Amitabh Bachchan Stopped Eating Rice at 83: वय वाढत गेलं की, आहारातही अनेक बदल करावे लागतात, असं आपण अनेकदा ऐकतो. विशेषतः भात, साखर आणि गोड पदार्थ यांच्याबाबत ज्येष्ठांनी अधिक काळजी घ्यावी, असा सल्ला दिला जातो. मात्र, वयाच्या ८३ व्या वर्षी अमिताभ बच्चन यांनी भात आणि खीर खाणं बंद केल्याचं सांगितल्यानंतर एक वेगळाच प्रश्न चर्चेत आला आहे. वय वाढल्यानंतर भात पूर्णपणे सोडणं खरंच आवश्यक आहे का? की त्यामागे आणखी काही महत्त्वाचं आरोग्यशास्त्र आहे?
‘कौन बनेगा करोडपती’च्या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या बदललेल्या आहाराविषयी सांगितलं. त्यांनी भात आणि खीर दोन्ही खाणं बंद केल्याचा उल्लेख केला. मात्र, त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी त्यांच्यासाठी खास आंब्याची खीर तयार केली होती, असा किस्साही त्यांनी सांगितला. अमिताभ बच्चन यांचा हा निर्णय त्यांच्या वैयक्तिक आहारपद्धतीचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीनं वयाच्या ७०-८० वर्षांनंतर भात सोडावा, असा त्याचा अर्थ काढता येणार नाही.
वय वाढलं म्हणून भात बंद करण्याची गरज आहे का?
अमृता रुग्णालय, फरिदाबाद येथील अंतःस्रावतज्ज्ञ डॉ. निशांत रायजादा यांच्या मते, वय वाढल्यामुळे भात आहारातून पूर्णपणे काढून टाकण्याची आवश्यकता नाही. आहार अधिक आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न करताना अनेक जण सर्वप्रथम भात कमी किंवा बंद करतात. मात्र, त्याऐवजी आहारात काय येत आहे, हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे.
विशेषतः ज्येष्ठ वयात आहारातून एखादा पदार्थ काढून टाकताना त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेची आणि पोषणाची भरपाई होतेय का, हे पाहणं गरजेचं आहे.
पांढरा भात रक्तातील साखर वाढवतो का?
पॉलिश केलेला पांढरा तांदूळ हा परिष्कृत कर्बोदकांचा स्रोत आहे. तो तुलनेने लवकर पचतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भात खाल्ला आणि त्यासोबत पुरेशा प्रमाणात प्रथिने, तंतुमय पदार्थ किंवा भाज्या नसतील, तर जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढू शकते.
काही संशोधनांमध्ये पांढऱ्या भाताचे अधिक सेवन आणि प्रकार-२ मधुमेहाचा धोका यांच्यात संबंध आढळला आहे. मात्र, याचा अर्थ भात खाल्ल्यानं थेट मधुमेह होतो, असा नाही. व्यक्तीचा एकूण आहार, भाताचं प्रमाण, शरीराचं वजन, व्यायाम आणि चयापचयाचं आरोग्य यांचाही त्यावर परिणाम होतो.
ज्येष्ठांसाठी भात सोडताना महागात पडू शकते ‘ही’ चूक!
वय वाढल्यानंतर शरीराची पोषणाची गरज बदलते. इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होऊ शकते, भूक कमी होऊ शकते आणि वयानुसार स्नायूंचे प्रमाणही घटू लागते. अशा परिस्थितीत भात पूर्णपणे बंद केल्यानंतर त्यातून मिळणारी ऊर्जा इतर योग्य पदार्थांतून मिळाली नाही, तर कुपोषणाचा धोका वाढू शकतो.
त्याचबरोबर स्नायूंची झीज म्हणजेच सार्कोपेनिया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराची ताकद, चालण्याची क्षमता, संतुलन आणि दैनंदिन कामं करण्याची स्वावलंबनाची क्षमता प्रभावित होऊ शकते.
म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांसाठी केवळ कर्बोदकं कमी करण्यापेक्षा स्नायूंची ताकद आणि रक्तातील साखर यांचा योग्य समतोल राखणं अधिक महत्त्वाचं आहे.
मधुमेह असल्यास भात पूर्णपणे बंद करावा का?
मधुमेह, पोटाभोवती वाढलेली चरबी किंवा जेवणानंतर रक्तातील साखर जास्त वाढण्याची समस्या असल्यास पॉलिश केलेला पांढरा तांदूळ जेवणासाठी वापरण्याचे प्रमाण कमी करणं काही व्यक्तींना फायदेशीर ठरू शकतं. मात्र, कर्बोदकं हा घटक पूर्णपणे बंद करणं प्रत्येकासाठी आवश्यक नाही.
भाताऐवजी किंवा भातासोबत तांदळाचे कमी प्रक्रिया केलेले प्रकार, भरड धान्यं, बाजरीसारखी मिलेट्स, ओट्स, डाळी यांचा आहारात समावेश करता येतो. मात्र, कोणता पर्याय योग्य आहे हे व्यक्तीच्या आरोग्यस्थितीवर अवलंबून असतं.
भात कशासोबत खाल्ला जातो, हेदेखील महत्त्वाचं आहे. मोठी वाटीभर भात एकटाच खाण्यापेक्षा मोजून घेतलेला भात, डाळ, भाज्या, दही आणि प्रथिनांचा योग्य स्रोत यांचा समावेश असलेलं जेवण अधिक संतुलित ठरू शकतं.
मग ८३ व्या वर्षी भात सोडणं आरोग्यदायी आहे का?
याचं उत्तर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळं आहे. भात स्वतःहून पूर्णपणे चांगला किंवा वाईट नाही. त्याचा परिणाम भाताचा प्रकार, प्रमाण, तो कसा शिजवला जातो आणि त्यासोबत काय खाल्लं जातं, यावर अवलंबून असतो.
ज्येष्ठ नागरिकांनी आहारातून एखादा प्रमुख पदार्थ काढून टाकण्यापूर्वी रक्तातील साखर, वजन, स्नायूंची ताकद, भूक, शारीरिक हालचाल आणि एकूण पोषणाची गरज यांचा विचार करणं आवश्यक आहे.
डॉ. रायजादा यांच्या मते, “भात हा ना अनिवार्य आहे, ना धोकादायक. आरोग्यदायी आहार म्हणजे सर्वाधिक बंधनं असलेला आहार नव्हे; तर स्नायू आणि ताकद टिकवून ठेवतानाच रक्तातील साखर आणि चयापचयाचं आरोग्य नियंत्रणात ठेवणारा आहार होय.”
त्यामुळे अमिताभ बच्चन यांनी वैयक्तिक कारणांसाठी भात सोडला म्हणून प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीनंही तसंच करावं, असं नाही. वय वाढल्यानंतर आहारातील कोणताही आवडता पदार्थ कमी खाण्यापेक्षा तो योग्य आणि संतुलित स्वरूपात सेवन करणं अधिक महत्त्वाचं आहे. भात आवडत असेल आणि शरीराला तो योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात खाल्ल्यानं सहन होत असेल, तर तो आपण संतुलित आहारात समाविष्ट करू शकतो.
(टीप : या लेखातील माहिती सर्वसाधारण स्वरूपाची आहे. ती कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. मधुमेह, वजन, स्नायूंची झीज किंवा इतर आरोग्यविषयक समस्या असल्यास आहारात मोठा बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
