो. तसेच ताप येणे, जखमेतून स्त्राव होणे, वाढत्या वेदना, सूज किंवा श्वास घेण्यास त्रास अशी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मानसोपचारतज्ज्ञ आणि रिलेशनशिप कोच डेल्ना राजेश यांच्या मते, शस्त्रक्रियेनंतर घरी परतणे म्हणजे उपचार संपल्याचे चिन्ह नसते. उलट ते नव्या संघर्षाची सुरुवात असते. रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय यंत्रणांचे संरक्षण असते. पण, घरी आल्यानंतर ही सुरक्षितता कमी होते. वेदना, अशक्तपणा, झोपेच्या तक्रारी, भूक कमी होणे आणि दैनंदिन कामांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची वेळ येऊ शकते.
विशेषतः आयुष्यभर स्वतःच्या बळावर काम करणाऱ्या आणि स्वतंत्र राहिलेल्या व्यक्तींसाठी हा बदल मानसिकदृष्ट्या अधिक कठीण असतो. चालणे, अंघोळ करणे, जेवणे किंवा साधी कामे करण्यासाठीही मदतीची गरज भासल्याने आत्मविश्वास डळमळू शकतो. अशा वेळी केवळ शरीरच नव्हे, तर मनालाही सावरण्याची गरज असते.
तज्ज्ञांच्या मते, या काळात कुटुंबीय, मित्र, डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट आणि मानसिक आरोग्यतज्ज्ञ यांची भूमिका तितकीच महत्त्वाची असते. रुग्णाला वारंवार स्वतःची वेदना किंवा अडचण समजावून सांगावी लागू नये, याची काळजी घेतली पाहिजे. योग्य समन्वय आणि भावनिक आधार मिळाल्यास पुनर्प्राप्तीचा प्रवास अधिक सोपा होतो.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अनुभवातून दिलेला संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. आजारपण किंवा शस्त्रक्रिया ही कोणालाही येऊ शकते. प्रसिद्धी, यश किंवा आर्थिक सामर्थ्य यामुळे शरीर अजेय होत नाही. उपचारानंतर स्वतःला वेळ देणे, आवश्यक विश्रांती घेणे, मदत स्वीकारणे आणि डॉक्टरांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे हीच पूर्णपणे बरे होण्याची खरी गुरुकिल्ली आहे.
आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक रुग्णाची प्रकृती, वय, आजार, आर्थिक परिस्थिती आणि कौटुंबिक आधार वेगळा असतो, त्यामुळे पुनर्प्राप्तीचा वेगही प्रत्येकासाठी वेगळा असतो. या प्रवासात संयम, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन हेच सर्वांत प्रभावी औषध ठरते. अमिताभ बच्चन यांनी मांडलेला अनुभव याच वास्तवाची जाणीव करून देतो.
